23 C
Panjim
Monday, January 25, 2021

मोदींची तपस्या

गेले दोन – तीन महिने चाललेला सतराव्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीचा गदारोळ अखेर शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर थांबला. त्यामुळे वादळापूर्वीची शांतता जणू आज देश अनुभवतो आहे. येत्या २३ रोजी निवडणुकीचे निकाल येतील आणि पुन्हा सत्तास्थापनेची धामधूम सुरू होईल. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ – बद्रिनाथच्या दर्शनाला निघून गेले. निवडणुकीच्या एवढ्या धकाधकीच्या प्रचारसत्रानंतर विश्रांतीसाठी कोणी निघून गेले असते. अटलबिहारी वाजपेयी निवडणुकीनंतर मनालीला निघून जायचे, राहुल गांधींना तर अधूनमधून विदेशातील सुटीची जरूरी भासत असते, परंतु मोदींनी केदारनाथला जाऊन आपल्या आराध्य दैवत असलेल्या शिवशंकराला रूद्राभिषेक केला, तेथील गरुडचट्टीच्या गुहेमध्ये सतरा तास ध्यानधारणा केली आणि दुसर्‍या दिवशी बद्रिनाथला भगवान विष्णूंच्या दर्शनाला निघून गेले. त्यांच्या त्या तीर्थयात्रेचे दर्शन दूरचित्रवाणी वाहिन्यांनी सेकंदा सेकंदाला देशाला घडवले. एकीकडे देशभरात अखेरच्या टप्प्यासाठी मतदान सुरू असताना मोदींचा हा एकही शब्द न उच्चारता केलेला हा आगळावेगळा धार्मिक प्रचार विरोधकांना खटकणे साहजिक होते, त्यामुळे त्याबाबत ओरड झाली, परंतु निवडणूक आयोगाची परवानगी घेऊनच मोदींनी ही तीर्थयात्रा केल्याने या आक्षेपात दम राहिला नाही. मोदींची राजकीय चतुराई त्यांच्या या शेवटच्या नियोजनबद्ध कार्यक्रमातूनही प्रत्ययाला आल्यावाचून राहिली नाही. केदारनाथ-बद्रिनाथचे दर्शन ही खरे तर त्यांची अत्यंत वैयक्तिक खासगी बाब होती, परंतु ते देशाचे पंतप्रधान असल्याने तो बातमीचा विषय बनणे स्वाभाविक होते. या भेटीचे राजकीय परिणाम अपरिहार्य होते आणि स्वतः मोदींनाही ते अपेक्षित असावेत, अन्यथा या खासगी भेटीपासून, विशेषतः गुहेतील ध्यानधारणेपासून कॅमेर्‍याला दूर ठेवणे त्यांना सहज शक्य होते, परंतु त्यांनी तसे केल्याचे दिसले नाही. त्यामुळे भारताच्या पंतप्रधानपदावरील हा भगवेवस्त्रधारी संन्यासी गुहेमध्ये तपस्या करताना जगाने पाहिला आणि तोंडात बोटे घातली. देशभरामध्ये मतदान सुरू असताना सगळ्या वृत्तवाहिन्या मोदींकडे केदारनाथला नजर लावून बसल्या होत्या. एखाद्या पंतप्रधानाने त्या पदावर असताना गुहेमध्ये जाऊन सतरा तास भगव्या वेशामध्ये ध्यानधारणा करणे हे या देशात पहिल्यांदाच घडले. २०१४ च्या निवडणुकीवेळी मोदी केदारनाथला गेले होते, तेव्हा मंदाकिनीच्या तटावर त्यांनी पूजापाठ केला होता. तेव्हा २०१३ साली येऊन गेलेल्या महाप्रलयाच्या कटू आठवणी ताज्या होत्या. केदारनाथमध्ये हाहाकार माजला तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मात्र, केदारनाथची आपत्ती येताच ते उत्तराखंड सरकारच्याही आधी केदारनाथच्या हाकेला धावून गेले होेते. गुजरात सरकारच्या खर्चाने केदारनाथ धामाची पुनर्उभारणी करण्याची तयारी त्यांनी तेव्हा दर्शविलेली होती. पुढे एकाच वर्षात मोदींच्या हाती देशाचे पंतप्रधानपद आले आणि स्वतःच्या व्यक्तिगत देखरेखीखाली त्यांनी केदारनाथाच्या पुनर्उभारणीची कामे हाती घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे जातीने त्या कामांवर नजर ठेवली. त्यामुळे आपल्या पंतप्रधानपदाच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीच्या समापनप्रसंगी बाबा केदारनाथच्या दर्शनाला जावेसे त्यांना वाटणे व तेथे आपल्या कार्यकाळात झालेल्या कामांची प्रगती तपासणे न्यायोचित ठरले. मात्र, केदारनाथचा मोदींचा दौरा दोन दिवसांचा असेल असे जेव्हा जाहीर झाले तेव्हा यापूर्वीच्या त्यांच्या तिन्ही दौर्‍यांहून त्याबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाली. मोदी केदारनाथला राहणार कुठे हा सर्वांच्या मनातील पहिला प्रश्न होता. जेव्हा ते मंदिराच्या मागच्या गरुडचट्टीतील एका गुहेमध्ये वास्तव्य करतील आणि नुसते वास्तव्य नव्हे, तर अखंड ध्यानधारणा करतील हे स्पष्ट झाले तेव्हा त्याने उत्सुकतेचा कळस गाठला. शून्याखाली पाच अंश तापमानामध्ये मोदींनी त्या छोट्याशा गुहेमध्ये एकट्याने रात्र घालवली. जवळजवळ सतरा तास तेथे शिव आराधना केली. त्याचा भावनिक परिणामही नक्कीच शेवटच्या टप्प्यातील मतदानाला निघालेल्या मतदारांवर झालेला असू शकतो, परंतु आता मतदान होऊन गेले असल्याने विरोधकांच्या हाती काही उरलेले नाही. भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीपासून फार मोठी अपेक्षा आहे. अबकी बार, केवळ मोदी सरकार नव्हे, तर ‘अबकी बार, तीनसौ पार’ चा नारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी दिलेला होता. मात्र निवडणुकीचे एकेक टप्पे पार होत गेले, तस तसे जे अंदाज व्यक्त होऊ लागले, त्यातून भाजपच्या काही नेत्यांचा हा आत्मविश्वास डळमळतानाही दिसला. राम माधव यांनी भाजपाला बहुमतासाठी जागा कमी पडू शकतात आणि तसे झाले तर आमची दारे विरोधकांसाठी उघडी असतील असे सूतोवाच करून ठेवले. परंतु स्वतः मोदींना आपण आपल्या कार्यकाळात केलेल्या सकारात्मक कामांची पोचपावती देशाचा मतदार आपल्याला जरूर देईल हा आत्मविश्वास आहे. तो कितपत सार्थ आहे आणि मोदींची केदारनाथमधील तपस्या आणि पाच वर्षांतील कामगिरी कितपत फळाला येणार ते दोन दिवसांत कळणारच आहे.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मागे हटू नये

केंद्र सरकारने नवा मोटरवाहन कायदा लागू करून एव्हाना दीड वर्ष झाले, परंतु या ना त्या कारणावरून राज्य सरकारने अजूनही त्याची अंमलबजावणी करण्यात...

प्रस्ताव मान्य असेल तरच चर्चा

>> केंद्र सरकारचा शेतकर्‍यांना निर्वाणीचा इशारा, टॅ्रक्टर मोर्चा काढण्यावर शेतकरी ठाम कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या संघटना...

अधिवेशनात पालिका कायदा दुरुस्ती विधेयकास विरोध करणार ः कामत

राज्य सरकारने लोकायुक्त कायदा कमकुवत करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. येत्या २५ जानेवारीपासून सुरू होणार्‍या विधानसभा अधिवेशनात कॉंग्रेस पक्ष लोकायुक्त आणि नगरपालिका कायद्यातील...

कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष जूनमध्ये निवडणार

>> पक्षाच्या बैठकीत निर्णय कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष जून महिन्यात निवडण्यात येणार असल्याचा निर्णय काल पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला.पाच राज्यांच्या...

लालूप्रसाद यांची प्रकृती खालावली

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली असून त्यांना सध्या रांचीमधील आरआयएमएम रुग्णालयात दाखल केले आहे....

ALSO IN THIS SECTION

मागे हटू नये

केंद्र सरकारने नवा मोटरवाहन कायदा लागू करून एव्हाना दीड वर्ष झाले, परंतु या ना त्या कारणावरून राज्य सरकारने अजूनही त्याची अंमलबजावणी करण्यात...

पवार उवाच..

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आधारवड श्रीमान शरद पवार नुकतेच गोव्याच्या दौर्‍यावर येऊन गेले. वास्तविक हा दौरा काही पक्षकार्यासाठी नव्हता. संसदेच्या संरक्षणविषयक समितीच्या बैठकीसाठी पवार...

सत्तांतर

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अधिकृतपणे ज्यो बायडन यांच्या हाती आली आहेत. आपल्या निरोपाच्या भाषणात मंगळवारी ट्रम्प यांनी बायडन यांच्या...

ध्यासपंथी

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती…वाळवंटातुनी सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती --बा. भ. बोरकर जीवनभर एखादा ध्यास घेऊन वावरणार्‍या व्यक्ती...

‘गोवा माईल्स’ वाचवा

गोवा पर्यटन विकास महामंडळाची ‘गोवा माईल्स’ ही ऍप आधारित लोकप्रिय टॅक्सीसेवा राज्यातील इतर टॅक्सीवाल्यांच्या डोळ्यांत सतत खुपत आली आहे. काहीही करून ती...