म्हादईप्रश्नी भाजप, काँग्रेसकडून फक्त तडजोड : मनोज परब

0
9

रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) प्रमुख मनोज परब यांनी म्हादई नदीच्या प्रश्नावरून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर काल पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष म्हादई प्रश्नी तडजोड करीत आहेत, असा आरोप मनोज परब यांनी केला. यावेळी आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांची उपस्थिती होती.

म्हादई नदीवर कर्नाटक सरकारने सुरू केलेल्या कामाची संयुक्त पाहणी करण्याची गोवा सरकारची मागणी म्हादई प्रवाहच्या बैठकीत दुसऱ्यांदा फेटाळण्यात आली आहे. या बैठकीला गोव्याचे केवळ 3 अधिकारी आणि कर्नाटकाचे 30 अधिकारी उपस्थित होते. भाजप सरकार म्हादईप्रश्नी तडजोड करीत आहे. राष्ट्रीय पक्षांनी कधीही गोव्याच्या हितासाठी काम केले नाही आणि म्हादई हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे, असेही मनोज परब यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हादई कर्नाटककडे राहणार असल्याचे एक वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याची पूर्तता करण्याचे काम गोव्यातील भाजप सरकार करीत आहे, असा आरोप मनोज परब यांनी केला.

काँग्रेस पक्षाने पूर्वी म्हादईसाठी आंदोलने केली; पण आता कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसने आंदोलने करणे बंद केले आहे. भाजप आणि काँग्रेसच्या छुप्या अजेंड्यामुळे म्हादई नदीचे अस्तित्व धोक्यात येत आहे. गोव्यातील नागरिकांनी म्हादईप्रश्नी भाजप व काँग्रेसचे धोरण समजून घेण्याची गरज आहे, असेही परब म्हणाले.

म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची गरज आहे. म्हादईप्रश्नी राज्यातील भाजप सरकार गंभीर नसल्याने प्रत्यक्ष पाहणीकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप आमदार वीरेश बोरकर यांनी केला.