>> पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी; प्रत्यार्पणासाठी भारताची विनंती
पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा करणारा कर्जबुडव्या मेहुल चोक्सी (65) याला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी त्याला सीबीआयच्या विनंतीवरुन अटक करण्यात आली. मेहुल चोक्सी हा हिरे व्यापारी होता. कोट्यवधींचा कर्ज घोटाळा करुन तो पळाला होता. 13 हजार 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे. तसेच ईडी आणि सीबीआयने त्याला वाँटेड जाहीर केले होते. आता त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी विनंती केली असल्याचे बेल्जिअमकडून स्पष्ट करण्यात आले आहे. चोक्सीवर 13,850 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. गेल्या महिन्यात मेहुल चोक्सी बेल्जियममध्ये लपल्याचे उघड झाले होते.
मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी बँकेची हजारो कोटींची फसवणूक केली होती. मेहुल चोक्सी हा गुजरातीमधील हिरे व्यापारी होता. गीतांजली ग्रुपचा तो माजी संचालक आहे. त्याने आणि नीरव मोदी यांनी मिळून पंजाब नॅशनल बँकेकडून 13 हजार 500 कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्जाची परत फेड केली नव्हती. त्याने परदेशी बँकांकडून देखील कर्ज घेतल्याचे समोर आले होते. हा घोटाळा 2018 मध्ये उघड झाला. घोटाळा उघडकीस आल्यानंतर दोघेही देश सोडून पळून गेले होते.
मेहुल चोक्सीने कॅरेबियन बेटावरील अँटिग्वा या देशात जाऊन तेथील नागरिकत्व घेतले. भारतीय सुरक्षा एजन्सी त्याच्या मागावर होत्या मात्र तो सहा वर्षांपासून गुंगारा देत होता. त्याच्या विरोधात इंटरपोलची नोटीस देखील जारी करण्यात आली होती. यानंतर मेहुल चोक्सी 2021 च्या अखेरीस अँटिग्वामधूनही पळून गेला होता, त्यानंतर भारतीय तपास यंत्रणा दोन महिने बेल्जियमच्या एजन्सींच्या संपर्कात होत्या. बऱ्याच काळापासून भारतीय तपास यंत्रणा चोक्सीचा शोध घेत होत्या.
त्यात चोक्सी बेल्जियममध्ये असल्याचे तपास यंत्रणांना समजले, तेव्हा त्यांनी ताबडतोब तिथल्या सरकारला औपचारिक पत्र पाठवून त्याला अटक आणि प्रत्यार्पणाची मागणी केली. प्रत्युत्तरादाखल, बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाने जारी केलेल्या दोन अटक वॉरंटच्या आधारे चोक्सीला ताब्यात घेतले. हे वॉरंट 23 मे 2018 आणि 15 जून 2021 रोजी जारी करण्यात आले होते. अटकेपासून वाचण्यासाठी तो भारतातून बेल्जियममध्ये फरार झाला होता. तो तेथे त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत अँटवर्पमध्ये राहत होता. प्रीती चोक्सीकडे बेल्जियमचे नागरिकत्व आहे आणि चोक्सीकडे बेल्जियममध्ये ‘एफ रेसिडेन्सी कार्ड’ आहे.
यापुढील न्यायालयीन लढाईदरम्यान सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) बेल्जियमच्या न्यायालयात चोक्सीच्या जामिनाला विरोध करतील आणि त्याच्या प्रत्यार्पणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. चोक्सी आणि नीरव मोदी यांनी बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून पीएनबीची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.