मोपा विमानतळाशी (लिंक रोड) जोडणाऱ्या रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांकडून आकारण्यात येणाऱ्या टोलच्या सुधारित दराची अंमलबजावणी एक वर्षासाठी स्थगित ठेवण्याची विनंती केंद्रीय महामार्ग व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे. सुधारित टोल दराच्या अंमलबजावणीवर फेरविचार करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी काल पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
दिगंबर कामत यांनी नवी दिल्ली दौऱ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली. गडकरी यांच्यासमोर मोपा लिंक रोडवरील टोलच्या सुधारित दराचा प्रश्न मांडून त्यात लक्ष घालण्याची विनंती केली. सुधारित टोल दराची अंमलबजावणी एक वर्ष लांबणीवर टाकण्याची विनंती केली आहे. तसेच, राज्यातील विविध विकासकामांबाबत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांना मान्यता देण्याची विनंती करण्यात आली, असेही कामत यांनी सांगितले.
पर्वरी येथील नवीन सहापदरी उड्डाणपुलाचे उद्घाटनआगामी गणेश चतुर्थीपूर्वी करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता केली जाणार आहे. गडकरी यांनी येत्या 10 सप्टेंबर रोजी पर्वरी येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यास मान्यता दिली, असेही कामत यांनी सांगितले.
केंद्रीय वजन व माप खात्याचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गोव्यात झालेल्या वजन व माप खात्याच्या राष्ट्रीय परिषदेच्या वेळी राज्यातील वजन व माप खात्याला प्रयोगशाळा उभारण्यासाठी आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले होते. जोशी यांच्याशी वजन व माप खात्याच्या विषयावर चर्चा केली.

