मुलांच्या व्याधिक्षमत्व वाढीसाठी

0
13
 • डॉ. मनाली महेश पवार

मुलांची शारीरिक व मानसिक शक्ती कमी होत चालली आहे. म्हणजेच बलक्षय होत आहे. मुलं मुक्त वातावरणात खेळणार नाहीत, असत्त्व असा चटपटीत आहार खाणार, दिवसभर कुठले-कुठले क्लासेस, मग मोबाईल व टीव्ही. वेळेवर खाणं-पिणं नाही की वेळेवर झोपणं नाही! मग अशा स्थितीत मुलांची व्याधिप्रतिकारशक्ती कशी वाढणार?

‘शालान्त परीक्षेचे वारे वाहू लागले आणि मुलं गैरहजर राहण्याची संख्याही वाढत आहे’ असा सूर शाळेतील शिक्षकवर्ग व पालकही लावत आहेत. डॉक्टरकडेही मुलांना तपासणीसाठी घेऊन येत आहेत. मग असं अचानक काय घडलं?
वरचेवर मुलांना सर्दी-खोकला होत आहे. मुलं लगेच थकतात. नीट जेवत नाहीत, झोपतही नाहीत. जरा अभ्यास केल्यावर कंटाळतात. एका जागेवर मुलांना बसताच येत नाही. डोकेदुकी तर अगदी पहिलीतल्या मुलापासून ते 12 वीच्या मुलापर्यंत सतत चालू. आळस, तंद्री, अनिद्राबरोबर अतिनिद्रा, निस्तेजता इत्यादी विविध लक्षणे घेऊन पालक मुलांना तपासायला आणत आहेत.
थोडक्यात काय, तर मुलांची शारीरिक व मानसिक शक्ती कमी होत चालली आहे. म्हणजेच बलक्षय होत आहे किंवा मुलाची दिवसेंदिवस व्याधिप्रतिकारशक्ती घटत चालली आहे. मुलं मुक्त वातावरणात खेळणार नाहीत, असत्त्व असा चटपटीत आहार खाणार, दिवसभर कुठले-कुठले क्लासेस, मग मोबाईल व टीव्ही. वेळेवर खाणं-पिणं नाही की वेळेवर झोपणं नाही! एवढंच काय, नैसर्गिक विधींचासुद्धा अवरोध! मग अशा स्थितीत मुलांची व्याधिप्रतिकारशक्ती कशी वाढणार? जरासा ऋतूपालटसुद्धा ही मुलं सहन करू शकत नाहीत. खरं तर पालकहो, आता गरज आहे ‘लाईफ स्टाईल’ बदलण्याची. हे सगळे जे बदल आपण आपल्या पाल्यामध्ये बघतो त्याचे कारण आहे पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण. भारतीय संस्कृती आपल्याला जुनाट वाटते. पण जर आयुर्वेदशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, स्वास्त्यवृत्तीचे पालन केल्यास हे व्याधिक्षमत्व आपोआपच निर्माण होईल. त्यासाठी गरज आहे थोडंसं आपल्या आहार-विहार-आचरणात बदल घडवण्याची.
संतुलित आहार जसा आपले स्वास्थ्य घडवतो, तसेच अहितकर आहार अनेक आजारांना निमंत्रणही देतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे आहे तो हितकर आहाराचे सेवन. आज मुलांना फास्ट फूड, जंक फूड, रेडी टू युज फूड, चटपटीत-तेलकट पदार्थ, थंड पदार्थ, फ्रिजमधील पदार्थ इत्यादी जास्त आवडतात व मुलं तेच खातात असे मातांचे मत असते. चांगला साजूक तुपातला सुका मेवा घातलेला शिरा मुलांना आवडत नाही. ती खात नाहीत. दोन मिनिट मॅगी नूडल्स मात्र आवडीने खातात. त्यामुळे जे आवडीने खातात तेच द्यायचं या न्यायाने पालकही त्यांच्या मनासारखे होऊ दे म्हणून निसत्त्व, अयोग्य आहाराला प्रोत्साहन देतात (अर्थात, सर्वच नाहीत). वरून ताकद येण्यासाठी दूध व बुस्ट, हॉर्लिक्स, बोअर्नव्हिटा इत्यादी. नाश्ता हा प्रकार बऱ्याच शाळकरी मुलांना माहीतच नाही. शाळेत जाताना आम्ही एक ग्लास दूध मुलांना देतो, असे गर्वाने सांगणारे पालकही आम्हाला भेटले. आम्ही शाळेचा माध्यान्ह आहार देत नाही, घरूनच डबा देतो. डब्यात काय… बिस्किटं, केक किंवा बेकरीमधून सामोसा, पॅटिस, पेस्टी घालायचं. वाढदिवसाला कापायचा केक आता रोजच्या खाण्यातला पदार्थ बनला आहे.
मैद्याचा पदार्थ म्हणजे ज्यातून काहीच सत्त्व मिळत नाही ते मुलांच्या आवडीचे. तेलात तळलेले पदार्थ आवडतात, पण तेही अहितकर. त्यामुळे मुलांना निःसत्त्व, जिभेचे लाड पुरवणारा आहार देऊ नका. मुलांना पोषक आहार सेवनाची सवय लावा.
भाकरी-भाजी खाणारा पुराणकालीन व ब्रेड-बटर खाणारा मॉडर्न होत नसतो किंवा गरीब-श्रीमंतही नसतो, हा भेद आता मुलांना समजवण्याची वेळ आली आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पोषकतत्त्वांची आवश्यकता असते. ती भरपूर फळे, सर्व भाज्या, धान्ये, डाळींतून पूर्ण होऊ शकते.
व्याधिप्रतिकारशक्ती उत्तम असण्यासाठी उत्तम बलाची गरज असते. म्हणजेच आपल्या शरीरातील रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र हे सातही धातू पुष्ट हवेत. या रसादी सातही धातूंना बल दूध, तूप, भात यांसारखा सात्त्विक रसायन आहार, शतावरी, आवळा, गुळवेल, ज्येष्ठमधसारखी रसायन औषधं व मानसिक शुचिता वाढविणारे आचार रसायन यांचा समावेश होतो.
व्याधिप्रतिकारशक्ती कमी होणे हेच सर्व आजारांचे मूळ असल्याने व्याधिक्षमत्व वाढविणारा आहार पथ्यकर ठरतो.

 • भाताची पेज, तांदळाचे घावन, फुलका, ज्वारीची-तांदळाची भाकरी, रव्याचा गोड शिरा, उपमा, डाळीचे वरण, विविध कडधान्यांच्या उसळी, पडवळ, दुधी भोपळा, भेंडी, दोडका, कोबी, फ्लावरसारख्या भाज्या, लालमाठ, पालक, मेथी, मुळा इत्यादीसारख्या पालेभाज्या, तूप-जिरे-धणे-आले-लसूण-कांदा यांची फोडणी दिलेल्या भाज्या किंवा भाज्यांचे सूप यांचा आहारात समावेश असावा.
 • तोंडी लावण्यास लिंबाचे गोड लोणचे, चटण्या, कोशिंबिरीचा वापर करावा.
 • गोड, आंबट रसाची फळे तर्पण करणारी असतात. गोड द्राक्षे, गोड डाळिंब, सफरचंद, सुका मेव्यापैकी काळ्या मनुका, अंजीर, खजूर, बदाम यांचा आहारात समावेश करावा.
 • फळे ताजी व गोड खावीत.
 • हिवाळ्यात व पावसाळ्यात फळांच्या फोडींवर सुंठपूड, जिरे, मिरेपूड लावून सेवन केल्यास किंवा फळांच्या रसात चिमूटभर सुंठ पावडर घातल्यास सर्दी-कफाचा त्रास होणार नाही.
 • मांसाहारीनी मटणसूप, चिकनसूप सेवन करावे. मटण-चिकन खाताना अतिरिक्त तेल किंवा वेगवेगळ्या बाजारातील मसाल्यांचा किंवा दह्यासारख्या पदार्थाचा वापर करू नये. तूप, जिरे, मिरे, आले, लसूण अशा पाचक द्रव्यांची फोडणी देऊन घेतल्यास लाभदायक ठरते.
  थोडक्यात, पचनास हलका परंतु शरीरातील रस-रक्तादी सातही धातूंचे वर्धन-तर्पण करणारा, मल-मूत्राचे शरीराबाहेर योग्य प्रकारे विसर्जन करण्यास मदत करणारा, प्रतिकारशक्ती वाढविणारा आहार पथ्यकरही असतो.
 • व्याधिक्षमत्व म्हणजे रोगाला दूर ठेवण्याची प्रतिकार क्षमता चांगली असणे आणि हेच सध्या महत्त्वाचे आहे.
 • मुलांना रोज दूध प्यायला देताना चांगले उकळून त्यामध्ये सुंठ व हळद घालून प्यायला द्यावे. हळद हे पूर्वापारपासून ॲन्टिसेफ्टिक म्हणून काम करते हे सगळ्यांनाच माहीत आहे.
 • शतावरी कल्प नित्य दुधातून घेतल्याने सर्व शरीराचे स्वास्थ्य टिकून राहते.
 • श्वसनमार्गावर काम करणारी काही औषधे, जसे- अडुळसा, ज्येष्ठमध इ. यांचे योग घेतल्याने फायदा होतो.
 • च्यवनप्राश हे उत्तम रसायन व व्याधिक्षमता वाढवणारे आहे. घरातील प्रत्येकाने घेणे आवश्यक.
 • सुवर्णप्राशन संस्कार हा पुष्य नक्षत्रावर केला जातो. त्यामध्ये असणारे सुवर्ण, ब्राह्मी अशी औषधे बुद्धीसोबतच मुलांची रोगप्रतिकार क्षमता वाढवतात. म्हणून सद्यपरिस्थितीत वैद्याच्या सल्ल्याने घेणे चांगले ठरते.
 • चांगल्या पोषक आहारांबरोबर काही सवयींचेही आचरण करावे. यामध्ये स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
 • तेल, उटणे लावून रोज स्नान करावे.
 • रोज सकाळी तेलाचा किंवा तुपाचा एक थेंब दोन्ही नाकपुडीत घालावा.
 • लवकर झोपावे व लवकर उठावे.
 • सध्याच्या स्थितीत खूप महत्त्वाचे म्हणजे कमीत कमी टीव्ही, मोबाईल स्क्रीनचा वापर. रात्री झोपण्यापूर्वी साधारण दोन तास तरी मोबाईल हातात घेऊ नये.