राज्यात मोसमी पावसाने इंचाचे पाऊण शतक पूर्ण केले असून आत्तापर्यंत 77.04 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पावसाची आतापर्यंतच्या सरासरीपेक्षा 6.6 टक्के जास्त नोंद झाली आहे. धारबांदोडा आणि सांगे या दोन विभागांत पावसाने इंचाचे शतक पूर्ण केले आहे.
दरम्यान, चोवीस तासांत पावसाचे प्रमाण कमी झाले असून केवळ 0.62 इंच पावसाची नोंद झाली आहे. येथील हवामान विभागाने राज्यात 28 ते 30 जुलै या काळात पावसाची शक्यता व्यक्त करून पिवळा अलर्ट जारी केला आहे. गेल्या चोवीस तासांत पाऊस थोडा कमी झाला असून 0.62 इंच पावसाची नोंद झाली असून पेडणे येथे सर्वांधिक 1.78 इंच पावसाची नोंद झाली आहे. केपे येथे 1.18 इंच, धारबांदोडा येथे 1.11 इंच, सांगे येथे 0.91 इंच, काणकोण येथे 0.59 इंच पावसाची नोंद झाली. मागील सात दिवसांत साधापण 15.36 इंच पावसाची नोंद झाली आहे.
धारबांदोडा, सांगेत इंचांचे शतक पूर्ण
धारबांदोडा आणि सांगे यांच्यानंतर केपे आणि वाळपई विभागात पाऊस इंचाचे शतक पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. धारबांदोडा येथे 105.94 इंच आणि सांगे येथे 101.87 इंच नोंद झाली आहे. तर, वाळपई येथे 97.77 इंच आणि केपे येथे 97.40 इंच पावसाची नोंद झाली आहे. मुरगाव येथे सर्वांत कमी 50.42 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील केवळ आमठाणे धरण वगळता इतर सर्व धरणे भरून वाहत आहेत. या वर्षी मे महिन्यात सुमारे 25 इंच पावसाची नोंद झाली आहे.
एकूण पाऊस
राज्यातील आतापर्यंतचा एकूण पाऊस हा म्हापसा 61.75 इंच, पेडणे 70.07 इंच, पणजी 65.39 इंच, जुने गोवा 72.50 इंच, साखळी 77.30 इंच, वाळपई 97.77 इंच, फोंडा 85.17 इंच, धारबांदोडा 105.94 इंच, काणकोण 76.29 इंच, दाबोळी 53.91 इंच, मडगाव 63.03 इंच, मुरगाव 50.42 इंच, केपे 97.40 इंच, सांगे 101.87 इंच झाला आहे.

