मोहगंधा पारिजाता सख्या…

0
14

मीना समुद्र

हा स्वर्गीचा पाहुणा आपलाच, इथल्याच मातीचा होऊन गेला आहे. तो आचंद्रसूर्य असाच शुभसंदेश देत इथे उभा असेल. भक्तिदूत, प्रेमदूत होऊन तो असाच मनामनात दरवळत राहील. आशा, प्रेम, आनंद, श्रद्धा, भक्ती जागवीत जागवीत मनीमानसी हिंदोळत राहील.

श्रावण अवतरतो तो पुष्पपावले टाकीतच. सोनचाफा, जुई, केवडा, मोगरा… सारे गंध परिमळतात. त्यातला एक मंद सुगंध असतो पारिजाताचा… ठिकठिकाणी पारिजाताचा बहर ओसंडून वाहत असल्यासारखा… सर्वत्र टपटपणारी… ही पारिजाताची शुभ्र सुगंधी फुले लाल केशरी देठाची. स्वस्तिकासारखे पाकळ्यांचे टोक वळलेली ही सुदर्शन फुले. या पारिजातासंबंधी इंदिरा संतांची एक कविता आहे- ‘श्रावणाचा पारिजात’
श्रावण त्यांच्यालेखी ‘साऱ्या महिन्यांचा राणा’ आहे. आणि ही गोष्ट आपल्यालाही मनापासून पटते, कारण हा महिना सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यांचा लाडका. या महिन्यात बहरलेला पारिजात पाहून त्यांचे मन आनंदाने उचंबळून येते. पारिजातालाच ‘प्राजक्त’ असे सुटसुटीत नाव असले तरी ‘पारिजात’ असे संबोधून त्याला इंदिराबाई ‘स्वर्गीचा पाहुणा आहेस’ असे म्हणतात. श्रावण हा पारिजाताचा सखा आहे. वर्षातून एकदाच तो पारिजाताला भेटायला येतो आणि त्याचे रुक्ष जीवन उलूनफुलून येते. मंद सुगंध का बरे आहे? आणि त्याची देठे अशी लालकेशरी कशामुळे झाली असावीत? असा विचार करता करता त्यांच्या मनात एक सुंदर कल्पना चमकून जाते. आणि त्या लिहितात-
येते सोवळेसे अभ्र, तुला माखते कस्तुरी
काळ्या हिरव्या रंगाची, मोडवण मनहारी
पारिजाताच्या लांब-लांब फांद्या म्हणजे जणू श्रावणसख्याच्या स्वागताची तोरणं आहेत. वारा, पाऊस अन्‌‍ ऊन म्हणजे पारिजाताच्या जिवाभावाचे मित्र असणारे सोबती. हे सारेजण त्या पानातून मनसोक्त झिम्माफुगडी खेळतात, असे त्या म्हणतात आणि अतिशय सुंदर कलासक्त मनाने लिहून जातात-

झुले चांदवा, त्यावर हिरेमोत्यांचा ताथैय्या
पारिजाताच्या फुलांनी बहरून, पानांनी लहडून गेलेल्या झाडाला नृत्यात लवलवणाऱ्या हिरेमोत्यांची उपमा किती सार्थ वाटते. या पारिजातावर चंद्रप्रकाशाची शुभ्रमुलायम तकाकी आहे. श्रावण आल्यामुळे, तो सखा-सुहृद भेटल्याने पारिजाताचा सख्यभाव बहरून येतो आणि तो हा स्नेहवर्षाव करतो. अशी श्रावणाची अन्‌‍ बहरणाऱ्या पारिजाताची सांगड किती हृद्य वाटते! हे अजब पाहायला, ही अनोखी भेट पाहायला जणू आकाशात इंद्रधनू डोकावते ही कल्पनाही रंजक आणि रंगीन वाटते.

देवदानवांनी समुद्रमंथन केले. त्यातून निघालेल्या लक्ष्मी, कौस्तुभ वगैरे 14 रत्नांपैकी पारिजात हा देवद्वारीचा बहुगुणी वृक्ष आहे. कल्पतरूइतकाच तो महत्त्वाचा आणि उपयुक्त आहे. सत्यभामेच्या हट्टावरून, आग्रहावरून कृष्णाने तो स्वर्गातून पृथ्वीवर आणून लावला अशी कथा आहे. श्रावणासारख्या सुंदर ऋतूत कृष्णाष्टमीच्या महिन्यात तो फुलला नसता तरच नवल. पारिजात हा पत्नीवरच्या प्रेमाची खूण म्हणता येईल. पण प्रेमात जेव्हा असूया मिसळते तेव्हा ते प्रेम निष्फळ होते किंवा कोमेजून जाते. अशा या पारिजाताला द्वेष, मत्सर जराही सहन होत नाही. भक्तीच्या प्रेमाच्या ओंजळीतच ती ताजीतवानी, टवटवीत राहतात. आपल्या प्रसन्न हास्याने पाहणाऱ्याचे, देवाला वाहणाऱ्यांचे आणि वेचणाऱ्याचे मनही आनंदाने भारून टाकतात. सत्यभामेने पारिजात आपल्या अंगणात लावला खरा, पण त्याचा सडा मात्र शेजारच्या रुक्मिणीच्या अंगणात पडायचा. त्यामुळे ‘बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी’ असा प्रश्न सत्यभामेच्या मनात उमटायचा. याचे कारण रुक्मिणीबद्दलचा सवतीमत्सर तिच्या मनात जागा होता. रुक्मिणीच्या मनात मात्र कृष्णाबद्दलचे अपार प्रेम आणि भक्तिभाव असल्याने तिच्या अंगणातली वेचलेली फुले ओंजळीत ताजीच राहत. या दृष्टीने पाहिल्यास पारिजाताच्या सुकुमार फुलांना भावफुले म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

हिरव्यागार पर्णसंभारातून डोकावणाऱ्या पांढऱ्या बुंदक्या श्रावणातल्या ऊनपावसाच्या खेळात सामील होण्यासाठी फुलतात आणि हलके हलके ‘बुँद न बरसे’ अशी स्थिती असताना पूर्ण उमलून, समईच्या शुभ्र कळ्यांसारख्या लालकेशरी पोकळ देठावर थोडा वेळ राहून मग मातीवर लोळणफुगडी घालतात. आणि या मोतीपोवळ्यांनी धरणीमातेची पूजाही करतात. परड्या, हारे, टोपल्या भरभरून वेचावीत अशी नि इतकी असंख्य फुले. म्हणून तर श्रावणात शिवाला लक्षफुले वाहिली जातात. आता शहरी भागात कुणी हौसेने छोट्याशा अंगणात लावले असेल तर- नाहीतर ही प्रेमपुष्पे पाहायची ती फक्त ग्रामीण भागात. एखादी फांदी आणून लावली तरी वाढणारे हे झाड फारशी निगराणी न करताही वाढते. कारण त्याची नैसर्गिक आंतरिक इच्छा दानाची. प्रेम, उल्हास वाढविण्याची.

मंद सुगंध देत मंत्रमुग्ध करण्याची. ‘श्रावणी पाऊस हास्याचा पडे’ ही पंक्ती कवीला त्यावरूनच सुचली असावी.
या पारिजाताला हिंदीत ‘हरसिंगार’ असे नाव आहे हे पाहून आश्चर्य वाटते. हर म्हणजे शिव, हा तांडवनृत्य करणारा. गळ्यात नररुंडमाळा घालणारा, रुद्राक्षमाळा घालणारा आणि हातात सर्पभूषणे घालणारा, चिताभस्म चर्चिणारा अतिशय क्रोधीत होणारा देव जरी असला तरी त्याने शीतल सुंदर चंद्रकला धारण केली आहे. गंगा जटामुकुटात विराजमान आहे. त्यामुळे तो आशुतोष भक्तांनी अर्पण केलेल्या या शुभ्रफुलांनी संतुष्ट होतो अशी समजूत आहे. हर आणि हरी दोघेही या भावकुसुमांनी विभूषित झालेले दिसतात. श्रावणातला पाऊस हा प्राजक्तफुलांचा वर्षावच वाटतो. फुलांना गर्द हिरवाईची साथ असते आणि सुगंधाची साक्ष असते. ‘मोहगंधा पारिजाता’ला एका गाण्यात ‘सख्या’ म्हटले आहे आणि कोमेजतानाही हास्य कायम ठेवणाऱ्या त्या फुलाची तारीफ केली आहे. फुलांची अमाप, अगणित, असंख्य, वारेमाप उधळण करणारा पारिजात हा उदारतेचे तसेच पावित्र्याचे, शुभाचे प्रतीक आहे. त्यांना पाहून मांगल्य मनात उमलते. तिरंग्यात याच्याच पानाफुलांचे रंग पावित्र्य, त्याग, शौर्याचे प्रतीक होऊन येतात.

हा स्वर्गीचा पाहुणा आपलाच, इथल्याच मातीचा होऊन गेला आहे. तो आचंद्रसूर्य असाच शुभसंदेश देत इथे उभा असेल. भक्तिदूत, प्रेमदूत होऊन तो असाच मनामनात दरवळत राहील. सुंदरतेने आणि नजाकतीने मोहवीत राहील. आशा, प्रेम, आनंद, श्रद्धा, भक्ती जागवीत जागवीत मनीमानसी हिंदोळत राहील.