मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात काँग्रेसचे देशभरात आंदोलन

0
4

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अन्य दोन आयुक्तांचा विरोध डावलून आणि मनमानीपणे काही निर्णय घेतल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काल काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला. काँग्रेसने देशभरात तीव्र निदर्शने करत आंदोलनाची हाक दिली. दिल्लीपासून जम्मू, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम, हरियाणा, उत्तराखंड, बिहार, हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशपर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडून कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या दिशेने मार्च काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी येथे नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या, पोलिसांनी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. आम्ही लोकशाहीचा अंत पाहणार नाही, गप्प बसणार नाही. याला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव माध्यमांशी बोलताना म्हणाले.
रायसीना रोडवरील युवा काँग्रेस कार्यालयापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्च्यादरम्यान आंदोलकांनी घोषणाबाजी केली आणि ज्ञानेश कुमार यांना प्रश्न विचारणारे अनेक फलक आणि बॅनर्स झळकावले.

सर्वोच्च न्यायालयात याचिका
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आता सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मतदार यादीतून 13 कोटी मतदारांची नावे कथितपणे वगळल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) माध्यमातून चौकशी करण्याची मागणी एका याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. याचिकाकर्त्याने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 32 अन्वये ज्ञानेश कुमार यांच्यावर खटला चालवण्याची मागणी केली आहे.

सीजेपीकडून देशव्यापी
आंदोलनाची हाक

जर ज्ञानेश कुमार यांनी शनिवार 26 सप्टेंबरपर्यंत राजीनामा दिला नाही, तर सीजेपी 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतून देशव्यापी आंदोलन सुरू करेल आणि ते आंदोलन भारतातील विविध शहरांत देखील केले जाईल, असे सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे.