मूल्यधारित शिक्षणाची गरज

0
2211

– शिरीषकुमार आमशेकर

गेल्या दोन दशकांत आपल्या देशात खूप प्रगती झाली. अविकसित देश – विकसनशील देश ते आता आपण विकसित देशांच्या यादीमध्ये गणले जावू लागणार अशी चिन्हे दिसत आहेत. आपल्या देशाचा स्वत:चा महासंगणक डॉ. विजय भटकरांच्या नेतृत्वाखाली तयार करून अमेरिकन संगणक क्षेत्रातील शास्त्रज्ञ व देशासमोर एक मोठे आव्हान आपण ऊभे केले तसेच अवकाशात अत्यावश्यक असणारे क्रायोजिनीक तंत्रज्ञानही आपण विकसित केले. परवा तर आपल्या पंतप्रधानानी आपण पहात असलेले डिजीटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी उपाय-योजना आकार घेऊ लागल्याचे बोलूने दाखवले तसेच एकाच वेळी १८ लक्ष शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची किमया करून दाखवली.
परंतु उपरोल्लेखित चित्र जेवढं तेजोमय, गौरवास्पद आहे तेवढंच दुसर्‍या बाजूने आपण पाहीलं तर परिस्थिती भयावह, चिंताजनक व धोक्याची सूचना – घंटा वाजवणारी आहे. उदाहरणार्थ काही निवडक घटना पाहू. वाणिज्य आणि उद्योग मंडल यांच्या वतीने केलेल्या सर्वेक्षणात वय वर्षे १४ ते १९ या वयोगटातील १५०० जणांशी व २० ते २९ वर्ष या वयोगटातील १००० तरुण-तरुणींशी वार्तालाप केला गेला. त्यातील ६०% मुलांनी कबूल केले की वाढदिवस, नववर्षानिमित्त होणार्‍या समारंभामध्ये आम्ही दारूचे सेवन करतो व अन्य काळात सुमारे १००० ते १०००० रु. दारुवर खर्च करतो. एकदा ‘डेक्कन हेराल्ड’ या प्रसिद्ध दैनिकात काही प्रतिभावान, प्रतिष्ठीतांचे किस्से छापले होते ज्यामध्ये हे संगणक अभियंता, व्यवस्थापन क्षेत्रातील प्रोङ्गेशनल्स सांगतात की स्वातंत्र्यदिन का साजरा करतात हे मला माहीती नाही. दुसर्‍या प्रकारची प्रतिक्रिया स्वातंत्र्यदिन का साजरा करतात ते जाणून घेण्यात मला स्वारस्य नाही. तिसर्‍या प्रकारामध्ये महानुभव सांगतात स्वातंत्र्यदिन साजरा करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. आपल्या गोव्यातील कांदोळी, कळंगुटचे चित्र तर ङ्गारच भयावह आहे. तरुण पिढी ड्र्‌ग्जच्या आहारी गेली आहे. झटपट पैशाच्या हव्यासापोटी स्थानिक लोक घराबाहेर रहातात व परदेशी पाहुणे शयनकक्षात झोपतात. घरच्या पोरा-बाळांवर त्यांचे उघडे-नागडे चाळे पहाण्या वाचून गत्यंतर नसते. या सर्व घटना कशाच्या परिचायक आहेत? या, आणि अशा असंख्य अन्य प्रकारात मोडणार्‍या घटना शिक्षण व्यवस्थेमध्ये असलेल्या त्रुटींचे सुस्पष्ट प्रतिबिंब आहे.
अत्यंत गतिमान व प्रगतिशील जीवनाच्या झगमगाटात जीवन मूल्ये संदर्भहीन तर झाली नाहीत ना! असा संभ्रम भल्या-भल्यांच्या मनात निर्माण होतो. शिक्षणामध्ये जीवनमूल्ये असावीत का? त्यांची काही आवश्यकता आहे का? समजा आवश्यकता आहे तर या शाश्‍वत मूल्यांचा अंतर्भाव कसा करता येईल असे एक – ना अनेक प्रश्‍न अनेक सुशिक्षित, सुविद्य व अधिकारी व्यक्तींच्या मनात ऊभे राहातात व ते शिकत असताना शाश्‍वत मूल्यांचा अभाव असल्यामुळे, सध्या अधिकाराचा वापर करून, अज्ञानापोटी का होईना पण भावी पिढीचे न भरून निघणारे नुकसान करतात. महात्मा गांधी म्हणत असत की माझ्या कृतीने, माझ्या दृष्टीपथात असलेल्या शेवटच्या व्यक्तीच्या जीवनात जर कोणताही चांगला बदल घडणार नसेल तर ती कृती निरर्थक व अपायकारकच असेल. आणि त्या अनुषंगाने सर्वच अधिकारी व्यक्तींनी सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे अवलोकन ‘अंहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा:|’ अशा शाश्‍वत मूल्यांच्या प्रकाशात करण्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्यामुळे कुणी दु:खी होऊ नये, नेहमी सत्य बोलावे, अस्तेय म्हणजे चोरी करू नये, सर्व प्रकारे संयमित आचरण करावे व अपरिग्रह म्हणजे संग्रह करू नये या पाच गोष्टी म्हणजे सर्वच शाश्‍वत मूल्यांचे सार आहे.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांमधून निवड करायची झाल्यास बुद्ध्यांक पाहिला जायचा. सदर व्यक्तीचा बुद्ध्यांक हा निकष असायचा. परंतु १९९० च्या दशकानंतर ‘आयक्यू’सोबत इक्यू हा नवीन मापदंड वापरात आला. एवढेच नाही तर शास्त्रज्ञ अशा निष्कर्षांपर्यंत आले की बुद्ध्यांकाच्या प्रभावी व परिणामकारक वापरासाठी एखादी व्यक्ती मानसिक – भावनिकदृष्ट्या कणखर असणे अत्यावश्यक आहे. एखादी व्यक्ती मनाने कमकुवत असेल तर तीचा बुद्ध्यांक हा निष्प्रभ ठरू शकतो. परंतु आज-काल शास्त्रज्ञ अशा निष्कर्षापर्यंत पोचले आहेत की व्यक्तीचा ‘स्पिरिच्युअल कोशंट’ समजल्याशिवाय मनुष्याच्या बुद्धीमत्तेची चाचणी ही अपूर्णच रहाते. आता संपूर्ण जगामध्ये ‘स्पिरिच्युअल कोशंट’च्या वृद्धीसाठी म्हणजेच मनुष्याच्या परिपूर्ण अभिव्यक्तीसाठी श्री भगवदगीतेचे अध्ययन – अध्यापन सुरू झाले आहे. भारतीय तत्वज्ञान, जीवन पद्धती, भारतीय जीवनमूल्ये यांचे झपाट्याने अध्ययन सुरू झाले आहे. स्पिरिच्युअल कोशंट वाढवण्यासाठी तोच एकमात्र मार्ग जगातील सर्व विद्वानांना योग्य वाटतो. परंतु आपल्या देशातील संभ्रमावस्थेतील अधिकारी व बुद्धीजीवी वर्ग यांचे वागणे-बोलणे नेमके याच्या विपरीत आहे. दि. २ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्तीपदावरील व्यक्ती, संसदेतील एक लोक खासदार व प्रसिद्ध वकील अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींनी प्रचंड गदारोळ घातला, कारण काय तर एस. के. दवे या न्यायमूर्तीनी म्हटले की श्री भगवदगीता आणि रामायण हे मुलांना शालेय जीवनापासूनच शिकवलं गेलं पाहीजे. चर्चेची गुर्‍हाळं सुरू झाली. टिकेनेसुद्धा टोक गाठलं जणू काही न्यायमूर्ती दवे कुणी दहशतवादी असावेत. आता पहा, १६ व्या अध्यायामध्ये श्‍लोक क्र. १ ते ३ यात भगवान श्रीकृष्णांनी कोणत्या गुणांची जोपासना करावी या संदर्भात सुंदर विवेचन केले आहे. ते म्हणतात – भयाचा पूर्ण अभाव, अंत:करणाची पूर्ण निर्मळता, तत्वज्ञान जाणून घेण्यासाठी ध्यान – योगाची निरंतर दृढ स्थिती, सत्‌पात्री अन् सात्त्विक दान, इंद्रीयांचे दमन, स्वाध्याय, तप, काया – वाचा – मनाने कोणालाही कष्ट न देणे, यथार्थ व प्रिय संभाषण, आपल्याला अपकार करणार्‍यांवरही न रागावणे, ‘मी’ केलं भावनेचा त्याग, निंदा न करणे, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया, इंद्रीयांचा विषयांशी संयोग झाला तरी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोक व शास्त्रविरुद्ध आचरणाची लाज, इत्यादी तीसेक गुणांचा समुच्चय सांगितला आहे. कोणत्याही जाती – पंथ – धर्म – देशामध्ये चांगल्या आचरणाची व्याख्या या पेक्षा वेगळी काय असू शकते? यामध्ये कोणत्या सांप्रदायिक, सर्व – धर्म समभाव विरोधी (नॉन सेक्युलर) गुणांचा उल्लेख आहे? जर आपल्याला सुखी – समाधानी – समृद्ध भारत घडवायचा असेल तर मग ‘कॉल द डॉग मॅड अँड शूट’ या वृत्ती प्रमाणे ‘ते’ हिंदू तत्वज्ञान आहे, म्हणून ते सांप्रदायिक आहे, असे लेबल लावून नाकारण्यात काय मिळणार आहे? आज यूरोपीय व पाश्‍चात्य देशांमधील अनेक शाळांमध्ये श्री भगवद्गीता शिकवली जाते व त्यालाच ते मूल्यशिक्षण मानतात. भगवद्गीता असो वा रामायण – महाभारत असो वा वेदातील ऋचा असोत, या सर्वच प्राचीन भारतीय साहित्यातील प्रत्येक पान्‌न पान शाश्‍वत जीवन मूल्यांना अर्पिलेले आहे याची आपल्याला वारंवार प्रचिती येत असते.
पूर्वीचा भारत व आजची इंडिया यांचा नैतिकतेच्या निकषावर तौलनिक अभ्यास केल्यास आंधळ्या – बहिर्‍यालासुद्धा जाणवेल की शिक्षणामध्ये मूल्यांचा अभाव असल्यामुळे समाजाचे झपाट्याने अध:पतन होत आहे. ह्युएन्‌संग या चीनी प्रवाशाने लिहून ठेवले आहे की भारतात कारागृह आहेत; पण त्यात बंदिवान नाहीत. बाहेर पडताना घराना कुलुपं लावावी लागत नाहीत. याचाच अर्थ असा होतो की भारतीय साहित्याच्या पानोपानी आढळणार्‍या उच्च नैतिक मूल्यांच्या आधारे जीवन जगणारा समाज समृद्ध व समाधानी होता. ‘परद्रव्येषुलोष्ठवत्’ हे फक्त पाठ करण्यापुरते नसून लोक व्यवहारामध्ये, त्या प्रमाणे आचरण करीत असत. या तुलनेत आजच्या इंडीयामध्ये परिस्थिती पहा कशी आहे. ट्रान्स्परन्सी इंटरनेशनल या संस्थेद्वारा प्रकाशित ‘करप्शन परसेप्शन इंडेक्स २०१३’ या अहवालामध्ये, जगामधील १७७ देशांमध्ये भ्रष्टाचाराच्याबाबतीत आपला क्रमांक ९४ वा आहे. आपल्या शेजारील मालदीव, श्रीलंका, स्वीत्झर्लंड या देशांपेक्षासुद्धा आपण अधिक भ्रष्ट आहोत. ग्लोबल फायनान्सियल इंटीग्रिटी (जीआयएफ) केलेल्या सर्वेक्षणात इ. सन २०११ मध्ये ४ लक्ष करोड रुपये काळा पैसा (वार्षिक बजेटच्या एक तृतीयांश) भारताबाहेर गेला. सन २००२ ते २०१० या कालावधीत १५.७ करोड रुपये काळ्या पैशाच्या रुपाने देशाबाहेर गेला. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा १६ लक्ष रु. होती. परंतु प्रलोभनासाठी वाटताना जप्त केलेला पैसा याच्या कितीतरी पट जास्त आहे. दिल्ली रु. २६.६८ करोड, राजस्थान १३.४ करोड, छत्तीसगढ १० करोड इत्यादी.
अशाप्रकारे जीवन जगण्याच्या कोणत्याही अंगासंदर्भात तुलना केली तर अध:पतनाची धोक्याची रेषा ओलांडल्याचे प्रकर्षाने लक्षात येते. एका राज्यामध्ये सन २०१३ सालात २५०५ बलात्काराची प्रकरणे पोलिसांकडे नोंद झाली. लोक लज्जेस्तव नोंद न झालेली किती प्रकरणे असतील याची कल्पना सूज्ञ वाचक करू शकतील. कन्या भ्रूणहत्या, लव्हजीहाद, हुंडाबळी असे अनेक किळसवाणे प्रकार आपल्याला एवढे सवयीचे झाले आहेत की आपल्या संवेदनाच मेल्या आहेत. आपण प्रतिक्रीयाही व्यक्त करत नाही. विचारप्रक्रीयेलाच जणू पक्षाघाताचा झटका आलाय. याचीच दुसरी बाजू तेवढीच किंबहुना त्याहून बीभत्स आहे. पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करत काही मोठ्या शहरांमध्ये मुली व महिला स्लट वॉक काढतात. (म्हणजेच शरीराचे अंग दाखवण्यासाठी, झाकण्यासाठी नव्हे, कमीत कमी कपडे घालून मिरवणूक काढणे.) असे जे विविध प्रकारचे अध:पतन चालू आहे त्याला न्यायव्यवस्थेतून, पोलिस वा शासनामार्ङ्गत परिणामकारक व समाधानकारक उत्तर कधीच व कुठल्याच देशात मिळू शकणार नाही. त्यासाठी ‘मातृवत परदारेषु’, ‘आत्मवत सर्वभूतेषु’ अशा प्रकारचे संस्कार बालवयापासूनच करावे लागतील. मनुस्मृतीमध्ये सांगीतल्याप्रमाणे ‘उपाध्यायान्‌दशाचार्य, आचार्याणां शतंपिता, सहस्तंतुपितान्माता गौरवेणातिरिच्यते’ (शंभर शिक्षकांपेक्षा वडिल, व हजार वडीलांपेक्षा माता श्रेष्ठ) याचा जर शिक्षणामध्ये अतर्ंभाव केला तरच आईचे श्रेष्ठत्व कळेल व पर्यायाने स्त्रीकडे पहाण्याचा सुयोग्य दृष्टीकोन निर्माण होईल. मनाची घडण चांगली होईल व त्यातून वर्तन सुधारेल. अथर्व वेद असो, ऋग्वेद असो, तैत्तरिय उपनिषदांसारखी अन्य उपनिषदे असोत सर्वत्र मन – मस्तिष्क व जीवन व्यवहार या संदर्भातीलच चर्चा – प्रबोधन आढळते. अग्निपुराणामध्ये पहा कसा उल्लेख सापडतो; सत्वेषु मैत्री गुणिषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपापरत्वम् – हे भगवन् ! अशी कृपा कर की सर्व जीवमात्रांशी माझी मैत्री जडो, गुणी व्यक्तींच्या सान्नीध्यात मला प्रसन्नता प्रदान कर, दु:खीतांचेप्रती दयाभाव, बुद्धी दे व दुष्ट व्यक्तींच्या प्रती ना प्रेम ना वैर – तटस्थता भाव दे. आदिशंकराचार्य म्हणतात ‘किं भूषणाद्भूषणमस्ति शीलम्’ अर्थात उत्तम चरित्र हेच सर्वोपरी भूषण आहे. अशा सर्व मूल्यांचे आचरणच मनुष्याचे जीवन उन्नत करतात. ऋषीतुल्य व्यक्तींचे आचरण तद्नुसार असल्यामुळेच आपण त्यांचे स्मरण करतो.
भारतीय जीवन दर्शनामध्ये सजीव, दोन गटांमधे विभागले आहेत. पशुपक्षी, वनस्पती, कीटक ज्यांच्यामध्ये पाप-पुण्यादी कर्म – संचय नाही. ते प्राय:मांसाहारी असतात व जीवहत्येच्या पापातून मुक्त असतात. परंतु मनुष्याला कोणते कर्म करावे याचा विकल्प आहे. जीथे विकल्प आहे तिथे काय करावे – करू नये याचे विधिनिषेध आहेत. जीथे विकल्प आहे तिथे काय करावे याचा संकल्प करावा लागतो. कोणत्याही समाज नियम – अनुशासनाशिवाय अस्तित्वातच असू शकत नाही. त्या नियमांनाच मूल्य म्हणतात व त्या नियमांच पालन म्हणजेच संस्कार जीथे नियमांच पालन होत नाही तिथे दंड – शिक्षा – लाचलुचपत इत्यादी चक्र सुरू होते. याचाच अर्थ संस्कार करण्याची स्वाभाविक शैक्षणिक व्यवस्था कमकुवत – कमजोर आहे. पूर्वीच्या काळी तुरुंग रिकामे असायचे व घरांना कुलुपे नसत याचा अर्थ संस्कार करण्याची व्यवस्था ठाकठिक होती. अशीच अवस्था पुन्हा निर्माण व्हावी यासाठी आतापर्यंतच्या सर्व छरींळेपरश्र र्उीीीळर्लीर्श्रीा ऋीराशुेीज्ञ जे गठित झाले, त्या सर्वांनी मूल्य शिक्षणावर खूप जोरकस भर दिला आहे. २००० सालच्या एनसीएफने तर शिक्षक मग तो विज्ञान – गणितचा असू दे अथवा भाषा – क्रीडा शिक्षक असू दे, प्रत्येक शिक्षक मूल्यांचा वाहक – प्रेरक असावा अशी शिङ्गारस केली आहे. पाच मूल्यांची शिङ्गारस केली होती; सत्य – शांती – अहिंसा – उचित व्यवहार व प्रेम. परंतु हाय दुर्दैव! अरुणा रॉय व चौकडीला यामध्ये सांप्रदायिकता दिसली व या शिङ्गारशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यावर न्या. डी. एम. धर्माधिकारी यांनी निकाल देतानासुद्धा सर्व सरकारी व निमसरकारी शाळांमध्ये महान संत जसे की कबीर, गुरुनानक, महावीर आदींच्या जीवन व कार्याविषयी माहिती द्यावी, धार्मिक शिक्षण द्यावं व धर्म म्हणजे रीलीजीयन नसून नैतिक मूल्य वा नीति असा घ्यावा असा निकाल दिला व पुढे असेही म्हटले की सत्य, प्रेम, करुणा या मानवीय गुणांनाच हिंदू, सनातन धर्म म्हणून संबोधतात.
अंततोगत्वा अथर्व वेदानुसार ‘मधुमन्ये निक्रमणं मधुमन्मे परायणम् | वाचा वदामि मधुमद् भूयासं मधु संदृश:’ अर्थात माझ्या समस्त प्रवृती मधुरतायुक्त असू द्या, माझ्या निवृत्ती मधुरतायुक्त असूद्या. माझ्या वाणीमधून नेहमी मधुर उच्चारण व्हावे आणि माझ्या अंत:चक्षू; बाह्य चक्षूद्वारे सतत् पूर्ण सन्मात्रा – चिन्मात्रा परमानन्दस्वरुप मधुब्रह्माचेच दर्शन घडत राहो.
………..