खटल्यांची सुनावणी सुरू
परवेझ मुशर्रफ यांना देश सोडायला देऊ नका असे काल पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने सरकारला बजावले. लष्करी राजवटीदरम्यान २००७ साली आणिबाणी लागू केल्याप्रकरणी मुशर्रफ यांच्याविरुद्धच्या विविध याचिकांवर कालपासून सुनावणीस प्रारंभ झाला.
न्या. जावेद ख्वाजा यांच्या अध्यक्षतेखालील द्विसदस्यीय खंडपीठाने गृहसचिवांना मुशर्रफ यांच्या विदेश यात्रा रोखण्याचे आदेश दिले. मुशर्रफ यांच्याविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यासाठी पाच याचिका पाकिस्तान सुप्रीम कोर्टासमोर दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी आज होणार आहे. याचिकादारांच्या वकिलांनी युक्तीवाद करताना सांगितले की, मुशर्रफ देशात परतल्यावर त्यांना अटक करण्याचा ठराव २०१२ साली पाकिस्तानच्या वरिष्ठ व कनिष्ठ सभागृहांनी मंजूर केला होता, मात्र त्याची कार्यवाही झालेली नाही.

