म्हादईप्रश्नी याचिकांवर सुनावणी नाहीच

0
19

6 डिसेंबरला सुनावणी शक्य; विजय सरदेसाईंची राज्य सरकारवर टीका

सर्वोच्च न्यायालयात म्हादई प्रश्नी याचिका गुरुवारी सुध्दा सुनावणीला आली नाही. आता, डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात 6 डिसेंबर रोजी म्हादईविषयीची याचिका सूचीबध्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हादई याचिका सुनावणीला न आल्याने राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकार म्हादईप्रश्नी गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयात म्हादई प्रकरणी याचिकांवर सुनावणी बुधवार 29 आणि गुरुवार 30 नोव्हेंबर हे दिवस ठेवले होते. सर्वोच्च न्यायालयात 29 नोव्हेंबरला सुनावणी न झाल्याने 30 नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता होती. तथापि, म्हादई प्रश्नी याचिका सुनावणीला आलीच नाही.

सर्वोच्च न्यायालयात म्हादईप्रश्नी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. म्हादईप्रश्नी राज्य सरकार गंभीर नसल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका सुनावणीला येत नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून म्हादईचा लढा जिंकण्याचा विवास व्यक्त केला जात आहे; परंतु न्यायालयात याचिका सुनावणीसच येत नाही. मग, जिंकणार तरी कशी? असा सवाल विजय सरदेसाईंनी केला.

म्हादईप्रश्नी महाराष्ट्र मदत करेल : मुख्यमंत्री
सर्वोच्च न्यायालयातील म्हादईप्रश्नी याचिकेला महाराष्ट्र सरकार मदत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केला. म्हादईविषयीची याचिका गोवा सरकार जिंकणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. म्हादई प्रश्नी याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी सूचिबध्द झाली होती; मात्र काही कारणास्तव पुन्हा पुढे ढकलण्यात आली, असेही ते म्हणाले.