मेरशीत जिल्हाधिकारी कार्यालय बांधण्याची प्रक्रिया सुरू ः बाबूश

0
9

मेरशी-पणजी येथे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय बांधण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी महसूल खात्याच्या कामकाजाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पर्वरी येथे काल दिली.

उत्तर गोव्यातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासाठी मेरशी येथे जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. गत अर्थसंकल्पात नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम हाती घेतले जाणार आहे. या कार्यालयाचा आराखडा तयार करण्याचा काम सुरू आहे. महसूल खात्याच्या कारभारात सूसूत्रता आणण्यावर जास्त भर दिला जात आहे, असेही मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले.

राज्य सरकारकडून कुशल, अकुशल, अर्धकुशल कामगारांच्या दैनंदिन किमान वेतनाबाबत येत्या 1 मे 2023 पर्यत निर्णय घेतला जाऊ शकतो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी कामगारांच्या किमान वेतन प्रश्नी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने कामगाराच्या किमान वेतनाबाबत कामगार संघटनांकडून सूचना जारी करून आक्षेप, सूचना स्वीकारलेल्या आहेत, असेही मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले.