‘मॅच फिक्सिंग’ची गोव्यालाही लागण!

0
18
  • सुधाकर रामचंद्र नाईक

चोडणकर चौकशी समितीच्या अहवालातील गांभीर्य लक्षात घेऊन गोवा फुटबॉल असोसिएशनने शापोरा युवक संघाचे तांत्रिक प्रशिक्षक तथा पोलिस हवालदार मोहसिन ऊर्फ मौझिन शेख आणि तब्बल तेरा फुटबॉलपटूंसह एकूण 14 जणांवर तत्काळ बेमुदत निलंबनाची सजा फर्मावली आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर गोवा फुटबॉल असोसिएशनने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून पुढील तपासासाठी ‘एफआयआर’ नोंदविण्यात आले आहेत. हे प्रकरण पुढील तपासासाठी आता ‘सीबीआय’कडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

2025-26 मधील ‘गोवा प्रोफेशनल लीग’ मोसमात उद्भवलेल्या धक्कादायक ‘मॅच फिक्सिंग’प्रकरणी गोवा फुटबॉल असोसिएशनने कठोर पावले उचलत 13 फुटबॉलपटू आणि एका तांत्रिक प्रशिक्षक/पोलिस हवालदारासह 14 जणांवर बेमुदत निलंबनाची कारवाई केली आहे.
शापोरा युवक संघाचे अध्यक्ष प्रवीण दाभोलकर यांनी आपल्या क्लबमधील फुटबॉलपटूंविरुद्ध ‘मॅच फिक्सिंग’ची तक्रार दाखल केली आणि गोवा फुटबॉल असोसिएशनने या घटनेची गंभीर दखल घेत निवृत्त पोलिस उप-अधीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती नियुक्त केली. श्री. चोडणकर समितीने या प्रकरणाची सुमारे नऊ महिने सखोल तपासणी, चौकशी करून सुमारे 250 पानी अहवाल सादर केला. चौकशी समितीच्या अहवालात ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणात फुटबॉलपटूंचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असून, या गंभीर प्रकरणाची अधिक तपासणी व्हावी अशी शिफारसही करण्यात आली आहे. चोडणकर चौकशी समितीच्या अहवालातील गांभीर्य लक्षात घेऊन गोवा फुटबॉल असोसिएशनने शापोरा युवक संघाचे तांत्रिक प्रशिक्षक तथा पोलिस हवालदार मोहसिन ऊर्फ मौझिन शेख आणि तब्बल तेरा फुटबॉलपटूंसह एकूण 14 जणांवर तत्काळ बेमुदत निलंबनाची सजा फर्मावली आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर गोवा फुटबॉल असोसिएशनने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून पुढील तपासासाठी ‘एफआयआर’ नोंदविण्यात आले आहेत. हे प्रकरण पुढील तपासासाठी आता ‘सीबीआय’कडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

2025-26 मधील गोवा प्रोफेशनल लीग मोसमात क्लब दे साळगावकरविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वदिनी गडद रंगीत काचा असलेल्या गाडीतून आलेल्या मास्कधारी ‘मॅच फिक्सर’ने म्हणे शापोरा युवक संघाच्या फुटबॉल खेळाडूंची भेट घेऊन सामना 0-3 च्या फरकाने हरण्यासाठी पैशांचे आमिष दिले आणि त्याची कुणकुण क्लब अध्यक्ष प्रवीण दाभोलकर यांना लागली. सामन्याचा निकालही धक्कादायक ठरल्याने त्यांनी आपल्या नऊ फुटबॉलपटूंविरुद्ध तक्रार नोंदवली. प्रवीण दाभोलकर यांच्या तक्रारीतील गांभीर्य लक्षात घेऊन गोवा फुटबॉल असोसिएशनने शापोरा युवक संघाच्या फुटबॉलपटूंकडून ‘जीएफए’ आचारसंहितेच्या 22.3 कलमांचे उल्लंघन झाल्याने निवृत्त पोलिस अधीक्षक संदेश टी. चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आणि त्यांनी सुमारे नऊ महिन्यांच्या सखोल चौकशीअखेर ‘मॅच फिक्सिंग’ झाल्याचा निर्वाळा जाहीर केला. त्यानंतर गोवा फुटबॉल असोसिएशनने कठोर पावले उचलून तब्बल 14 दोषींवर निलंबनाची कारवाई केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपासासाठी ‘एफआयआर’ नोंदविण्यात आले असून हे प्रकरण ‘सीबीआय’कडे सोपविण्याचा निर्णय गोवा फुटबॉल असोसिएशनने घेतला आहे.

रोहन कृष्णा पेडणेकर, आकाश अमृत कुंडणेकर, आकाश सनदी, भास्कर जल्मी, कृष्णनाथ शिरोडकर, विनायक राणे, चैतन दाभोलकर, सच्चिदानंद साठेलकर, अमर गोवेकर, मिनेश कुंकळ्ळकर, सतीश काणकोणकर, सुरज हडकोणकर, रोनाल्डो ऑलिव्हरा आणि प्रशिक्षण अधिकारी तथा पोलिस मौझान शेख अशा एकूण 14 जणांवर बेमुदत बंदीची कारवाई करण्यात आली आहे. ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरण उघडकीस आल्यानंतरही फुटबॉलपटू इंटरव्हिलेज स्पर्धांत भाग घेत होते, पण गोवा फुटबॉल असोसिएशनने घातलेल्या बंदीनंतर त्यांना कुठल्याही स्पर्धांत भाग घेता येणार नाही, शिवाय कुठल्याही सामन्यासाठी स्टेडियमवर उपस्थित राहण्यास बंदी असेल.

2015-16 पासून गोव्याला या ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणाची थोड्याफार प्रमाणात लागण झाली होती आणि 2018 ते 2022 पर्यंत हा प्रकार बराच बोकाळला होता. पण नव्या कार्यकारिणीने त्यावर अंकुश ठेवला होता. मात्र गत मोसमात उद्भवलेल्या या गंभीर घटनेमुळे गोवा फुटबॉल असोसिएशन खडबडून जागे झाले आणि त्यांनी चौकशी समितीची स्थापना केली. तिच्या अहवालानुसार आता ‘जीएफए एथिक्स कोड- 2021′ अंतर्गत कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. एवढ्यावरच न थांबता तपास अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गोवा फुटबॉल असोसिएशनने हे प्रकरण अधिक तपासासाठी ‘सीबीआय’कडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. शापोरा युवक संघाचा प्रशिक्षक सहकारी असलेला पोलिस मौझान शेख याचा कथित सहभाग असल्याने त्याच्याविरुद्ध पोलिस प्रशासनाकडे तक्रारही नोंदविण्यात येणार आहे.
झटपट पैसा मिळविण्याच्या मोहापायी फुटबॉलपटूंकडून हा अपराध, कृत्य घडलेले आहे. हा अपराध त्यांची कारकीर्द, भवितव्य अंधारमय करू शकतो. तुम्ही चांगले फुटबॉलपटू बना; अट्टल फिक्सर नको, असा सल्ला गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कायतानो फर्नांडिस यांनी दिला आहे.

शापोरा युवक संघाचे अध्यक्ष प्रवीण दाभोलकर यांच्या कृतीचेही गोवा फुटबॉल असोसिएशन प्रमुखांनी कौतुक केले आहे. आपल्याच संघाविरुद्ध अशी कठोर कारवाई करण्याचे धाडस सहसा कुणी करू शकणार नाही, पण प्रवीण दाभोलकर यांनी एकंदर पार्श्वभूमी आणि प्रकार समजताच कसलाही मुलाहिजा न बाळगता गोवा फुटबॉल असोसिएशनकडे तक्रार नोंदविली, अशा शब्दांत गोवा फुटबॉल असोसिएशन प्रमुखांनी शापोरा युवक संघप्रमुखांचे कौतुक केले.

सामना संगनमत तथा मॅच फिक्सिंग हा प्रकार फुटबॉल संवर्धनासाठी धोकादायक आहे आणि अशा घटना भविष्यात घडू नयेत म्हणून गोवा फुटबॉल असोसिएशन योग्य दक्षता घेणार असून फुटबॉलपटूंना अशा प्रकारापासून रोखण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन तसेच कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे गोवा फुटबॉल असोसिएशन प्रमुखांनी स्पष्ट केले आहे.
‘मॅच फिक्सिंग’च्या भस्मासुराने बऱ्याच कालावधीपासून जागतिक स्तरावर क्रीडाक्षेत्रात शिरकाव केला असून, फुटबॉल आणि क्रिकेटमध्ये विशेष धुमाकूळ माजविला आहे. अमेरिका तथा ऑस्ट्रेलियासह बऱ्याच देशांत फुटबॉलमध्ये ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणे बरीच गाजली आहेत. ‘एफएसी 2026’मधील वादग्रस्त ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणात तर एक फुटबॉलपटू आणि एका महिला फुटबॉल अधिकाऱ्याला प्रतिबंधित करण्यात आले. एवढेच नव्हे तर हल्लीच झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत काही पंचांचे निर्णय तसेच काही विवादक घटनांबाबत तब्बल सात संदिग्ध घटनांची तपासणी ‘फिफा’तर्फे जारी आहे.

भारतातही अखिल भारतीय स्तरावरील नॅशनल लीग तथा इंडियन सुपर लीगसारख्या लोकप्रिय स्पर्धांत ‘सिंगापूर कनेक्शन’ नामक ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरण असल्याचे दिसून आले होते आणि भारतीय फुटबॉल महासंघ आणि ‘सीबीआय’कडून या प्रकरणाची चौकशी तथा तपास करण्यात आला होता. भारतातील अनेक राज्यांमध्येही या ‘मॅच फिक्सिंग’च्या भस्मासुराने वादळे माजवली आहेत. 2024 मध्ये दिल्ली प्रीमियर लीगमध्ये ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरण समोर आले होते आणि दिल्ली फुटबॉल असोसिएशनने केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी तपास केला होता. 2025 मध्ये कोलकाता प्रीमियर लीगमध्ये झालेल्या ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणाची पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. एवढेच नव्हे तर 2024 मध्ये मिझोरम प्रीमियर लीगमध्ये झालेल्या ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणात झालेल्या चौकशीअंती 3 क्लब आणि 24 फुटबॉलपटूंवर प्रतिबंधाची कारवाई झाली होती. आणि आता गोव्यात तब्बल 14 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून अधिक तपास ‘सीबीआय’कडून सुरू होणार आहे.

एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतीय क्रिकेटमध्ये ‘मॅच फिक्सिंग’चे वादळ घोंगावत होते. 2000 मध्ये झालेल्या भारतीय क्रिकेटमधील ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणात दस्तुरखुद्द कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनवर ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणात आजन्म बंदीची कारवाई करण्यात आली होती. अखेर 2012 मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली. राजकारणातही त्याने जम बसवला, खासदारही झाला, पण क्रिकेटर म्हणून जनतेच्या मनात आदर मात्र तो प्राप्त करू शकला नाही. 2000 मधील ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणात अजय जडेजा आणि अजय शर्मा या अव्वल फलंदाजांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द ‘बीसीसीआय’ने ठोठावलेल्या पाच वर्षांच्या बंदीमुळे उद्ध्वस्त झाली. भारतातील लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीगमध्ये ‘मॅच फिक्सिंग’चे वादळ बरेच घोंगावले. 2013 मध्ये किंग्स इलेव्हन्स पंजाबच्या अमित यादव आणि अभिनव बाली या दोन क्रिकेटर्सना ‘स्टींग ऑपरेशन’द्वारे ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. 2013 मध्ये भारतीय द्रुतगती गोलंदाज एस. श्रीशांतसह अंकित चौहान, अजित चंडिला या ‘राजस्थान रॉयल्स’च्या प्रमुख क्रिकेटर्सना ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणात दोषी ठरवून बंदीची शिक्षा सुनावली गेली. एवढेच नव्हे तर ‘चेन्नई सुपर किंग्ज’ आणि ‘राजस्थान रॉयल्स’ या संघांनाही ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणात 2016 आणि 2017 या दोन पर्वात बंदीची शिक्षा भोगावी लागली होती.

क्रीडाक्षेत्रात चमक दर्शविणाऱ्या खेळाडूंना प्रसिद्धीबरोबरच बऱ्यापैकी मानधन आणि पैसाही मिळतो. भारतात क्रिकेटमध्ये नैपुण्य पार्जळविल्यास अमाप पैसा, प्रसिद्धी मिळते. नॅशनल फुटबॉल लीग प्रारंभ झाल्यापासून फुटबॉलमध्येही खेळाडूंना बऱ्यापैकी मानधन मिळते. पण झटपट पैसा मिळविण्याच्या मोहात काही खेळाडू सद्सद्विवेक गमावतात आणि ‘मॅच फिक्सर’च्या जाळ्यात अडकून आपली कारकीर्द, भवितव्य उद्ध्वस्त करतात.

फुटबॉल गोमंतकीयांच्या रक्तात आहे असे गोवेकर अभिमानाने सांगतात. क्रिकेटच्या वर्चस्वाखालील भारतात फुटबॉलचा उत्साह सर्वाधिक दिसतो ते राज्य म्हणजे गोवा होय. गोवेकरांसाठी फुटबॉल हा केवळ खेळ नसून गोमंतकीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे.
16 व्या शतकात पोर्तुगीज राजवटीत हा खेळ गोव्यात रुजला. ब्रिटिश राजवटीत भारतात क्रिकेटचा प्रसार सुरू झाला तसा पोर्तुगीज अमलाखालील गोव्यात फुटबॉलज्वर निर्माण झाला आणि हळूहळू लोकप्रियही बनला. धेम्पो स्पोर्ट्स क्लब, साळगावकर एफ सी, स्पोर्टिंग क्लब डी गोवा, चर्चिल ब्रदर्स, वास्को स्पोर्ट्स क्लब, सेझ गोवा स्पोर्ट्स क्लब आदी नामवंत, लोकप्रिय संघांनी गोमंतकीय फुटबॉलचा झेंडा फडकवला. एफ सी गोवा फुटबॉल संघ सध्या राष्ट्रीय स्तरावर, इंडियन सुपर लीगमध्ये गोव्याची पताका फडकवीत आहे. गोव्यात ग्रामीण स्तरावरही फुटबॉल तेवढ्याच आवडीने खेळला जातो. तसेच शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवरही जोशात खेळला जातो. पोर्तुगीज आणि गोव्यातील स्थानिक फुटबॉल खेळाडूंत म्हणे फुटबॉल सुरू झाला आणि हा खेळ तमाम गोमंतकीयांच्या जणू रक्तातच भिनला. धेम्पो, साळगावकर या क्लबांनी तर कोलकात्याच्या मोहन बागान, ईस्ट बंगाल, मोहम्मेडन स्पोर्टिंगसह मुंबई, बंगळूरच्या बलाढ्य संघांना तोडीसतोड झुंज देत गोमंतकीय फुटबॉलचे वर्चस्व गाजवले, अधोरेखित केले.

गोवा फुटबॉल असोसिएशनने इंडियन सुपर लीगसह अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांचे यजमानपद भूषवीत गोव्याची शान उंचावली. एकेकाळी भारतीय संघात तर अर्ध्याहून अधिक खेळाडू हे गोमंतकीय असायचे. गोवा म्हटला की ‘फुटबॉल फन’ अशी अपेक्षा पर्यटकांना मोहवीत असे!
…पण गेल्या मोसमात उद्भवलेल्या या ‘मॅच फिक्सिंग’ उपाख्यानाने गोमंतकीय फुटबॉलची प्रतिमा मलिन बनली असून त्यावर आळा घालण्यासाठी गोवा फुटबॉल असोसिएशन कठोर पावले उचलली असून लवकरच ही कीड समूळ नष्ट होईल अशी अपेक्षा आहे!

निलंबित चौदा

रोहन कृष्णा पेडणेकर
आकाश अमृत कुंडणेकर
आकाश सनदी
भास्कर जल्मी
कृष्णनाथ शिरोडकर
विनायक राणे
चैतन दाभोलकर
सच्चिदानंद साठेलकर
अमर गोवेकर
मिनेश कुंकळ्ळकर
सतीश काणकोणकर
सुरज हाडकोणकर
रोनाल्डो ऑलिव्हरा
मौझान शेख