मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात

0
5

>> ७२ हजार मुलांचे लसीकरण चार दिवसांत पूर्ण करणार : आरोग्यमंत्री

राज्यातील १५ ते १८ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात होणार असून, त्यासाठीची सर्व तयारी आरोग्य खात्याने पूर्ण केली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत १५ ते १८ वयोगटातील ७२००० मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल दिली.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर १ जानेवारीपासून मुलांच्या लसीकरण नोंदणीसाठीची प्रक्रिया कोविन ऍपवर सुरू केली होती. देशाच्या औषध महानियंत्रकांनी १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला मंजुरी दिली आहे; पण सरकारने तूर्त केवळ १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याला पुरेसे डोस प्राप्त
राज्यातील १५ ते १८ या वयोगटातील ७२ हजार मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस यापूर्वीच राज्याला मिळाले आहेत, अशी माहिती देखील विश्‍वजीत राणे यांनी दिली. या लसीकरण मोहिमेसाठी वैद्यकीय तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचारी सज्ज झाले आहेत. गरज भासल्यास हे डोस मुलांना विद्यालयातही दिले जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या सीमेवर कडक तपासणी
राज्यात कोविडची बाधा झालेल्या लोकांचे प्रमाण वाढू नये, यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली जात आहे. तसेच राज्याच्या सीमेवरील तपासणी नाक्यांवर कोविड चाचणी व अन्य नियमांची अंमलबजावणी कडकपणे करण्यात येत असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.

‘त्या’ जहाजाला राज्यातील
बंदरावर प्रवेश नाकारला

तब्बल २ हजार प्रवाशांना राज्यात घेऊन येणार्‍या जहाजातील बर्‍याच प्रवाशांना कोविडचा संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सदर प्रवासी जहाजाला गोव्यातील बंदरात येण्यास परवानगी दिली नसल्याचे विश्‍वजीत राणे यांनी काल स्पष्ट केले. साळगावकर मेडिकल रिसर्च सेंटर हॉस्पिटलच्या मदतीने जहाजावरील सर्व प्रवाशांची कोविड चाचणी करून घेण्याची त्यांना सूचना करण्यात आली आहे. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना गोव्यात उतरू देण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

१५ दिवसांत जिनोम सिक्वेन्सिंग मशीन
कोरोनाचा नवा विषाणू सापडल्यास त्याचे निदान करण्यासाठी जिनोम सिक्वेसिंग मशीनची गरज भासते. राज्यात सध्या ही मशीन उपलब्ध नसल्याने काही नमुने तपासणी पुणे येथे प्रयोगशाळेत पाठवावे लागतात. या पार्श्‍वभूमीवर बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात येत्या १५ दिवसांत जिनोम सिक्वेसिंग मशीन बसवण्यात येणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.

राज्य कृती दलाची आज बैठक
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य कृती दलाची एक बैठक सोमवार दि. ३ जानेवारी रोजी होणार आहे. राज्यात कोविडचा संसर्ग वाढू नये, यासाठी या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी काल सर्व राज्यांतील आरोग्य मंत्र्यांची आभासी पद्धतीने बैठक घेतली. या बैठकीत राज्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे हे सुद्धा सहभागी झाले होते. देशात कोरोनाची तिसरी लाट आली, तर तिचा सामना कसा करावा व त्यासाठी कोणकोणती तयारी करावी याचा फेरआढावा या मनसुख मांडविया यांनी बैठकीत घेतला, अशी माहिती विश्‍वजीत राणे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.