मोपा पठारावरील हिवाळ्यातल्या आठवणी

0
18
  • ज्ञानेश्वर वरक
    (कासारवर्णे पेडणे)

आता आम्ही मोठे झालो. दुचाकी देखील आहेत, रस्ते आहेत पण जत्रेला जाण्यासाठी जी हौस लहानपणी होती ती आता राहिलेली नाही. पण लहानपणाची आठवण आली की डोळे अजूनही पाणावतात.

दिवाळी झाली की हिवाळ्याला सुरुवात होते. हे दोन महिने थंडी असते. मोपा पठारावर फक्त धनगर कुटुंब वास्तव्य करत होते. शेळ्या, गुरे, शेती व दिस मजुरी हा मुख्य उदरनिर्वाहाचा मार्ग. पावसाळ्याची शेती आटपली की भाताची मोठमोठी कणसं शेतात काढलेल्या खळ्याभोवती लागायची. पुढच्या पावसाला गुरांची गवताची सोय व्हावी म्हणून कणसांची मळणी काढून गवत साठवून ठेवावे हाच मार्ग. दिवाळीपर्यंत चुकून माकून पाऊस असायचा. दिवाळीनंतर पाऊस पूर्णपणे गेल्याने शेतात खळ्याचे काम घरातील कर्त्या मंडळी पूर्ण करायच्या. त्या पठारावर एक ‘सुखताळे’ नावाचे तळे होते. या तळ्यात जानेवारी महिन्यापर्यंत पावसाचे साठलेले पाणी असायचे. खळे करण्यासाठी सर्वजण त्याच तळ्याचे पाणी वापरत.

एकदा खळे पूर्ण झाले् की सर्वांनाच एकदा मळण्या काढून भात घरात कधी नेतो असे व्हायचे. ज्याच्याकडे स्वतःची गुरे आहेत त्याच्या मळण्या लवकर आटपायच्या आणि कोण दुसर्‍यावर अवलंबून आहे त्याला वाट पाहत बसावे लागे. मळणीला सुरुवात झाली की आम्हा मुलांना फक्त मळणी हाकण्याचे काम असायचे. भातात मळणीमागून फिरताना हातात सूप घ्यावे लागे कारण बैल कधी शेण टाकतील हे समजत नसे आणि ते भातात पडायला देऊ नका अशी ताकिद आम्हाला असायची. आम्ही कधी कधी बैलांच्या शेपटीला पकडून मागून फिरायचो. दुपारचे ऊन जरा कमी होताच मळणीला सुरुवात व्हायची व ती संपेपर्यंत रात्रीचे दहा वाजायचे. मळणी एकदा संपली की गवत झाडून एका बाजूला आणि भात खळ्याच्या एका कोपर्‍यावर सुपात भरून ओतले जायचे. सर्व मळण्या संपल्यानंतर एका दिवशी खळ्याची पूजा करून ते भात घरात आणले जायचे.

मळणीचे काम आणि जत्रा सुरू होण्याची वेळ एकच असायची. आम्हाला जत्रेला जायची खूप हौस असायची. पण काम असताना जत्रा मात्र आमच्या नशिबी नव्हती. आम्ही कड्याखाली जवळ असलेल्या एका गावच्या जत्रेला दरवर्षी सर्वजण जायचो. जवळपास २० ते २५ पूर्ण वाड्यावरची माणसे एकामागून एक चालत जात असू. कड्याहून खाली उतरायला खडकाळ जंगलातून पायवाट होती. संपूर्ण काळोख असायचा. पुढे चालणार्‍याकडे टॉर्च असायचे आणि मागून कुणाच्या तरी हातात असलेच तर एक माडाचे पेटवलेले चुलत. ते पण लवकरच संपायचे. पठारावर चांदण्यांचा उजेड दिसायचा पण एकदा कड्याखाली उतरले की दिसत नसे. समोरचा माणूस कसा चालत आहे त्याच्या आदमासाने मागून सर्वजण लोटायचे. जत्रेच्या जवळ पोचताच जत्रेमध्ये जळणार्‍या विजेचा उजेड दूरपर्यंत आम्हाला दिसत असे. एकमेकांसोबत गप्पागोष्टी करत चालताना वाट कधी संपायची आणि जत्रेत पोचायचो ते समजतदेखील नसे. आम्ही पूर्ण रात्र जागे राहून जत्रा बघायचो. रंगमंचावरील सर्व नटरंग आम्हाला खरेच वाटायचे पण घरी परतण्याच्या वेळी बाबा आणि काका त्यांची नावे घेत असत. त्याने ऋषीचा पार्ट केला तर आणि कुणी राजाचा असे ते बोलत असत. आम्ही मुले जत्रेमध्ये खेळणी घेण्यासाठी मग्न व्हायचो. पण खेळणी घेण्यासाठी आपल्या खिशात जास्तीत जास्त दहा ते वीस रुपये असायचे. पण त्यावेळी दहा रुपयातच एक गाडी यायची. फुगे तर दोन रुपयांना मिळायचे. आम्ही फुगे जास्त घेत नसू कारण ते वाटेत येताना जंगलातून काटाकुटा लागून फुटून जायचे. जत्रेतून घरी परततांना डोळ्याची पापणी वाटेत चालता चालता मिटायची. घरी कसे एकदा पोचतो आणि अंथरूण पकडतो असे आम्हाला व्हायचे. घरी परतताना वाट मात्र खूप लांब होत असे.

त्या पठारावर रात्रीच्या वेळी एक तर्‍हेचे वेगळेच वातावरण होते. सभोवताली पूर्णपणे कातळ आणि कड्याखाली जंगल. पूर्ण दिवस कडक उन्हाने तापलेले कातळ रात्रीच्या वेळी हवा गरम करायचे. त्यामुळे कड्यावर येताच रात्रभर थंडीने कुडकुडलेल्या शरीरात ऊब यायची. पूर्ण दिवस दुसर्‍या दिवशी आम्ही झोपून राहायचो. आमच्या नशिबी त्यावेळी एकच जत्रा होती. कारण तेच एक गाव पठारावरून कमी प्रवासात आम्ही गाठू शकत होतो. आणखी सर्व गावं दूरच्या अंतरावर असल्याने आम्हा मुलांना घेऊन रात्रीच्या वेळी अंधारातून प्रवास करणे त्यावेळी एक तर्‍हेचे् संकट होते. आता आम्ही मोठे झालो. दुचाकी देखील आहेत, रस्ते आहेत पण जत्रेला जाण्यासाठी जी हौस लहानपणी होती ती आता राहिलेली नाही. पण लहानपणाची आठवण आली की डोळे अजूनही पाणावतात. त्यावेळी आम्हाला वाटायचे की आम्हीच अशा दूर प्रवासाच्या पठारावर का जन्म घेतला. पण त्या जन्माचे सार्थक काय होते हे आत्ता लक्षात येते.