मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू

0
3

>> मणिपूर हिंसाचारावरून काँग्रेसचे मोदींना 3 प्रश्न

मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर काल दुपारी 12 वाजल्यापासून चर्चा सुरू झाली. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या एकजुटीची चाचपणीदेखील याद्वारे होणार आहे. संख्याबळानुसार केंद्र सरकारला सध्या तरी कोणताही धोका नाही. काल अविश्वास प्रस्तावावर काँग्रेसचे खासदार तरुण गोगोई यांनी सुरुवात केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीन प्रश्न विचारले. तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असताना नरेंद्र मोदी तिथे का गेले नाही? मणिपूरवर बोलण्यास त्यांना 79 दिवस का लागले? मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का हटवले नाही? असे प्रश्न गोगोई यांनी विचारले.

पंतप्रधानांना हे मान्य करावे लागेल की त्यांचे डबल इंजिन सरकार, मणिपूरमधील त्यांचे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये 150 लोकांचा मृत्यू झाला. सुमारे 5000 घरे जाळली गेली, सुमारे 60,000 लोक मदत शिबिरात आश्रय घेत आहेत आणि सुमारे 6500 एफआयआर नोंदवले गेले आहेत. ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संवादाचे, शांततेचे आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करायला हवे होते, त्यांनी चिथावणीखोर पावले उचलल्याने समाजात तेढ निर्माण झाल्याचा आरोप तरुण गोगोई यांनी केला. पंतप्रधान मोदी केवळ मणिपूरवरच नव्हे तर अदानी मुद्द्यावरही मौन बाळगून आहेत. चीनबाबतही मौन सोडले नाही. मोदी त्यांची चूक मान्य करत नाहीत, असे गोगोई यांनी म्हटले.

दरम्यान, अविश्वास ठरावावरील पहिले भाषण राहुल गांधी करतील अशी अटकळ बांधण्यात येत होती; मात्र राहुल गांधी यांनी भाषण केले नाही. राहुल गांधी यांच्या भाषणाबाबत काँग्रेसकडून अचानक रणनीतीमध्ये बदल करण्यात आला.