मुसळधार पावसामुळे मडगावात रस्ते पाण्याखाली

0
6

गुरुवारी पहाटेपासून वादळवारा व मुसळधार पावसामुळे सासष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तसेच रस्ते पाण्याखाली गेले. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. कित्येक ठिकाणी झाडे घरावर पडून लाखोंची हानी झाली. मडगाव शहरांत गटारे न उपसल्याने अनेक रस्त्यांवर पाणी साचले. शिवाय मडगाव पालिका इमारतीतही पाणी घुसले.

अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार काल पहाटेपासून त्यांना 15 ठिकाणावरुन फोन आले. कोंब येथे शेख यांच्या गॅरेजवर झाड कोसळून 50 हजारांची हानी, तर आके बायश येथे आयोलिना व्हाज यांच्या घरावर माड पडल्याने घराचा अर्धाभाग कोसळून 20 हजारांचे नुकसान झाले. तळावली-नावेली येथे घरावर झाड पडून हजारो रुपयांचे नुकसान झाले.

नावेली, धर्मापूर, वारका, करमणे, ओडली, कुंकळी, बाळळी येथे झाडे रस्त्यावर कोसळली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय काही ठिकाणी विजेचे खांबही मोडून पडले. कदंब बस स्थानकाजवळ फर्निचर दुकानाचे छत कोसळले. पुरुमेताच्या फेस्तासाठी फेरी भरली होती, त्या दुकानांतही पाणी भरले.

हल्लीच डांबरीकरण केलेल्या रस्त्याचा थर उंच झाल्याने मडगाव शहरातील दुकानात पावसाचे पाणी शिरले. त्यात दुकानातील माल भिजला. पालिकेने गटारे उपसली नसल्याने ते पाणी पालिका इमारतीच्या तळमजल्यात घुसले. इमारती सभोवती पाण्याचा पूर आला होता. तसेच सोनसोड्यावरील केरकचरा वाहून तेथील रस्ते कचरामय बनले होते.