आमदार विजय सरदेसाई यांची भूमिका
गोवा आणि म्हादई नदीला वाचविण्यासाठी म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र म्हणून घोषित करणे आवश्यक आहे, या मागणीचा पुनरुच्चार गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्डच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना काल केला.
राज्याचे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांची व्याघ्र क्षेत्राबाबतची भूमिका अयोग्य आहे. ‘ते’ काही राजकारण्यांच्या बाजूने बोलत असल्याचे दिसून येत आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली.
केंद्र सरकारच्या समितीला राज्यातील जैव संवेदन क्षेत्राबाबत दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली, असा दावाही सरदेसाई यांनी केला.
भोम येथील राष्ट्रीय महामार्गाबाबतचा आराखडा बदलण्याची स्थानिकांची मागणी विचारात घेण्याची गरज आहे; मात्र राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. भोम येथील महामार्गासाठी नवीन पर्याय देण्यात आलेला आहे. त्यासाठी जमीन संपादन करण्याची गरज आहे. महामार्ग तयार करताना एका गावाचे दोन विभाग करणे अयोग्य आहे, असेही सरदेसाई म्हणाले.
कर्ज फेडण्यासाठी सक्षम असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन प्रमाणपत्र देण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मात्र राज्य सरकारने वेतन प्रमाणपत्राबाबत काढलेले परिपत्रक मागे घ्यावे, मागणी देखील त्यांनी केली. वेतन प्रमाणपत्राबाबत जारी केलेल्या नवीन परिपत्रकामुळे सरकारी खात्यांतर्गत गैरव्यवहाराला प्रोत्साहन मिळू शकते, असा दावाही त्यांनी केला.