राहुल गांधी मोदींविरोधात आक्रमक
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काल भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर चंडौली येथील प्रचार सभेत आक्रमक टीका केली. मोदी यांचे गुजरात मॉडेल हे एका उद्योगपतीला सोयीसुविधा देण्याच्या हेतूने राबविले जाते. ४० हजार कोटी रुपये किंमतीची जमीन मोदी यांनी या उद्योगपतीला कवडीमोलाने दिली आहे. मात्र त्याच जमिनीसाठी त्यांनी हवाई दलाला प्रचंड किंमत सांगितली असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.
राहुल गांधी यांनी यावेळी ‘स्नूपगेट’ प्रकरणाचाही समाचार घेतला. मोदी महिला सबलीकरणाची भाषा करतात. मात्र, त्यांनी त्याआधी महिलांना आदरभाव देण्यास सुरुवात करावी, असा सल्ला त्यांनी दिला. गेल्या ६० वर्षात देशाची कोणतीच प्रगती झालेली नाही अशी टीका करून मोदी यांनी जनतेचा अवमान केला असल्याचे ते म्हणाले.
मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी घणाघाती आरोप करताना सांगितले की, मोदींनी गुजरातमधील ४५ हजार एकर शेतजमीन उद्योगपती अदानी यांना केवळ एक रुपया चौ. मीटर दराने दिली. मात्र त्याच जमिनीसाठी त्यांनी हवाई दलाकडे हजारो रुपये दराची मागणी केली. ४० हजार कोटींची जमीन कवडीमोलाने अदानी यांना देऊन मोदींनी त्यांच्यावर मेहेरबानी केली असे राहुल म्हणाले. मोदी यांचे गुजरात मॉडेल एकाच व्यक्तीचे नशीब फळफळवण्यावर केंद्रीत आहे. मात्र युपीएचे लक्ष्य हे ७० कोटी लोकांचे कल्याण करणे असल्याचे राहुल म्हणाले. मोदी यांनी गुजरातेत शिक्षण व आरोग्य सुविधा यासाठी फक्त ८ हजार कोटींची तरतूद केली आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

