- रमेश सावईकर
पालकांना नि शिक्षकांना बालमानशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज आहे. मुलं घरी अधिक वेळ असतात. पालकांची जबाबदारी अधिक असते. पण मुलं घरी असतात त्यावेळी पालक नोकरी-धंद्यानिमित्त बाहेर असतात. आपल्या मुलांसाठी वेळ देणे गरजेचे आहे याचे भान असूनही त्यांच्याकडे ‘वेळ’ नसतो. ही परिस्थिती मुलांचे भवितव्य घडविण्यात ‘मारक’ ठरू शकते हे पालकांनी जाणून घ्यायला हवे.
‘मुले ही देवाघरची फुले’ असे आपण म्हणतो. फुले ही नाजूक, पवित्र, साजूक, सुंदर असतात. निसर्गात ऋतुमानानुसार नानाविध फुले फुलतात. ती आपण देवाला वाहतो. तद्वतच मुले असतात! त्यांची मने नाजूक-साजूक असतात. मनोभावना निर्मळ, निरपेक्ष नि निरागस असते. ते भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आपणाला पाहायला मिळतात. ते भाव ओळखण्याची, त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना तळहातावरच्या फुलागत जपण्याची क्षमता आपणात हवी. ही क्षमता कमी-अधिक प्रमाणात मुळातच नसली तर मुलांना घडविण्यात आपण अपयशी ठरतो. परिणामी मुले घडण्याऐवजी ‘बि’घडतात.
मुलं बाल्यावस्थेत बोबड्या भाषेत बोलतात. त्यावेळी आपण म्हणतो- ‘त्यांना काही कळत नाही, ती अजाण आहेत!’ पण परिस्थिती तशी नसते. बालकांना त्यांच्या जगातलं कळत असतं. पण त्यांना कळतं हे आम्हाला कळत नाही. ती समज-उमज आमच्यात नसते. वरपक्षी आपण म्हणतो, मुलांना अजून समज आलेली नाही.
मुलं बाल्यावस्थेत असताना त्यांची मने ही कोऱ्या पाटीसारखी असतात. त्यावेळी त्यांच्या भावना आपण जपल्या नाहीत, त्यांच्या मनाप्रमाणे आपण वागलो नाही तर त्या कोवळ्या मनाच्या ‘पाटी’वर ओरखडे काढण्याचे काम आमच्याकडून होते. बालक दोनतीन वर्षांचे झाल्यावर स्वतःच्या पायावर उभे राहून चालण्याची धडपड करते. त्यावेळी आम्ही त्यांना मार्गदर्शक किंवा त्यांचे रक्षक म्हणून कोणते ‘बाळकडू’ देतो, तर ‘तू तिकडे गेलास तर पडणार, पुढे जाऊ नकोस’ असे नकारात्मकतेचे अन् भीती निर्माण करणारे बाळकडू पाजतो. ‘तू तिकडे जाताना सावधपणे जा, पडशील!’ असे वास्तविक सांगण्याची गरज असते. बालक स्वतःच्या पायावर उभे राहून पुढे जाण्यासाठी धडपड करीत असते. ही त्याच्या कृतीतली सकारात्मकता ओळखता आली पाहिजे. जीवनात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडणे गरजेचे आहे, ही समज त्या अवस्थेत निसर्गतः त्यांना लाभलेली असते. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे आपण म्हणतो. पण पाळणा व्यापून आपले पाय पुढे पसरविण्याची धडपड पाळण्यात असतानाच सुरू झालेली असते. हे भविष्यातील धडपडीचे सूचक प्रतीक असते. ते ओळखण्यात, समजण्यात, उमजण्यात आम्ही कमी पडतो. हे आम्हाला कळत नाही याचा अर्थ असा की, बालकांचा- मुलांचा ‘स्वाभिमान’ आपण समजू शकत नाही. त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. असे कोणी एखाद्या मानसिक बालतज्ज्ञाने सांगितले तर ‘लक्षात कोण घेतो?’ अशी वस्तुस्थिती आहे. बालपणात मुले हट्टी असतात. त्यांचे हट्ट आपणाला पुरवावे लागतात. पण बऱ्याच वेळा आम्ही कृतीत कमी पडतो. त्यांचे माफक हट्ट असतात. ‘खेळणी’ घेऊन खेळण्याचा छंद. त्या छंदात ती रमतात, फुलतात, मनोमनी बहरतात. एखाद्या प्रकारची फळे किंवा पदार्थ यांची त्यांना विशेष आवड असते. ती आवड भागविणे मोठे कठीण नसते. पण ‘आता नको हं… नंतर देईन!’ असे बोल सुनावत मुलांना आपण हिरमुसले करतो. अशामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला जाण्याची शक्यता असते.
बाल्यावस्था संपून पुढच्या अवस्थेत म्हणजे साधारणतः 5 ते 10 वयोगटात मुलं प्राथमिक शाळेत शिक्षण घेतात. त्यावेळी, त्या अवस्थेत आपण मुलांना कसे नि कितपत जपतो याचा विचार पालकांनी आत्मपरीक्षण करून करावा.
मुलांचा खेळून आपले मन रमविण्याकडे अधिक कल असतो. सवंगड्यांसंगे खेळणे, बोलणे, हसणे नि मनोरंजन करून घेणे मुलांना मनोभावे आवडते. नव्हे, त्या वयात त्यांचे ते मानसिक बळखाद्य असते. पालक या वयोगटातील मुलांना समजण्यात कमी पडतात. उलट धाक, दरारा दाखवून मुलांना घडविण्याचा प्रयत्न करतात. पण ते प्रयत्न थिटे पडतात. याला अनेक कारणे आहेत.
मुलांना त्यांच्या कलाने घेऊन त्यांना समज द्यावी. विचारदृष्टी विकसित व्हावी म्हणून पालकांनी सकारात्मक कृतिशील प्रयत्न करण्याची गरज असते. शाळेत शिक्षकांचा नि घरी पालकांचा दरारा असतो, त्याला मुलांना सामोरे जावे लागते. शाळेत येणारी मुलं ही आपली मुलं आहेत, ती चांगली होण्यासाठी प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे, त्यांना घडविताना समजून घेण्याची गरज आहे, याचे भान शिक्षकांनी ठेवायला हवे. पूर्वीच्या काळी ‘छडी लागे छम् छम्, विद्या येई घम् घम्’ असे नुसते म्हटले जात नसे तर प्रत्यक्ष कृती शिक्षकांकडून व्हायची. अशा प्रकारच्या शिक्षकांना ‘मारकुटे’ अशी विशेषणे मुले बहाल करायची.
आता परिस्थिती बदलली आहे. छडीचा वापर करण्यास प्रतिबंध आहे. मुलांची शिक्षकी मारपिटीतून मुक्तता झाली म्हणायची; पण शिक्षकांनी आता ‘आम्हा काय त्याचे?’ असे म्हणून अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे नि वाढीव पगार प्राप्त करण्याकडे फक्त लक्ष केंद्रित केलेले आढळते. ‘मुलांवरती चांगले संस्कार करायला हवेत’ अशी भाषणबाजी शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञ, राजकीय-सामाजिक पुढाऱ्यांकडून केली जाते. अहो, प्रत्येक घटकाने ही जबाबदारी एकमेकांवर ढकलली तर व्हायचे कसे?
पालकांना नि शिक्षकांना बालमानशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज आहे. मुलं घरी अधिक वेळ असतात. पालकांची जबाबदारी अधिक असते. पण मुलं घरी असतात त्यावेळी पालक नोकरी-धंद्यानिमित्त बाहेर असतात. आपल्या मुलांसाठी वेळ देणे गरजेचे आहे याचे भान असूनही त्यांच्याकडे ‘वेळ’ नसतो. ही परिस्थिती मुलांचे भवितव्य घडविण्यात ‘मारक’ ठरू शकते हे पालकांनी जाणून घ्यायला हवे. मुलांचे ‘संस्कारक्षम’ असे ठरावीक वय असते. शाळेत गुरुजी सांगतात ते खरेच आहे अशी मुलांची भावना, श्रद्धा व विश्वास असतो. त्या विश्वासास आपण पात्र आहोत काय याचा विचार करून, त्याचे भान ठेवून प्राथमिक शिक्षकांनी विद्यादानाचे कार्य पवित्र व प्रामाणिक भावनेने करावे.
पालकांनी आपले बोलणे-वागणे हे कुटुंब-वात्सल्याच्या मर्यादेत राहील याचे भान ठेवावे. कारण मुलांचे वय हे अनुकरणप्रिय असते. चुकीच्या गोष्टी घरात, कुटुंबात घडल्या नाहीत; माया, ममता, प्रेम, आपुलकीयुक्त वात्सल्य घरात असेल तर त्यानुसार मुलांचे वर्तन होऊन आपल्या पालकांबद्दल अनामिक, अनासक्त ‘ओढ’ मुलांच्या मनातच नव्हे तर हृदयात निर्माण होईल. हे अनुबंध अधिक घट्ट करण्याचे काम पालकांकडून, आईवडिलांकडून झाले तर त्यांची मुलं खऱ्या अर्थाने ‘घडतील’ यात अजिबात संदेह नाही.
मुलांना शिकवावं लागत नाही, ती स्वतः शिकत असतात. मुळात ‘शिकवणं’ ही शिक्षणाची प्रक्रिया नाहीच आहे. शाळेत विद्यार्थ्यांना दिलं जातं ते ज्ञान असतं. त्या ज्ञानाचं ग्रहण करणं म्हणजे स्वतःच शिकणं होय. शिकण्याची प्रक्रिया सतत घडतच असते. ती एक मानसिक प्रक्रिया आहे. मुलं घरी, शाळेत, समाजस्थळी या प्रक्रियेतून शिकत असतात. त्यामुळे घरी, शाळांत नि समाजात अनुकरणीय अशी स्थिती-वातावरण निर्माण करणे ही या तिन्ही घटकांची जबाबदारी ठरते. उगाच मुलांना दोष देऊन बिघडण्याचे खापर त्यांच्या डोकीवर फोडणे म्हणजे आपल्या जबाबदारीपासून पळ काढण्यासारखे आहे किंवा स्वतःला जबाबदारीमुक्त समजून उजळमाथ्याने समाजात वावरणे होय.
मुलांना सर्वाधिक जपण्याचे त्यांचे वय म्हणजे 13 ते 19- ज्याला आपण ‘टीनएज’ म्हणतो. या वयोगटातील मुले प्रचंड मानसिक ताणतणावांतून जात असतात. साधारणतः 14 वर्षे झाली की मुले मोठ्या माणसासारखी परिपूर्ण झाल्यागत वागतात, बोलतात. त्यावेळी त्यांना आपण समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. ती मुलांसारखी बोलली तर त्यांना आपण ‘बालिश’ म्हणून हिणवतो, आणि मोठ्या माणसासारखी बोलली तर ‘मुलांसारखे बोला’ म्हणून ओरडतो. त्यांना स्वाभिमान असतो, तो आपण जाणून घेत नाही. आपण त्यांना समजून घेत नाही.
परिणामी या वयात मुलं पालकांपासून आपुलकी, माया, ममतेचा अनुबंध सैल झाल्याने दुरावली जाण्याची शक्यता असते. ती आपले स्वतःचे विश्व शोधतात. त्यात रमतात. एकरूप होऊन जातात. त्यावेळी ती मुलं आपण कोण आहे, आपणाला जवळचं कोण आहे, त्या शोधात असतात. मुलं या वयात मोठी झालेली असतात. त्यांना स्वातंत्र्य हवे असते. ते पालकांनी दिले नाही तर स्वातंत्र्याच्या अपेक्षेतून ती स्वैरत्वाकडे झुकतात. त्यांची मानसिक अवस्था फुलपाखरासारखी असते. ती आपण समजून घेतली तरच ती पाखरं आपल्या घरट्याची ओढ घट्ट पकडून राहू शकतात. पालकांनी त्यांना ‘छान किती दिसते फुलपाखरू’ असे म्हणून जवळ घेऊन मायेने कुरवाळले तर ती जीवनात खरोखरच फुलाप्रमाणे फुलतील, बहरतील! तो बहर सहजशक्य नसला तरी अशक्य नाही!