मोदींच्या वाढदिनानिमित्त सेवा पंधरवड्यास आरंभ

0
14

राज्यातील नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गोव्यातील व्यापारी आणि नागरिकांनी स्वदेशीला प्राधान्य दिले पाहिजे. आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण भारतासाठी स्वदेशीचा पुरस्कार करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेश येथील कार्यक्रमात बोलताना स्वदेशीचा नारा दिला आहे असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारने आयोजित सेवा पंधरवड्याला काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पणजीत कला अकादमीच्या आवारात सुरुवात करण्यात आली. त्यावेळी संबोधित करताना मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी राज्य मंत्रिमंडळातील महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हर्ळणकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, रूडाल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर, मुख्य सचिव व्ही. कांडावेलू यांची उपस्थिती होती.

स्वंय-मदत गटांना कर्ज वितरण
ग्रामीण विकास खात्याने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्वयं-मदत गटांना सुमारे 62 कोटींंच्या कर्ज साहाय्याचे वितरण करण्यात आले. तसेच 48 आजीविका वाहनांना मंजुरी, स्वयंपूर्ण सखींची नियुक्ती, एसव्हीईपीअंतर्गत नवीन प्रकल्पांचा शुभारंभ यासह अनेक उपक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार या योजनेअंतर्गत राज्यभरात महिलांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जजाणार आहे. मातृ वंदना योजनेअंतर्गत, प्रथम मुलीला जन्म देणाऱ्या महिलांना 5 हजार तर दुसऱ्या मुलीला जन्म देणाऱ्या महिलांना 6 हजार दिले जातील, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
मोदींच्या उपक्रमात सहभाग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील अनेक परिवर्तनकारी उपक्रमांच्या शुभारंभात कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्हर्च्युअल पद्धतीने भाग घेतला.

शहा करणार ‘माझे घर’ योजनेचे उद्घाटन ः सावंत
राज्य सरकारच्या माझे घर योजनेचा राज्यातील 50 टक्के लोकांना लाभ मिळणार आहे. राज्यातील सरकारी, कोमुनिदाद जमितील 28 फेब्रुवारी 2014 पूर्वीची बेकायदा घरे नियमित केली जाणार आहेत. तसेच, 20 कलमी कार्यक्रमातील भूखंडधारकांना मालकी हक्क दिला जाणार आहे. माझे घर योजनेच्या कायदेशीर प्रक्रिया सुरू असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेचे अर्ज उपलब्ध केले जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते माझे घर योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

स्वयंसाहाय्य गटांना कर्ज
ग्रामीण विकास खात्याकडून महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रात्सोहन दिले जात आहे. महिला स्वयंसाहाय्य गटांना सुमारे 62 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत गोव्यात 50 हजार महिलांना 350 कोटींचे कर्ज देण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुढे बोलताना सांगितले.