म्हादईवर श्‍वेतपत्रिकेवरील निर्णय मुख्यमंत्री मागे घेण्याबाबत आशा

0
139

>> दिगंबर ः सरकारकडून विषयावर राजकारण

जीवनदायिनी म्हादईचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कुणी आणि कधी काय काय केले आहे याची सत्यस्थिती केवळ श्‍वेतपत्रिकेतून तमाम गोमंतकीयांना कळू शकते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादई प्रश्‍नी श्‍वेतपत्रिका न काढण्याचा आपला निर्णय मागे घेऊन श्‍वेतपत्रिका जारी करण्याच्या आमच्या मागणीची पूर्तता करतील, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सरकारकडून म्हादई प्रश्‍नी राजकारण केले जात आहे. कॉंग्रेस पक्षाने म्हादईवरून राजकारण केलेले नाही. त्यामुळेच कॉंग्रेसने नवी दिल्ली गेलेल्या येथील सर्वपक्षीय शिष्टमंडळात भाग घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी पक्षीय राजकारणातून बाहेर येऊन म्हादई प्रश्‍नी श्‍वेतपत्रिका जारी करून सर्व माहिती जनतेसाठी खुली करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते कामत यांनी केली.

कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळविण्यास सुरुवात केल्याने नदीतील पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. म्हादईचे पाणी वळविण्याच्या प्रकाराची आत्ताच गंभीर दखल न घेतल्यास आगामी काळात गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, असा दावा विरोधी पक्षनेते कामत यांनी केला.

म्हादई प्रश्‍नी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. सरकारला म्हादई प्रश्‍नी सर्वांना विश्वासात घेण्यात यश प्राप्त झाले नाही. आपण म्हादई प्रश्‍नी एक दिवसीय अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. या अधिवेशनातून म्हादईच्या सद्यःस्थितीबाबत माहिती उजेडात येण्यास मदत झाली असती. परंतु, मुख्यमंत्र्यांनी आपली सूचना नाकारली आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन विधानसभेत स्थगन प्रस्तावसुद्धा सादर केला होता. सदर स्थगन प्रस्ताव नाकारण्यात आला, असेही कामत यांनी म्हटले आहे.