म्हादई नदीवर ३ ते ४धरणे बांधणार : शिरोडकर

0
14

म्हादई नदीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या म्हादईसंबंधीच्या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. राज्यात ६ ते ८ धरणे बांधण्याची योजना आहे. म्हादई नदीवर ३-४ धरणे बांधली जाणार आहेत, अशी माहिती जलस्रोत तथा सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी विधानसभेत जलस्रोत, सहकार खात्याच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना काल दिली.

जलस्रोत खात्याकडून ८५० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. आणखीन १०० ते २०० एमएलडी पाण्यात वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. म्हादई नदीवर तातोडी, काजूमळ येथे धरणे बांधण्यासाठी अभ्यास सुरू आहे. कळणा नदी आणि साळ येथे बॅरेजेस बांधली जाणार आहेत, असे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.

पेडणे तालुक्याला अतिरिक्त १० एमएलडी पाणी नोव्हेबर-डिसेंबरपर्यंत उपलब्ध केले जाणार आहे. तसेच गिरी-पर्वरी येथेही अतिरिक्त पाणी उपलब्ध केले जाणार आहे, असेही शिरोडकर यांनी सांगितले.