समाजमाध्यमावर मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत बदनामीकारक माहिती प्रसिद्ध केल्या प्रकरणात नवी दिल्ली येथील रिअल टॉक क्लिप्स या फेसबुकचा मालक, प्रशासक अक्षय वशिष्ठ (नवी दिल्ली) याला मोप विमानतळ पोलिसांनी काल अटक केली आहे.
गोवा पोलीस मुख्यालयातील सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलमधील पोलीस शिपाई सूरज शिरोडकर यांनी या प्रकरणी मोप विमानतळ पोलीस स्थानकावर दि. 15 सप्टेंबर 2025 रोजी तक्रार दाखल केली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘रिअल टॉक क्लिप्स’ या फेसबुक चॅनलचा मालक, प्रशासक अक्षय वशिष्ठ नावाच्या संशयित आरोपी आणि इतरांनी फेसबुक चॅनलवर रिअल टॉक क्लिप या नावाने एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये गोवा का हॉन्टेड एअरपोर्ट असे कॅप्शन आहे. त्यात मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल खोटी, चुकीची माहिती प्रकाशित केली आहे.
या प्रकरणी मोप पोलिसांनी केलेल्या तपासात संशयित आरोपी दिल्लीत राहत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, मोप विमानतळ पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक विराज सावंत आणि पोलीस शिपाई रविचंद्र बांदिवाडकर यांनी नवी दिल्ली येथे जाऊन संशयित आरोपीला द्वारका, दिल्ली येथून ताब्यात घेऊन अधिक तपासासाठी मोप पोलीस स्थानकावर आणून काल संध्याकाळी त्याला रीतसर अटक केली. संशयित आरोपीकडून एक मोबाईल, एक लॅपटॉप आणि एक कॅमेरा हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली या प्रकरणी तपास सुरू आहे.

