मुसळधार पावसाने राज्याला झोडपले

0
10

>> चोवीस तासांत 2.37 इंच पाऊस

>> आज व उद्याही जोरदार पावसाची शक्यता

चतुर्थी सणापासून राज्यात सुरू झालेल्या पावसाने मागील एक-दोन दिवस थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा जोर धरला आहे. काल सकाळपासून पावसाने गोव्याला झोडपून काढले. कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाने जोर धरला आहे.
अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गोव्याच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 2.37 इंच पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण 128.9 इंच पाऊस झाला आहे.

काल पडलेल्या जोरदार पावसामुळे राजधानी पणजीतील रस्ते पाण्याखाली गेले होते. तसेच शहरातील सखल भागात पाणी साचले होते. गोव्यासह कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ किनारपट्टीवर पाऊस असून चक्रीवादळाची शक्यताही निर्माण झाली आहे.

आज, उद्या पाऊस
आज 30 सप्टेंबर व उद्या 1 ऑक्टोबर असे दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने आज 30 रोजी राज्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असून राज्यातील काही भागांत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या दरम्यान 45-55 कि.मी. प्रती तास एवढ्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. काही भागात ताशी 65 कि.मी. एवढ्या वेगानेही वारे वाहण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

आज व उद्या 1 पावसाची शक्यता असल्याने थोड्या वेळासाठी राज्यातील रस्ते पाण्याखाली जाणे, सखल भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण होणे व घरात पाणी शिरणे, जुन्या घरांची पडझड होणे, जुने वृक्ष उन्मळून पडणे, किनाऱ्यांवर समुद्राला उधाण येणे, शेती पाण्याखाली जाणे, वीजपुरवठा खंडित होणे, दरडी कोसळणे, आदी गोष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

उद्या पिवळा अलर्ट
हवामान खात्याने उद्या 1 ऑक्टोबर रोजी राज्याला पिवळा अलर्ट दिला आहे. या दिवशी उत्तर तसेच दक्षिण गोव्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तर 2 व 3 ऑक्टोबर रोजी हिरवा अलर्ट दिला असून राज्यात पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे.
अरबी समुद्र तसेच बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असल्याने राज्यात पाऊस कोसळत असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.