31 C
Panjim
Monday, January 25, 2021

मृत्योर्मा अमृतं गमय…

  •  प्रा. रमेश सप्रे

‘हे परमशक्तिमान परमेश्‍वरा, जीवनातील सत्याचं दर्शन होण्याच्या आड येणार्‍या सर्व दिखावटी, चमकदार वस्तूंचं खरं ज्ञान करून दे. प्रलोभनं, आकर्षणं, पतनाचे क्षण यापासून माझं रक्षण कर. जिवंत असतानाच मला शांत, तृप्त, समाधानी, आनंदी अशा ‘अमृत अवस्थेचा’ अनुभव दे’. सध्याच्या मृत्यूचं तांडव चालू असलेल्या काळात तर या प्रार्थनेचं महत्त्व अधिकच आहे.

‘चकाकतं ते सर्व सोनं नसतं’ (ऑल् दॅट् ग्लिटर्स इज् नॉट् गोल्ड). ही वाक्यं पूर्वी शाळांच्या भिंतींवर लिहिलेली असायची. भिंतीवरचे सुविचार जमिनीवर उतरवण्याचा सर्वांचा प्रयत्न असायचा. बहुसंख्य गरीब किंवा निम्न मध्यम वर्गात मोडत असल्याने जीवनाच्या जास्त जवळ होते. झगमगणार्‍या, दिमाखदार ‘जगण्यापेक्षा’ साधंच पण दैदिप्यमान जीवनाचा आग्रह त्याकाळी असायचा. सोनं नावाचा पिवळा धातू विकत घेण्यापेक्षा परिपक्वतेचा पिवळा रंग जगून इतरांना शिकवण्यावर त्यावेळी कुटुंब नि शाळा या दोन समाजातील मूलभूत संस्थांचा प्रयत्न असायचा. हिरवं शेत पिकल्यावर पिवळं बनतं. शेतकर्‍यांनी खूप मेहनत केली तरी श्रद्धा अशीच होती की ‘देवाजीने करुणा केली, भाते (पिके) पिकुनी पिवळी झाली’. आंब्याच्या हिरव्या कैर्‍या जेव्हा पिवळ्या व्हायच्या तेव्हा फळांचा राजा रसराज आंबा तृप्त मनानं, कृतज्ञ भावनांनी खाल्ला जायचा.
उपनिषदांच्या काळी याच्याहून खूप निसर्गस्नेही वातावरण होतं. संस्कार म्हणजेच शिक्षण आणि शिक्षण म्हणजेच संस्कार असं मानून ऋषींच्या गुरुकुलात शिक्षण दिलं जातं होतं.
सत्याचा शोध हा सार्‍या अभ्यासक्रमाचा मुख्य भाग होता. धर्म- अर्थ- काम- मोक्ष या चार पुरुषार्थांच्या भक्कम चौखांबांवर समाजाची इमारत घट्ट उभी होती. त्यावेळी आश्रमातील विद्यार्थ्यांची आस कोणती असायची हे दर्शवणारा ईशावास्य उपनिषदातला हा मंत्र –

हिरण्मयेन पात्रेण सत्यस्थापिहितं मुखम् |
तत् त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥

म्हणजे – सत्याचं तोंड सुवर्णाच्या झाकणानं झाकलेलं आहे. त्या सत्याचं दर्शन व्हावं (अनुभव यावा) म्हणून मी सत्यधर्मा (सत्यसाधक) हे पूषन् (बुद्धीचं पोषण करणार्‍या चैतन्यसूर्या) तुला प्रार्थना करीत आहे.

पूषन् हे सूर्याच्या बारा नावातलं एक नाव आहे. ‘ॐ पूष्णे नमः’ असं आपण सूर्यनमस्कार घालताना म्हणतो ना? पौष महिना हा धार्मिक कार्यांसाठी म्हणजे लग्नमुंजासारखे पवित्र सोहळे, भूमिपूजन- गृहप्रवेश- वास्तुशांतसारखे धार्मिक विधी यांच्यासाठी निषिद्ध मानलाय. पण आध्यात्मिक उपासना, सत्संग अशा कार्यक्रमांसाठी अतिशय पवित्र मानला गेलाय.

पूषन् हा सूर्यदेवतेचा महिना आहे. याच पौष महिन्यात सूर्याचं मकरसंक्रमण असतं. सूर्य हळुहळू आपल्या देशाकडे सरकू लागतो. क्रमशः दिवस मोठे व रात्री लहान व्हायला लागतात. दिवस मोठा म्हणजे प्रकाश, ऊर्जा, किरणोत्सर्ग यांचं प्रमाण अधिक. याचाच अर्थ ज्ञानार्जनासाठी आता अधिक चांगला कालखंड सुरू होणार. संक्रांत याच पौष मासात येते आणि अत्यंत महत्त्वाचा संदेश संक्रमणाचा, सम्यक् क्रांतीचा (संक्रांती) देते. सम्यक् म्हणजे योग्य, कल्याणकारी अशी क्रांती. आपल्या देशाच्या भा-रत नावात भा म्हणजे हा भास्कर म्हणजे सूर्यच आहे. सूर्य ज्ञान, बुद्धी, विचार, विवेक यांची प्रेरणा देणारा आहे. (तर चंद्र आपल्या भावभावना, शरीरातील व निसर्गातील रसतत्त्व (पाणी, फळातले रस आणि साहित्यातले करुण- हास्य- शृंगार आदि नवरस, अन्नातले आंबट- तुरट- कडू- खारट- गोड नि तिखट हे सहा रस (षड्रस) नि त्यांचा आस्वाद घेण्याची क्षमता यांचं पोषण करणारा देव आहे चंद्र. ‘पुष्णामि च औषधि सर्वा सोमो (चंद्रा) भूत्वा रसात्मकः..’ असं गीतेतही भगवंतांनी म्हटलंय. असो.
नुसतं शरीराचं पोषण, रक्षण हे माणूस सोडून सर्व प्राणिमात्रांबद्दल महत्त्वाचं आहे. मानवाला मात्र बुद्धीच्या आहाराचं, कलाकौशल्यांचं पोषण आवश्यक आहे. हे सारं सांगण्याचं कारण या मंत्रात आलेला पूषन् या देवतेचा उल्लेख.

तिची प्रार्थना करणारा ऋषिकुमार, समर्पित साधक आहे- सत्यधर्मा!
काय प्रार्थना आहे या सत्यधर्म साधकाची?
सर्वप्रथम सत्यधर्मा म्हणजे सत्याचं दर्शन, ज्ञान, अनुभव प्राप्त करण्यासाठी साधना करणारा. सत्यदर्शनाच्या आड अनेक गोष्टी येतात. हे खरं आव्हान असतं. ज्या वस्तूंची, व्यक्तींची, अनुभवांची आपल्याला सवय झालेली असते त्या मुख्यतः आपल्या ध्येयसिद्धीच्या आड येतात. याशिवाय चित्त विचलित करणारी साधनं, एकाग्रतेत अडचण आणणार्‍या गोष्टी, निग्रहानं अभ्यास करु लागल्यावर त्या मार्गात येणारी प्रलोभनं या सर्वांवर मात करून कठोरपणे उपासना चालू ठेवायची असते.

या सर्व सत्याच्या आड येणार्‍या गोष्टींना सोन्याचं पात्र म्हटलंय. ‘हिरण्मयेन पात्रेण’ अशा त्या सुवर्णपात्रामध्ये त्याच्याहीपेक्षा मूल्यवान असं सत्य ठेवलेलं आहे. विशेष म्हणजे या पात्राला- म्हणजे सत्याला- झाकलंय ते झाकणही सोन्याचं आहे. ते सामान्य साधक अवस्थेत स्वतःला दूर करता येण्यासारखं नाही.

‘ईशावास्यं इदं सर्वम्’ या प्रार्थनेचा शब्दार्थ कळला तरी भावार्थ कळणं नि त्याप्रमाणे वागणं अधिक महत्त्वाचं आहे. इथं अडचण हीच आहे की सर्व चराचर सृष्टीत, सजीव-निर्जीव वस्तूत उपस्थित असलेल्या ईश्‍वराचं दर्शन मला हवंय. पण संसारातील व्यवहारातील दिखावटी तेजामुळे, खोट्या चकचकीत आवरणाखाली लपलेल्या ईशतत्त्वाचा मला अनुभव येत नाही. यासाठी देवता किंवा सद्गुरु यांच्या कृपेची गरज आहे. आतली ही भावना प्रबळ झाल्याचा प्रत्यय या प्रार्थनेत येतोय- हे जे सोनेरी आवरण आहे ‘तत् त्वं अपावृणु’ ते आवरण तू दूर कर.

सद्गुरुंची खरी कृपा प्रपंचातल्या कटकटी मिटवणं, हव्या त्या गोष्टी मिळवून देणं, मनासारख्या घटना घडणं यात नाही. या गोष्टी प्रारब्धानुसारच घडत असतात.

खरी सद्गुरुकृपा किंवा परमेश्‍वरी कृपा हीच की विश्‍वाचं, जगाचं, अवतीभवतीच्या परिसरातील वस्तू- पशुपक्षी- व्यक्ती यांचं खरं स्वरुप दाखवून देणं. ‘दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं’ या अनुभवानुसार आपणही पावलोपावली फसत असतो. म्हणून आपले जीवनातील अनुभव सुख-दुःख असे मिश्रित असतात.
यात गूढ तत्त्वज्ञानाचा किंवा सूक्ष्म आत्मज्ञानाचा भाग नाहीये. तर दैनंदिन जीवनातील प्रापंचिक अनुभवांविषयीही ही सत्यधर्मा शिष्याची ही प्रार्थना आहे. आकार धारण केलेल्या धुळीच्या कणांपासून ते सूर्यमालेतील ग्रहांपर्यंत, इतकंच नव्हे तर अखिल विश्‍वापर्यंत, अनंत कोटी ब्रह्मांडापर्यंत सर्वांना उत्पत्ती- स्थिती- लय किंवा जन्म- जीवन- मृत्यू या तीन अवस्था आहेतच. केवळ जीवनाचा शेवट म्हणजे मृत्यू असं मानण्याचं कारण नाही. प्रत्येक घटनाप्रसंगाला आरंभ- मध्य- अंत अवस्था आहेतच. यातून महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती ही की सारी सृष्टी मरणधर्मा (मरणशील) आहे.

दिवस उगवतो, टिकतो, मावळतो तशीच रात्रही. हाच नियम पृथ्वीवरच्या ऋतुचक्राला लावायला हवा. सगळ्या दृश्य वस्तू क्रमाक्रमानं विनाशाकडे ढकलल्या जातात. या वस्तुस्थितीचा आनंदानं स्वीकार करायला शिकलं पाहिजे. यातच मनःशांतीचं बीज दडलेलं आहे. उपनिषदातील साधक आपल्या गुरुच्या जवळ (उप) जाऊन, त्याच्या पायाशी बसून (नि-षद) आपल्या मनातील शंकांचं समाधान करून घेत असे. त्यासाठी योग्य अशी प्रार्थना करत असे. मग साक्षात् परब्रह्मरुपी ज्ञानी सद्गुरु त्याला आदेश देत. असाच आदेश ईशावास्य उपनिषदाच्या अखेरीस दिला गेलाय.
त्यात एक प्रार्थना नि एक कृती सुचवलीय. वरवरचा अर्थ जरी जीवनान्त किंवा मृत्यू याच्याशी संबंधित असला तरी जीवनातील प्रत्येक अनुभवाशीही त्याचा संबंध जोडता येईल. यातच जीवनमुक्तीचं रहस्य दडलंय.
हा महत्त्वाचा मंत्र आहे-

वायुः अनिलं अमृतं अथेदं भस्मान्तं शरीरम् |
ॐ क्रतो स्मर कृतं स्मर, क्रतो स्मर कृतं स्मर ॥

अर्थ – माझा प्राण हा विश्‍वाच्या अनंत वायूतत्त्वात विलीन होवो, नंतर शरीराची राख होवो (भस्मान्तं शरीरम्) हे जीवा, माझ्या मना, तू वारंवार परमेश्‍वराला स्मरुन (ॐ) आपल्या केलेल्या कृत्यांचं (कृतकर्मांचं) स्मरण, केलेल्या कृत्यांचं स्मरण कर.
मृत्यूच्या क्षणी जीवनभरच्या कृत्यांच्या बर्‍यावाईट स्मृतींची उजळणी मनात होत असते. मनातल्या मनात सत्कृत्यांबद्दल समाधान वाढत राहतं, तसंच अपकृत्यांबद्दल (पापकर्मांबद्दल) पश्चात्ताप होत असतो. अशा वेळी जर आपल्याकडून कळत नकळत त्रास दिली गेलेली मंडळी भेटायला आली तर अश्रूभरल्या डोळ्यांनी क्षमाही मागितली जाते. इतकंच नाही तर जीवनाच्या अखेरीस माणूस जे बोलतो ते सत्य म्हणून स्वीकारलं जातं. म्हणूनच अनेक वेळा मृत्यूच्या जवळ पोचलेल्या माणसाचं निवेदन (डाईंग मॅन्स स्टेटमेंट) हे कोर्टातसुद्धा पुरावा म्हणून स्वीकारलं जातं. असो.
व्यावहारिकदृष्ट्या आपण ही प्रार्थना नेहमीच्या जीवनातसुद्धा अंमलात आणू शकतो.
* रोज दिवसाच्या शेवटी झोपताना त्या दिवसाचं आपलं वर्तन आठवून काय योग्य, काय अयोग्य अशी कर्मं आपल्या हातून घडली याचा विचार करावा. चुकीच्या कृती सुधारण्याचा आणि योग्य कृती अधिक परिणामकारक किंवा प्रभावी कशा होतील याचा विचार करावा. निदान अशी प्रार्थना तरी सद्गुरुंना किंवा आपल्या अंतर्मनाला करावी.

* अशा नित्य अभ्यासानं आपली सद्सद्विवेकबुद्धी म्हणजे योग्य- अयोग्य समजण्याची बुद्धी विकसित होईल. आपला अंतरात्मा जागा होईल, आतला आवाज आपल्याला मार्गदर्शन करु लागेल. पण हे सदैव लक्षात ठेवायचं- ‘क्रतो स्मर, कृतं स्मर.’
* आठवड्याच्या शेवटी असलेली सुटी ही जागेपणी डोळे बंद करून, एकांतात (शक्य असेल तर ध्यानावस्थेत) आठवड्यातील बर्‍या-वाईट, सद्बुद्धीला पटणार्‍या- न पटणार्‍या कृतींची पुनरावृत्ती मनात करणं अन् आर्तपणे वाईट बुद्धीतून कर्म करण्याची प्रवृत्ती नष्ट करण्याचा संकल्प करणं या केवळ अर्ध्या तासाच्या अभ्यासाचा जीवनाच्या कल्याणमय विकासासाठी खूप उपयोग होतो.
* शक्य असेल तर महिन्यातून एखादा दिवस शांत मंदिरात किंवा निसर्गस्थळी एकटंच राहून एकांतात जीवनातील भूत- वर्तमान- भविष्यकालीन घटनांबद्दल चिंतन करणं. याला मनाचा प्रत्याहार (रिट्रीट) म्हणायला हरकत नाही.

* निदान नव्या वर्षाच्या किंवा वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला जीवनातील आजवरच्या वाटचालीचा आढावा, भावी जीवनाबद्दल काही संकल्प करायला हरकत नाही. हे सारं करताना आपली प्रार्थना हीच असली पाहिजे, ‘हे परमशक्तिमान परमेश्‍वरा, जीवनातील सत्याचं दर्शन होण्याच्या आड येणार्‍या सर्व दिखावटी, चमकदार वस्तूंचं खरं ज्ञान करून दे. प्रलोभनं, आकर्षणं, पतनाचे क्षण यापासून माझं रक्षण कर.

जिवंत असतानाच मला शांत, तृप्त, समाधानी, आनंदी अशा ‘अमृत अवस्थेचा’ अनुभव दे’. सध्याच्या मृत्यूचं तांडव चालू असलेल्या काळात तर या प्रार्थनेचं महत्त्व अधिकच आहे.
मृत्योर्मा अमृतं गमय… अमृतं गमय… अमृतं गमय |

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

गो गोवा ऑर्गेनिक

श्रीरंग व्यंकटेश जांभळे सध्या चालू असलेला शेतीतील रसायनांचा वापर जमीन, पर्यावरण, प्राणी, मनुष्य यांच्या आरोग्याला घातक असून याचे...

‘कोरोना’च्या आशीर्वादाचे- असेही अभ्यंग… अवती-भवती

अंजली आमोणकर या लॉकडाऊनपायी मिळालेल्या जबरदस्तीच्या कैदेत सर्वांना ‘मनाच्या अभ्यंगाचा’ आशीर्वाद मिळून गेला. एकमेकांचा यथेच्छ सहवास मिळाल्यामुळे, मनातल्या...

सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक तजवीज

शशांक मो. गुळगुळे तुम्ही पेन्शनधारक असाल तर महिन्याला निश्‍चित ठरावीक उत्पन्न मिळू शकते. पेन्शन वृद्धांना स्वावलंबी बनवते. म्हणून...

दुभंगलेला अमेरिकन समाज

दत्ता भि. नाईक आतापर्यंत अमेरिकेतील द्विपक्षीय लोकशाही खेळीमेळीने चालते असा लौकिक होता. दोन्ही पक्षांमध्ये देशाच्या ध्येयधोरणांविषयी मतभिन्नता नसल्यामुळे...

कोरोनानंतरचे अर्थकारण

महेश देशपांडे, (गुंतवणूक सल्लागार) कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बरेच काही बदलणार आहे. गुंतवणूक म्हणून मालमत्तेपेक्षाही शेअर्स तसंच...

ALSO IN THIS SECTION

धान्यवर्ग

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज-पणजी) जिथे जे पिकते ते खावे, या न्यायाने संपूर्ण कोकणवासीय भात खाऊ शकतात.तांदळाच्या वरच्या कोंड्यात...

बायोस्कोप – ३ कोकोच शत्रू कोकोचा

प्रा. रमेश सप्रे तुझा सर्वांत चांगला मित्र (हितचिंतक) तू स्वतःच आहेस आणि तुझा सगळ्यात वाईट शत्रू (हितशत्रू)ही तूच...

तेथे कर माझे जुळती!

योगसाधना - ४९०अंतरंग योग - ७५ डॉ. सीताकांत घाणेकर ...

कोरोना लस पूर्वचाचणी

मंजुषा पराग केळकर माझे नातेवाईक, मित्रमैत्रिणी ह्यांनी खूप कौतुक केले व खूप शाबासकी दिली, धीर दिला. वेळोवेळी फोनवरुन...

मेळावली आंदोलनप्रकरणी तिघांची जामीनावर सुटका

शेळ मेळावली येथील आयआयटी संकुलाच्या जमीन सीमांकनाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात सहभागी झाल्या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केलेल्या तिघांजणांची काल जामीनावर काल...