मृत्यूचे तांडव

0
11

लागोपाठ घडलेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनांनी अमेरिका हादरली आहे. कॅलिफोर्निया, लोवा आणि आता लॉस एंजिलीस येथील अवघ्या 48 तासांतील या घटनांनी अमेरिकेतील शस्त्रांच्या सुळसुळाटाचा प्रश्न पुन्हा एकवार चर्चेत आला आहे. जगातल्या कोणत्याही देशात नाही, एवढा हिंसाचार अमेरिकेत सतत घडत असतो. अंदाधुंद गोळीबारात निष्पापांचा जीव घेण्याचे प्रकार तर सतत घडत असतात. सन 2000 ते 2020 या वीस वर्षांच्या काळात त्या देशात अंदाधुंद गोळीबाराच्या जवळजवळ पावणे चारशे घटना घडल्या व त्यात हजारावर निरपराध नागरिकांचा बळी गेला. अमेरिकेतील अनेक शाळांमधूनदेखील अशा अंदाधुंद गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत. 2017 साली लास वेगासमध्ये केल्या गेलेल्या गोळीबारात तर पन्नासच्या वर माणसे मृत्युमुखी पडली होती, तर पाचशेहून अधिक जखमी झाली होती. गेल्या वर्षी म्हणजे सन 2022 मध्ये अमेरिकेत गोळीबाराच्या 647 घटना घडल्याची व एकूण 44 हजार लोक मृत्युमुखी पडल्याची अधिकृत नोंद आहे. त्यात गोळी झाडून घेऊन केलेल्या आत्महत्या, खून यांचाही अर्थातच समावेश होतो. अमेरिकेच्या विविध प्रांतांमध्ये मिळून दरवर्षी सरासरी चाळीस हजारांहून अधिक लोक गोळीबारात मरण पावतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या घटना घडत असूनही तेथे शस्त्रास्त्रे बाळगण्याबाबतचे कायदे कडक का होत नाहीत असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. परंतु तेथील संस्कृती, राजकारण, कायदा, मानवाधिकार असे अनेक प्रश्न त्यात गुंतलेले आहेत, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी जात असूनही शस्त्रे बाळगण्यावर निर्बंध घालण्याची तेथील कोणत्याही सरकारची तयारी दिसत नाही.
एका स्वीस संशोधन प्रकल्पात अमेरिकेत घरोघरी किती शस्त्रे असतील याचा अभ्यास केला गेला, त्यात जवळजवळ 42 टक्के घरांत शस्त्रे आहेत असे आढळले. घरोघरी असलेल्या एकूण शस्त्रांची संख्या भरली 39 कोटी! यात अर्थातच लष्कर, पोलीस किंवा अन्य यंत्रणांपाशी असलेल्या शस्त्रांचा समावेश नव्हता. केवळ वैयक्तिक वापरातील शस्त्रांची ही संख्या होती. तरीही तेथील कायदे आणि जनता सरकारला शस्त्रे बाळगण्यावर बंदी का आणू देत नाही हे समजून घेण्यासाठी आपल्याला अमेरिकी संस्कृती आणि इतिहासात डोकवावे लागेल. शस्त्रे बाळगणे हे तेथे प्रतिष्ठेचे मानले जात आले आहे. पूर्वीच्या काळी शिकारीसाठी आणि प्रतिष्ठेखातर ती बाळगली जायची. आजच्या काळात स्वसंरक्षणाच्या नावाखाली ती बाळगली जातात एवढेच. मूळ अमेरिकनांमध्ये जवळ शस्त्रे बाळगणे हे अस्मितेचे प्रतीक मानले जाते. मानवाधिकारांविषयी प्रचंड जागरूकता असलेला तो देश आहे. त्यांच्या संविधानाच्या दुसऱ्या सुधारणेमध्ये एक वाक्य आहे. त्यात म्हटले आहे की सुसज्ज लष्कर तर बाळगले जावे, परंतु शस्त्रे बाळगण्याच्या नागरिकांच्या अधिकारांवर अतिक्रमण केले जाऊ नये. शस्त्रे बाळगण्यावर बंदी आणण्यास विरोध करणारे ह्याच कलमाकडे बोट दाखवत आले आहेत. तेथील सर्वोच्च न्यायालयानेही याच कलमाचा आधार घेत कोलंबिया वि. हेलर या सन 2008 मधील खटल्यात दुष्प्रवृतीच्या लोकांना रोखण्यासाठी सत्प्रवृत्तीच्या लोकांना शस्त्रे बाळगता यायला हवीत असा निवाडा दिला. त्यामुळे कितीही हिंसाचार होत असला, तरी हा ‘गुड गाय विथ अ गन’ सिद्धान्त पुढे केला जात आला आहे. यात अडचण एवढीच आहे की सत्प्रवृत्त कोण आणि दुष्प्रवृत्त कोण हे शोधणे अवघड आहे. अमली पदार्थांचा सुळसुळाट, मानसिक आरोग्याच्या समस्या असे या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत. स्वसंरक्षणासाठी जवळ शस्त्र नसेल तर गुन्हेगार आपल्याला धोका पोहोचवतील ही भीतीही नागरिकांत आहे.
गेल्यावर्षी एक विधेयक संमत करण्यात आले आहे, त्यात 21 वर्षांखालील शस्त्र खरेदीदाराची पार्श्वभूमी तपासण्यास संमती दिली गेली व घरगुती हिंसाचाराची पार्श्वभूमी असलेल्यांनाही शस्त्र देण्यावर बंधने आली. परंतु तरीही उघडपणे शस्त्रांचा बाजार खुलेआम चालतो आणि नॅशनल रायफल असोसिएशनसारखी आर्थिक आणि राजकीय बळ असलेली संघटना शस्त्रे बाळगण्याचे जोरदार समर्थन करीत राहिली आहे आणि राजकारण्यांना आपल्या धाकात ठेवत आली आहे. शस्त्रे बाळगण्यावर बंदी घालण्यास अमेरिकी जनता फार मोठ्या प्रमाणात अनुत्सुक दिसते. ह्या सगळ्या मतदारांच्या भावना दुर्लक्षित करणे राजकारण्यांनाही शक्य नसल्यानेच शस्त्रांवर बंदी घालणे सोडाच, तसा विचारही कोणी बोलून दाखवताना दिसत नाही. अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासात त्यांचे जेवढे सैनिक मारले गेले, त्याहून अधिक लोक गोळीबारांत मारले गेले आहेत, परंतु तरीही शस्त्र बाळगण्यावर बंदी येऊ शकत नाही आणि असे भीषण अंदाधुंद गोळीबारही रोखता येत नाहीत.