मुस्लिम व्यक्तीला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी का नेमत नाही? : मोदी

0
2

काँग्रेसला कुणाचे भले झाले पाहिजे असे कधीही वाटलेले नाही. मुस्लिमांचे भले करावे, असेही काँग्रेसला कधीच वाटलेले नाही. काँग्रेसने कायम मुस्लिमांच्या लांगुलचालनाचे राजकारण केले; पण त्यामुळे मुस्लिमांचा काहीही फायदा झालेला नाही, उलट नुकसान झाले. काँग्रेसने फक्त काही कट्टरपंथीय लोकांना खुश करण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे इतर समाज हाल अपेष्टाच सहन करत राहिला. काँग्रेसच्या कुनीतीचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे वक्फ कायदा आहे. आता नव्या तरतुदींमुळे वक्फच्या पवित्र भावनेचा सन्मान होईल. तसेच माझा काँग्रेसला सवाल आहे की जर तुम्हाला मुस्लिमांचा कळवळा आहे, तर मग तुमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुस्लिम व्यक्तीला का नेमत नाही? असा बोचरा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारला. हरियाणातल्या हिसारमधील सभेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल हरियाणा दौऱ्यावर होते. सकाळी 10 वाजता त्यांनी हिसारमधील हरियाणाच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन केले. येथून हिसार-अयोध्या विमान उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यानंतर पंतप्रधान यमुनानगरला पोहोचले. येथे त्यांनी 800 मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक वीज प्रकल्प युनिट, कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची पायाभरणी केली आणि रेवाडी बायपासचे उद्घाटन केले.
जर काँग्रेस पक्षाला मनापासून मुस्लिमांबद्दल थोडीशीही सहानुभूती असेल तर त्यांनी एका मुस्लिमाला त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष बनवावे, परंतु त्यांचे नेते असे काहीही करणार नाहीत. त्यांना फक्त देशातील नागरिकांचे हक्क हिरावून घ्यायचे आहेत, अशी टीकाही मोदींनी केली.