म्हादई वळवण्यास कर्नाटकातही विरोध

0
7

कर्नाटक सरकारने गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदीचे पाणी वळवण्यासाठीची जी योजना आखली आहे, तिला आता गोव्याबरोबरच कर्नाटक राज्यातूनही विरोध व्हायला लागला आहे. बेळगावमध्ये या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सोमवारी कर्नाटक राज्यातील लोकांनी एकत्र येऊन एक मोर्चा काढला होता.

‘बेळगावसाठी सभा’ या बॅनरखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शेतकरी, पर्यावरणवादी, विद्यार्थी आदी सहभागी झाले होते. या सभेतून बेळगाव व उत्तर कर्नाटकची जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदीला वाचवण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. कर्नाटक सरकारने म्हादई नदीचे पाणी वळवले तर बेळगाव व उत्तर कर्नाटकमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याबरोबरच तेथील सजीव सृष्टीचा समतोल ढळून पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
या सभेत परिसरातील वन क्षेत्र, पश्चिम घाट, धबधबे, पर्यावरण, तापमान याचे जतन करण्यासाठी जागृती निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. निदर्शकांनी यावेळी बोलताना हा फक्त परिसरातील पाण्याचा प्रश्न नसून, पाण्यासंबंधीचा न्याय, जैवविविधतेचे जतन आणि भावी पिढ्यांच्या भविष्याचाही प्रश्न असल्याचे स्पष्ट केले.