मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुस्लीम समाज बांधवांना सरकारी नोकर्या, प्राथमिक उर्दू शाळांना चांगल्या सुविधा, कबरस्तान, मुस्लीम विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत व चांगल्या सुविधा आदी महत्त्वाच्या मागण्यांसह गोव्यातील मुस्लीम बांधवांच्या बहुतेक मागण्या मान्य करण्याचे व एक एक करून त्या पूर्ण करण्याचे आश्वासन काल शनिवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजीत गोवा मुस्लीम फोरम संघटनेला दिले.
गोवा मुस्लीम फोरमने काल पणजीत मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी वार्तालाप व त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यासाठी एक खास सभा आयोजित केली होती. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. पर्रीकर यांनी त्यांना वरीलप्रमाणे आश्वासन दिले.
मुस्लीम समाजबांधवांनी केलेल्या नोकरी संदर्भातील आरक्षणाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, तसे आरक्षण देणे आपल्या हातात नाही. मात्र आरक्षणाची तरतूद न करता मुस्लीम बांधवांना सरकारी नोकर्या देणे शक्य आहे. नोकर्यांची जाहिरात प्रसिद्ध झाली की, तुम्ही अर्ज करा, तुम्हांला नोकर्या देण्याची जबाबदारी माझी राहील असे ते म्हणाले. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी तुम्ही अर्ज केला नाही तर नोकर्या मिळणार नाहीत अशी पुस्तीही जोडली.
उर्दू शाळा व शिक्षकांना कोणत्या सुविधा हव्यात व कोणत्या मिळत नाहीत, तसेच सरकारकडून शिक्षणासाठी कोणती व कशी मदत हवी ते लेखी स्वरूपात देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी कब्रस्तानबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्र्यांनी जागा उपलब्ध असेल तर तो प्रश्न तात्काळ सोडवू असे सांगितले. हिंदू व मुस्लीम समाजबांधवांनी सतत एकमेकांच्या संपर्कात राहिल्यास एकमेकांविषयी विश्वास निर्माण होण्यास मदत होईल व धार्मिक स्थळांवरून वाद होण्याची घटना टळेल असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हज यात्रेसाठी अनुदान देण्याची घोषणाही केली. आपण लवकरच हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन प्रतिनिधी असलेले एक सल्लागार मंडळ स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुस्लीम बांधवांच्या एका शिष्टमंडळाशी १३ किंवा १४ एप्रिल रोजी चर्चा करून कोणत्या मागण्यांना प्राधान्यक्रम द्यावा याचा निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी मुस्लीम बांधवांची दोन महामंडळाचे अध्यक्षपद देण्याची मागणीही पूर्ण करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. फोरमतर्फे मुख्यमंत्र्यांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी सुमारे ५०० मुस्लीम समाजबांधव उपस्थित होते.