मोदी मॉस्कोत

0
9

एकीकडे युक्रेनशी युद्ध सुरू असताना दुसरीकडे भारत – रशिया द्विपक्षीय बैठक मॉस्कोत पार पडते आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची गळाभेटही नुकतीच झाली. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीला जगातील सर्वांत रक्तरंजित गुन्हेगाराला मिठी मारताना पाहणे दुर्दैवी असल्याची टीका युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी त्यावर केली आहे. मात्र, भारत आणि रशिया यांचे पूर्वापारचे मैत्रिपूर्ण संबंध लक्षात घेता केवळ युक्रेनसाठी त्या देशाशी वैर पत्करणे भारताला परवडणारे नाही. रशिया सोव्हिएत रशिया होता तेव्हापासून भारताशी त्याचे घनिष्ठ संबंध होते. इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदाच्या काळात तर ते शिखरावर पोहोचले होते. पंतप्रधानपदी मोदी आल्यानंतर नव्या विदेशनीतीनुसार अमेरिकेच्याही जवळ जाण्याचा प्रयत्न भारताने केला परंतु रशियाशी मैत्रीही कायम राखली. गोव्यात जेव्हा ब्रिक्स परिषद झाली, तेव्हा तिच्या पार्श्वभूमीवर भारत – रशिया द्विपक्षीय बैठकही पार पडली होती आणि तेव्हा दोन्ही देशांदरम्यान अब्जावधींचे करार संमत करण्यात आले होते. त्यामध्ये युद्धनौका, हवाई सुरक्षा यंत्रणा, हेलिकॉप्टरांची संयुक्त निर्मिती, ऊर्जा, जहाजबांधणी, अवकाश संशोधन, अशा अनेक क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य करारांचा समावेश होता. मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मानही पाच वर्षांपूर्वी देण्यात आलेला होता. रशिया आणि भारताचे संबंध नेहमीच मैत्रिपूर्ण राहिले आहेत. भारताच्या काश्मीरसारख्या प्रश्नांवर रशियाने नेहमीच भारताची पाठराखण केली आहे. परिणामी युक्रेनच्या सामीलीकरणासाठी जेव्हा रशियाने दोन वर्षांपूर्वी भाडोत्री सैनिक घुसवले तेव्हा त्याबाबत भारताला सावध भूमिका घ्यावी लागली. रशियात एकीकडे पुतीन – मोदी भेट सुरू असताना तिकडे युक्रेनची राजधानी क्यीवमध्ये एका इस्पितळावर रशियाच्या क्षेपणास्त्राच्या माऱ्यात चोवीस लोक मृत्युमुखी पडले. त्यामुळे झेलेन्स्की जरी मोदींच्या सध्याच्या रशिया भेटीवर तुटून पडले असले आणि जागतिक शांततेसाठीच्या प्रयत्नांना बसलेला हा मोठा झटका म्हणत असले, तरी पंतप्रधान मोदींनी रशियामध्ये पुतीन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडलेली भूमिकाही लक्षात घेण्यासारखी आहे. कोणताही प्रश्न युद्धभूमीवर सुटू शकत नाही. त्यासाठी परस्पर संवाद आणि मुत्सद्देगिरीच आवश्यक ठरते अशी भारताची रोखठोक भूमिका मोदींनी पुतीन यांच्यापुढे मांडली आहे. अर्थात, भारताने कितीही समजावले तरी मानणाऱ्यांमधले पुतीन नाहीत हे उघड आहे. युक्रेनशी युद्ध सुरू असतानाच ते रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी तब्बल 87 टक्के मते मिळवून पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदी आलेले आहेत. स्टालीनपेक्षाही जास्त काळ त्या पदावर राहिलेल्या पुतीन यांचा युद्धखोर स्वभाव आजवर जगाला परिचित झालेला आहे. त्यामुळे मोदींनी सल्ला दिला आणि तो मानून पुतीन मागे हटले असे होणार नाही. परंतु किमान युक्रेन युद्धात फसवून सामील करून घेतलेल्या भारतीयांचा प्रश्न जरी पुतीन यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे सोडवला तरीही ती भारतासाठी मोठी उपलब्धी ठरेल. उत्तर भारतातील विशेषतः पंजाब आणि हरियाणातील कित्येत निष्पाप तरुणांना विदेशात नोकरी देण्याचे आमीष दाखवून काही ठकसेनांनी थेट रशियासाठी भाडोत्री सैनिक म्हणून युक्रेनविरुद्ध लढायला पाठवले आहे. मध्यंतरी असे दोन भारतीय सैनिक मारलेही गेले. त्यानंतर काहींनी भारत सरकारला आपली सुटका करण्याचे आवाहन केले. मोदींनी हा विषय पुतीन यांच्याशी रात्रीच्या भोजनप्रसंगी झालेल्या बैठकीत काढल्याचे सांगितले जात आहे. त्यावर रशियाने ह्या अशा प्रकारे फसवून सैन्यात भरती केल्या गेलेल्या भारतीयांना मुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे अशाही बातम्या आल्या आहेत. हे खरे असेल तर ते मोदींच्या रशिया भेटीचे मोठे यश असेल. सध्या असे किमान दोन डझन भारतीय रशियात मरणाच्या दारात उभे आहेत. त्यांची तरी ह्यामुळे सुटका होऊ शकेल. रशियामधील भारतीयांनाही मोदींनी संबोधित केले. भारत हा कसा वेगाने प्रगतिपथावर आहे आणि आघाडीची जागतिक अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने कसा झेप घेत आहे त्याचा लेखाजोखा पंतप्रधान मोदींनी त्यांच्यापुढे मांडला. जगाच्या कानाकोपऱ्यात आज भारतीय वंशाचे नागरिक दिसतात. रशियाही त्याला अपवाद नाही. रशिया व भारत यांचे हितसंबंध अनेक क्षेत्रांमध्ये आहेत. तेथील तेल व वायू कंपन्यांमध्येही भारताची मोठी गुंतवणूक आहे. संरक्षणापासून संशोधनापर्यंतच्या क्षेत्रांमध्ये असे परस्पर सहकार्य असल्यानेच भारताला ही मैत्री जोपासण्याची कसरत करावी लागते आहे. एकीकडे अमेरिकादी पाश्चात्य राष्ट्रे नाटोच्या माध्यमातून युक्रेनला समर्थन देत असताना भारताला रशियाशी आपली मैत्री राखणे भाग पडते आहे ते ह्याचसाठी.