कोलवाळ पुलाजवळ काल सायंकाळी ६.३० वा. ट्रॉली, मालवाहू ट्रक व स्प्लेंडर मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात कालिदास विठू मांद्रेकर (४२) तळेवाडी–रेवोडा हा जागीच ठार झाला.
जीए ०६ टी. ७९१४ ही ट्रॉली म्हापसा–पेडणेच्या दिशेने डाव्या बाजूने कोलवाळ पूलाजवळ उभी करून ठेवण्यात आली होती. तर आरजेआय ९जीबी ३२४२ हा मालवाहू ट्रक पेडणेमार्गे म्हापशाला जात होता.
त्याच दिशेने जीए ०३ ३१८१ ही स्प्लेंडर मोटारसायकल जात असता म्हापशाहून पेडणेकडे जाण्यासाठी पुढून एक ट्रक आला व मोटारसायकल आणि ट्रकची ठोकर झाली व ट्रक उभ्या असलेल्या ट्रॉलीला अपटला.
या विचित्र अपघातात मोटारसायकलच्या मागे बसलेला कालिदास विठू मांद्रेकर हा जागीच ठार झाला. १०८ रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेतली व त्याला बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात पाठविण्यात आले.
म्हापसा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक नितीन हळर्णकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास करीत आहेत.