नंद्रण-मोले येथे रविवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघात प्रकरणी कुळे पोलिसांनी दुचाकीचालक राजेश देसाई याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. रविवारी सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास नादुरुस्त अवस्थेत रस्त्यावर पार्क केलेल्या मालवाहू ट्रकला दुचाकीची धडक बसून दुचाकीवरील दोघा जणांचा मृत्यू झाला होता. त्यात दुचाकीचालक राजेश तुकाराम देसाई (25, रा. आकेटी-अनमोड) व निखिल मडीवल (24, रा. हलियाळ-कर्नाटक) यांचा अपघातात मृत्यू झाला होता. कुळे पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला होता. त्यानंतर दोन्ही मृतदेहांवर मडगाव येथील इस्पितळात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यांच्या गावात जत्रा असल्याने दोन्ही मृतदेह मडगाव येथील शवागृहात ठेवण्यात आले होते. सोमवारी दोन्ही मृतदेह कर्नाटक राज्यात नेण्यात आले.