28 C
Panjim
Tuesday, September 22, 2020

म्हादईला न्याय हवा

म्हादई जललवादापुढे आपला पराभव स्पष्ट दिसू लागताच कर्नाटकने या वादाच्या लवादबाह्य सोडवणुकीचा आग्रह धरला होता. त्यासाठी कर्नाटकच्या सर्वपक्षीय नेत्यांनी मागे पंतप्रधानांना साकडे घातले होते. परंतु लवादबाह्य सोडवणूक हवी असेल तर त्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तिन्ही राज्यांच्या नेत्यांची सहमती आवश्यक असेल असे पंतप्रधानांनी त्यांना सुनावताच ही मंडळी ताळ्यावर आली होती. त्यानंतर कर्नाटकने शेतकर्‍यांची ढाल पुढे केली. उग्र आंदोलन करून आणि हिंसाचाराचा मार्ग चोखाळून म्हादईचा पाण्याचा प्रश्न आपल्यासाठी किती ज्वलंत आहे हे दाखवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला. परंतु तरीही आपली डाळ शिजत नाही हे दिसताच आता जललवादापुढे म्हादईच्या खोर्‍यातील एकूण पाण्यापैकी ७ टीएमसी पाणी वापरण्याची अंतरिम मुभा आपल्याला द्यावी अशी मागणी कर्नाटकच्या वतीने जललवादापुढे करण्यात आली आहे. मात्र, कर्नाटकची आजवरची कार्यपद्धती पाहता अशा आश्वासनांवर विसंबून कोणतीही अंतरिम परवानगी देणे म्हणजे चोराला रान मोकळे करून देण्यासारखेच ठरेल. कोणत्याही परवानगीची वाट न पाहता कर्नाटकने कळसा – भांडुरा कालव्यांचे काम पुढे रेटले. गोव्याच्या विरोधाची फिकीर तर केली नाहीच, परंतु न्यायालयापासून जललवादापर्यंत कोणालाही न जुमानता कालव्यांचे काम तडीस नेले. सर्वोच्च न्यायालयाने फटकार लगावली, स्थापन झालेल्या जललवादाने अंतरिम स्थगिती बजावली, तरीही कामे पुढे रेटली गेली. जललवादाच्या आदेशान्वये प्रतिबंधात्मक भिंत बांधून पाणी वळवण्यापासून कर्नाटकला रोखण्यात आले. परंतु अशा प्रकारे काम पुढे रेटले गेले की येत्या पावसाळ्यात ही भिंत कधीही कोसळू शकते. शिवाय ही भिंत पाडून टाकण्याच्या धमक्या नेते मंडळी देत आहेत त्या वेगळ्याच. मध्यंतरी असाही एकदा युक्तिवाद केला गेला की या कालव्यांचे काम जवळजवळ ऐंशी टक्के पूर्ण झालेले असल्याने आता पाणी वळवण्यास प्रतिबंध केला तर सगळा खर्च वाया जाईल, त्यामुळे पाणी वळवण्यास परवानगी दिली जावी. एवढा बालिश युक्तिवाद दुसरा नसेल. मुळात बेकायदेशीरपणे काम पुढे न्यायचे, सगळ्या परवानग्यांना, कायदे कानूनांना वाटाण्याच्या अक्षता लावायच्या आणि वर हे काम आता पूर्ण झाले आहे म्हणून परवानगी द्या म्हणायचे हा तर विनोद झाला. हे म्हणजे एखाद्या चोराने खूप धडपड करून एखाद्याच्या घरात प्रवेश मिळवायचा आणि बघा, मी किती मेहनतीने आत प्रवेश मिळवला आहे, त्यामुळे मला सगळा ऐवज चोरू द्या असे म्हणायचे अशातलाच हा प्रकार आहे. सध्या कर्नाटकच्या उत्तरी जिल्ह्यांमध्ये असलेले दुष्काळी वातावरण पुढे करून म्हादईच्या पाण्याची गरज व्यक्त केली जात आहे. परंतु इतर २२ नद्या जिल्ह्यातून वाहत असताना म्हादईचेच पाणी का वळवायचे असा प्रतिसवाल गोव्याने केला आहे. परंतु हुबळी – धारवाड, गदग, बेळगाव आणि बागलकोट या जिल्ह्यांची पाण्याची गरज केवळ म्हादईचेच पाणी मलप्रभेत वळवून दूर सारता येईल असे चित्र कर्नाटकने उभे केलेले आहे. कर्नाटकच्या या मागणीमागे तेथील सर्वपक्षीय नेते उभे आहेत हे लक्षात घेण्याजोगे आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांचे सहकारी आग्रही तर आहेतच, परंतु भाजपचे केंद्रीय नेते व्यंकय्या नायडू, अनंतकुमार, सदानंद गौडा आदींनी म्हादईच्या पाण्यासाठी पंतप्रधानांपाशी सतत जो आग्रह धरला आहे तो नोंद घेण्याजोगा आहे. मध्यंतरी संरक्षणमंत्री बनताच पर्रीकरांनी धारवाडमध्ये म्हादईच्या प्रश्नाच्या लवादबाह्य सोडवणुकीस अनुकूलता दर्शवणारे काही वक्तव्य केले. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तसा त्या विधानाचा आधार घेऊन लगेच गोव्याविरुद्ध मोर्चेबांधणी करण्यात आली. अर्थात, मुख्यमंत्री पार्सेकरांनी ती शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळून लावल्याने तो विषय तेथे संपला हा भाग वेगळा. परंतु अशा प्रकारची एकजूट आणि आक्रमक नीती कर्नाटक सतत अवलंबीत आले आहे. गोव्यामध्ये मात्र म्हादईच्या प्रश्नाबाबत उदासीनताच अधिक दिसते. केंद्र सरकार सगळे पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आंतरराज्य जल लवाद स्थापन करण्याच्या विचारात आहे. परंतु म्हादईचा लढा आता अंतिम टप्प्यात आलेला असताना म्हादई जललवादापुढेच त्याचा सोक्षमोक्ष लागणे आवश्यक आहे. पुन्हा नव्या जललवादापुढे शून्यातून विश्व उभे करणे हे अन्यथा कठीण जाईल. त्यामुळे म्हादई जललवादाच्या सध्या सुरू असलेल्या सुनावणीमध्येच गोव्याची बाजू जोरकसपणे मांडली जाईल हे पाहाणे अत्यंत गरजेचे असेल. न्याय आता नाही तर केव्हाच नाही!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अल्झायमरला दूर ठेवण्यासाठी….

डॉ. गजानन पाणंदीकर(न्युरॉलॉजिस्ट- हेल्थवे हॉस्पिटल) २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर या रोगाचा...

कोरोना विरोधात रसायन द्रव्ये

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) २०२० वर्ष फक्त जगायचे, आरोग्य सांभाळायचे. बस्स..! कोणतीच चिंता नको, कसे होईल ही...

भाजणे : लक्षणे, कारणे, उपचार भाग – २

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर(श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) कित्येक लोकांचा असा गैरसमज असतो की भाजलेल्या जखमेवर टूथपेस्ट, क्रीम, बटर इत्यादी...

गायीचे दूध आणि त्याचे स्वरूप भाग – ३

वैद्य स्वाती हे. अणवेकरम्हापसा आपल्या देशी गाईंचे संगोपन अगदी कमी खर्चात होते. म्हणून त्यांना बेवारशासारख्या रस्त्यावर न सोडता...

हडेलहप्पी नको

संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...

ALSO IN THIS SECTION

हडेलहप्पी नको

संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...

मेहेरबानी का?

गोव्यातील खासगी इस्पितळांवर राज्य सरकार आणि विशेषतः आरोग्य खाते फारच मेहेरबान दिसते. देशातील बहुतेक सर्व राज्यांनी खासगी इस्पितळांतील कोरोना रुग्णांवरील उपचाराचे दर...

असंतोषाचे ‘बादल’

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सत्तराव्या वाढदिनीच त्यांच्या मंत्रिमंडळातील विश्‍वासू मित्रपक्ष शिरोमणी अकाली दलाच्या एकुलत्या एक मंत्री हरसिम्रतकौर बादल यांनी सरकारच्या ‘शेतकरीविरोधी...

चौकशी करा

राज्यातील बांधकाम मजूर घोटाळाप्रकरणी निवृत्तीच्या उंबरठ्यावरून लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी दिलेला निवाडा सरकारची अब्रू वेशीवर टांगणारा आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये बांधकाम...

दिलासा आणि भरवसा

कोरोनाने मानवाची सर्वश्रेष्ठत्वाची अहंता उद्ध्वस्त केली. डोळ्यांना न दिसणारा, संवेदनांना न जाणवणारा एखादा अतिसूक्ष्म विषाणू देखील ह्या अब्जावधी माणसांना एवढे हतबल करू...