मोसमी पावसाच्या इंचांचे शतक पूर्ण

0
29

>> राज्यात सरासरीपेक्षा 18 इंच जादा पाऊस

राज्यात मोसमी पावसाने अखेर इंचांचे शतक काल पूर्ण केले असून आत्तापर्यंत एकूण 100.13 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा 18.1 टक्के एवढे जास्त नोंद झाले आहे. सांगे येथे सर्वाधिक 115.82 इंच पावसाची नोंद झाली. तर, मुरगाव येथे सर्वांत कमी 84.09 इंच पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते. तर, जुलै महिन्यात पावसाची विक्रमी नोंद झाली. मात्र, जुलै महिन्याच्या 27 तारखेनंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पावसाच्या इंचांचे शतक पूर्ण होण्यास विलंब झाला.

राज्यात यावर्षी 12 जून रोजी मोसमी पावसाचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात आले. मोसमी पावसाचे आगमन जाहीर करण्यात आल्यानंतर साधारण 26 जूनपर्यंत पावसाचे प्रमाण कमीच होते. राज्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. मात्र राज्यात 26 जूननंतर हळूहळू पावसाच्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली. गत 27-28 जून रोजी आतापर्यंतच्या सर्वाधिक 5.61 इंच पावसाची नोंद झाली. जून महिन्यात पावसाची तूट 30 टक्क्यांवर पोहोचली होती. त्यानंतर जुलै महिन्यात चांगल्या पावसाची नोंद झाली. या महिन्यात सुमारे 71 इंच पावसाची नोंद झाली. तथापि, 28 जुलैपासून पावसाचे प्रमाण पुन्हा एकदा कमी झाले आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत पावसाचे प्रमाण कमी आहे.

राज्यातील जोरदार पावसामुळे साळावली, गावणे, चापोली, पंचवाडी, आमठणे ही पाच धरणे भरली आहेत. तर, अंजुणे धरणामध्ये 88 टक्के पाणी साठा आहे.
राज्यात चोवीस तासांत केवळ 7.8 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. सांगे, साखळी, म्हापसा आणि केपे येथे पावसाची नोंद झाली आहे.