मोरजीत 22 लाखांचे ड्रग्ज जप्त

0
7

कारवाईत दोन विदेशींसह तिघांना अटक

मांद्रे पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली. मोरजी येथील बांदेकरवाडा परिसरातील एका गेस्ट हाऊसवर छापा टाकून दोन सेनेगाली नागरिकांसह एकूण तीन संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल 222.92 ग्रॅम वजनाचा कोकेनसदृश पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे 22 लाख 29 हजार 200 रुपये असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात बौबा सांबा (31) हा सेनेगलचा नागरिक असून तो सध्या ग्रीनव्ह्यू गेस्ट हाऊस, बांदेकरवाडा, मोरजी येथे राहत होता. त्याच्यासोबत अलिऊ मुस्ताफा (31) या आणखी एका सेनेगाली नागरिकालाही ताब्यात घेण्यात आले. तोही याच गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास असल्याचे पोलिसांच्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. तसेच आणखी एका संशयितासह एकूण तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांकडे असलेला अमली पदार्थ कोकेन असल्याचा संशय असून त्याचे एकूण वजन 222.92 ग्रॅम असल्याचे सांगण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या या संशयित अमली पदार्थाची अंदाजे किंमत 22,29,200 इतकी आहे.

या कारवाईत पोलिसांनी संशयितांकडून 10,85,300 रुपयांची रोकड तसेच इतर साहित्यही जप्त केले. या संपूर्ण कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 33,14,500 असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिसांनी वरील संशयितांसह एकूण तीनजणांना 23 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 2.50 वाजता अटक केली. या प्रकरणात अमली पदार्थ नेमके कोठून आणण्यात आले, त्यांची विक्री अथवा वितरण कोणाला केले जाणार होते, या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का तसेच जप्त करण्यात आलेल्या मोठ्या रकमेचा अमली पदार्थांच्या व्यवहाराशी संबंध आहे का, याबाबत पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
पेडणे पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.