पंजाब नॅशनल बँकेच्या सुमारे 13 हजार कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी बेल्जियम येथील एका न्यायालयाने मेहूल चोक्सी याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली आहे. तसेच न्यायालयाने बेल्जियमच्या अधिकाऱ्यांकडून झालेली त्याची अटक वैध असल्याचा निर्णय दिला आहे
चोक्सी याला भारतात आणण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. मेहुल चोक्सी याच्याकडे अद्याप वरिष्ठ न्यायालयात या निर्णयाच्या विरोधात अपील करण्याचा पर्याय आहे. त्यामुळे त्याला लगेचच आणले जाऊ शकत नाही, मात्र पहिला आणि खूप महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी हे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात आरोपी आहेत. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी 13 हजार 500 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या मालकीच्या कंपन्यांना एलओयू लेटर ऑफ अंडरटेकिंग, फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिट मिळवल्याचा आरोप आहे.
बेल्जियमच्या न्यायालयाने काल शुक्रवारी भारताच्या व चोक्सीच्या बाजूने बेल्जियमच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर चोक्सीची अटक व भारताची प्रत्यार्पणाची विनंती वैधय असल्याचा निर्णय दिला. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनुसार बेल्जियमच्या पोलिसांनी 11 एप्रिल रोजी चोक्सीला अटक केली होती.

