म्हापशात इमारतीचा स्लॅब कोसळून पाचजण जखमी

0
10

म्हापसा शहराच्या मध्यवर्ती भागात, जुन्या नगरपालिकेशेजारील ‘लॉरेन्स एनक्लेव्ह’ या निर्माणाधीन बहुमजली इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत 5 कामगार किरकोळ जखमी झाले असून, जखमींना जवळच्याच जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना काल रविवार दि. 2 रोजी सकाळी पावणेबाराच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे म्हापसा बसस्थानक ते म्हापसा न्यायालय वाहतूक बेटपर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे प्रवाशांची मोठ्याप्रमाणात गैरसोय झाली.

याबाबत या इमारतीचे बांधकाम करणारे कंत्राटदार राजेश भंडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत सहा मजली आहे. इमारत उभी करण्याचे काम सुरू होते. काल या पहिल्याच मधल्याच्या कामाचा स्लॅब घालण्याचे काम सुरू असताना येथील एक दांडा हलल्याने सदरचे दगड खाली कोसळून त्याच्याबरोबर असलेला स्लॅबही कोसळला. त्या स्लॅबखाली तिघेजण होते ते या जखमी झाले. तसेच दोघेजण स्लॅबसोबत खाली कोसळून तेही जखमी झाले.

या दुर्घटनेत जखमी झालेल्यामध्ये गौतम यादव (20), दिलीप यादव (25) सिंबू ठाकूर (33), रणजीत यादव (30), सोईल राणा (22) यांचा समावेश असून त्यांना पेडे म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले.