Home बातम्या मोदींच्या नेतृत्वाखाली मूल्याधिष्ठित सरकार येईल

मोदींच्या नेतृत्वाखाली मूल्याधिष्ठित सरकार येईल

0

कांपाल मैदानावर श्रीपाद नाईक सत्कार समितीतर्फे आयोजित केलेल्या नागरी सत्कार सोहळ्यात पावसाची उपस्थिती असतानाही जमलेल्या जनसमुदायासमोर प्रमुख पाहुणे म्हणून नायडू बोलत होते. त्यांच्या हस्ते गोमंतकीय जनतेच्यावतीने पुष्पहार व मानपत्र अर्पण करून नाईक यांचा गौरव करण्यात आला.

या देशाला तारण्यासाठी विशिष्ट धोरण, कार्यक्षमता, प्रामाणिकपण अशा गुणांनी संपन्न असलेल्या नेत्यांची गरज आहे. हे सर्व आदर्श श्रीपाद नाईक यांच्यात आहेत, असे नायडू यांनी सांगितले. त्यांच्या या गुणांमुळेच अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश केला होता, असे ते म्हणाले. गोवा हा सर्व बाबतीत देशासमोर आदर्श आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व श्रीपाद नाईक हे दोन्ही नेते गोव्याचा व देशाचा आदर्श पध्दतीने विकास करतील, असा विश्‍वासही नायडू यांनी व्यक्त केला.

हिंदू संकल्पना व्यापक

हिंदू या शब्दाचा धसका घेण्याची गरज नाही, हिंदू हा धर्म नसून ती जीवनपध्दती असल्याचे नायडू यांनी सांगितले. हिंदू, हिंदुस्थान हा शब्द मर्यादित स्वरुपात वापरला जात असून खरे तर हिंदू म्हणजे प्राचीन संस्कृतीचे, अस्मितेचे प्रतीक असल्याचे नायडू यांनी सांगितले.

भाऊंशी सलोख्याचे संबंध : पर्रीकर

श्रीपाद भाऊ हे वैयक्तिक हानी सोसूनही जनेतची सेवा करणारे नेते आहेत. आपले व त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. त्यात वितुष्ट आणण्याचा काही लोक प्रयत्न करीत असतात, पण ते कदापि यशस्वी होणार नाहीत, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. श्रीपाद भाऊंमुळेच भाजपला गोव्यात आजचे स्थान प्राप्त झाले आहे. आपल्याला जे शक्य नाही ते भाऊंना शक्य होते. त्यांच्या नम्र व प्रामाणिक नेतृत्वामुळे जनतेच्या हृदयात त्यांना स्थान मिळाल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.

संपूर्ण जनतेचे नेते

श्रीपाद भाऊ हे केवळ बहुजन समाजाचे नेते नाहीत, ते संपूर्ण जनतेचे नेते असल्याचे सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. भाऊना एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित ठेवणे चुकीचे ठरेल. त्याना संपूर्ण गोमंतकीय जनतेच्या हृदयात स्थान आहे. त्यामुळेच पाऊस पडत असतानाही जनसमुदाय जमल्याचे आर्लेकर यांनी सांगितले.

राजकारण हे सेवेचे साधन

राजकारण हे समाजसेवेचे साधन आहे. त्याचा चांगला उपयोग केल्यास संपूर्ण समाजाचे कल्याण होते, अशी आपली धारणा आहे. संपूर्ण जनतेने दिलेले प्रेम म्हणजेच आपल्या जीवनातील कमाई असल्याचे उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी सत्कार सोहळ्यास उत्तर देताना सांगितले. आपला जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. त्यामुळे असामान्य स्वप्ने रंगविण्याचा आपण कधीही विचार केला नाही. परंतु नियतीच्या मनात काय होते याची कल्पना नव्हती. जनतेने दिलेल्या प्रेमामुळे आपल्याला गावच्या पंच पदापासून देशाची पंचायत असलेल्या लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व रा. स्व. संघात संबंध आल्याने जीवन कृतार्थ बनल्याचे उद्गार त्यांनी याप्रसंगी काढले.

जीवन हे समाजासाठी समर्पण करण्यासाठीच असते याचा साक्षात्कार झाल्यापासून आपण समाजसेवेत उतरल्याचे नाईक यांनी सांगितले. आपण मातृभूमीचे ऋण फेडण्याचे काम करीत आहोत, त्यामुळे सत्तेचा कैफ कधी चढला नाही, असे सांगून आपल्या षष्ठब्दिपूर्ती सोहळ्यानिमित्ताने सत्कार केल्याबद्दल नाईक यांनी जनतेचे आभार मानले.

लोकप्रतिनिधी कसा असावा असा जर कोणीही प्रश्‍न विचारला तर आपण कोणतेही वर्णन न करता श्रीपाद नाईक यांच्यासारखा असावा असे सांगेन. त्यांच्यात लोकप्रतिनिधीसाठी असलेले सर्व आदर्श असून ते सर्व लोकप्रतिनिधीनी स्वीकारावेत असे आवाहन स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी आपल्या भाषणात केले.

२०१४ साली होणार्‍या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार्‍या मंत्रिमंडळात श्रीपाद नाईक यांचा क्रीडामंत्री म्हणून समावेश व्हावा, अशी इच्छा डॉ. रुफीनो मोंतेरो यांनी व्यक्त केली. श्रीपाद भाऊंचा नम्रपणा अन्य कुणातही दिसला नाही, असे सांगून काल सकाळी आपण नाईक यांच्या कल्याणासाठी चर्चमध्ये प्रार्थना केल्याचे फा. ऑस्कर कोद्रय यांनी सांगितले. नाईक यांचे समाजासाठी फार मोठे योगदान आहे. त्यांचा हा सत्कार संपूर्ण समाजातर्फे होत असल्याने व नाईक यांच्या प्रेमापोटी सहभागी झाल्याचे सांगून धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी औद्योगिक जगताच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या. नाईक यांनी जे काही केले ते राज्याच्या व देशाच्या प्रगतीसाठी केले असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसौझा, रा. स्व. संघ चालक सुभाष वेलिंगकर, सहकारमंत्री दीपक ढवळीकर यांचीही भाषणे झाली. प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मानपत्राचे वाचन डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. सूत्रसंचालन दामोदर नाईक यांनी केले. गोविंद पर्वतकर यांनी आभार मानले. स्वाती केरकर यांनी नाईक यांच्या पत्नी सौ. विजया नाईक यांची ओटी भरण्याचे काम केले. या कार्यक्रमास सरकारातील सर्व मंत्री, आमदार, उद्योगपती, कार्यकर्ते समाजाच्या सर्व स्तरातील मंडळी उपस्थित होती. आ. विष्णू सुर्या वाघ मात्र व्यासपीठावर उशिरा पोचले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाऊस पडत असतानाही लोकांना बसून राहण्याचे आवाहन केले व स्वत: पावसात भिजत फिरले. सार्वजनिक कामासाठी अशा पध्दतीने पावसात भिजत वावरणार्‍या मुख्यमंत्र्यांना पाहून इतरांनीही खुर्चीवर बसून राहणे पसंत केले.

क्षणचित्रे

श्रीपाद नाईक यांच्या षष्ट्यब्दिपूर्तीनिमित्त आयोजित नागरी सत्काराला ऐनवेळी पावसाने दमदार उपस्थिती लावल्याने उपस्थितांना जलाभिषेक घडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्यंकय्या नायडू भाषणासाठी उभे राहिले तेव्हाच जोरदार सरी कोसळल्याने कार्यक्रमाचा बेरंग झाला.

गोव्याच्या खेड्यापाड्यांतून खास बसगाड्यांमधून भाजपाचे कार्यकर्ते या सत्कार सोहळ्यासाठी आले होते. मात्र, अनेक भागांत काल पाऊस झाल्याने बर्‍याच बसगाड्या वेळेत पणजीत पोहोचू शकल्या नाहीत. शिवाय कार्यक्रम उशिरा सुरू होईल असे वाटल्याने प्रत्यक्षात कार्यक्रम संपत आला तेव्हा लोक कार्यक्रमस्थळी येताना दिसत होते.

जोरदार पाऊस कोसळू लागताच उपस्थित कार्यकर्त्यांनी निरुपाय होऊन खुर्च्या डोक्यावर धरून पावसापासून स्वतःचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. सोबत छत्री घेऊन आलेल्या मोजक्याच भाग्यवंतांना जलाभिषेक घडला नाही.

कार्यक्रम सुरू असताना जोरदार पाऊस कोसळू लागताच कार्यक्रमाचे निमंत्रक आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ‘पावसांन भिजल्यार कोंब येवचे नात, बसून घेयात’ असे सांगितल्याने हशा पिकला. मात्र पावसाचा जोर पाहून बहुतेकांनी कार्यक्रमस्थळाहून काढता पाय घेणेच पसंत केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘लोकनेता’ ही देखणी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. राष्ट्रपती, पंतप्रधान इथपासून समजातील सर्व क्षेत्रांतील लोकांचे शुभेच्छा संदेश व लेख, मुलाखत, दुर्मिळ व आकर्षक छायाचित्रे यामुळे स्मरणिका संग्राह्य बनली आहे.

या सत्कार सोहळ्यामुळे आम नागरिकांचे मात्र प्रचंड हाल झाले. पणजीचे सर्व रस्ते कित्येक तास वाहनांनी ओसंडून वाहात होते. वाहतूक व्यवस्थापनाचा पूर्ण बोजवारा उडाल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसत होते. सगळे वाहतूक पोलीस कांपाल भागातच तैनात असल्याने अन्यत्र वाहतुकीचा आनंदीआनंदच होता.