दोघे जखमी; अपघातानंतर चालक फरार; मालकाला अटक; एकूण 4 वाहनांना धडक
मोरजी येथील कांचोळेवाडा परिसरात मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी थारचालक आणि वाहन मालकाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. या अपघातात मृत पावलेल्या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातानंतर थारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. दरम्यान, थारचा मालक रोहित राठोड याला पोलिसांनी अटक
केली आहे.
मांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे 10.50 वाजण्याच्या सुमारास आश्वेहून मोरजीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा थार (जीए-03-एम-9161) वाहनाने प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ॲक्टिव्हा दुचाकीला धडक दिली. त्यानंतर समोरून जात असलेल्या फॅसिनो आणि ग्राझिया या दोन दुचाकींना जोरदार धडक देत पुढे उभ्या असलेल्या टाटा टेम्पोवर आदळली.
या अपघातात फॅसिनो दुचाकीवरील मागील सीटवर बसलेल्या एका अज्ञात महिलेचा मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार देबाशीष सामल (32, मूळ रा. ओडिशा) आणि गतीश सामल (35, मूळ रा. ओडिशा) हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातानंतर थारचा चालक विक्रम अशोक गाबा (रा. हरियाणा) हा फरार झाला. तसेच जखमींना मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता तो पळून गेल्याचा आरोप आहे. संबंधित थार वाहन खासगी असून ते भाडेतत्त्वावर चालविण्यास दिल्याप्रकरणी वाहनमालक रोहित राठोड याच्याविरुद्धही गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणी मांद्रे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयदीप आर. पालयेकर करीत आहेत.

