मैत्रिणीवरून वादात रशियन नागरिकाचा खून

0
55

आश्‍वे-मांद्रे येथे ऑस्कर कायूमोव (३४) या रशियन पर्यटकाच्या खूनप्रकरणी अलेक्झेंडर आपोलिटोव (३४) या दुसर्‍या रशियन नागरिकास अटक करण्यात आली. आपोलिटोव याच्यावर पेडणे पोलिसांनी अटक करून भा.दं.सं.च्या कलम ३०२ खाली गुन्हा नोंदविला आहे.

पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑस्कर कायुमोव (३४) व व्हेरोनिका सॅमीकरास (३४) ही महिला आश्‍वे-मांद्रे येथील गेस्ट हाऊसमध्ये दुसर्‍या मजल्यावर राहत होती. रात्रीच्या वेळी इंटरनेटवर चॅटींग सुरू झाले व ऑस्कर यांची मैत्री अलेक्झेंडरशी झाली. त्यानंतर तो गेस्टहाऊसमध्ये २१ रोजी रात्री आला व आपले सामान ठेवायला थोडी जागा द्या म्हणून विनवणी करू लागला. त्यावरून रशियन मित्रमैत्रिणीने त्यांना सामान ठेवायला जागा दिली.

नंतर रात्री एकत्रित जेवण झाल्यानंतर मद्यपानावेळी मैत्रिणीवरून दोघांत भांडण सुरू झाले. भांडण एवढे विकोपाला पोचले की दोघांनीही एकमेकांस पकडले व दोघेही दुसर्‍या मजल्यावरून खाली पडले. त्यातील ऑस्कर हा थेट जमिनीवर पडून जागीच ठार झाला तर संशयित आरोपी अलेक्झेेंडर बाजूला पत्र्यांची झोपडी होती त्यावर पडल्याने किरकोळ जखमी झाला. ऑस्कर याला २१ रोजी रात्री धुळेर म्हापसा येथील इस्पितळात नेले असता मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर लगेच ऑस्कर यांची मैत्रीण वेरोनिका सॅमीकरास या रशियन महिलेने पेडणे पोलिसात आपल्या मित्राचा खून झाल्याची तक्रार नोंदवली.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक विश्राम बोरकर, उपअधीक्षक सेराफीन डायस, पेडणे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर आदिंनी पंचनामा केला.