रेड्डी यांनी ‘यू टर्न फेम’ मुख्यमंत्री अशा शद्बात पर्रीकर यांची खिल्ली उडवली व त्यांनी कोणालाही दोष न देता प्रशासनावरच लक्ष केंद्रित करावे असा सल्लाही पत्रकार परिषदेत बोलताना दिला.मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हितासाठी तोंडाला लगामघालावा, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
गोव्यातील सर्व खाणी आपण बंद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी वारंवार जाहीर केले आहे. खाणग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे पॅकेज मागण्याचा त्यांना अधिकार आहे. मानवी दृष्टीकोनातून कॉंग्रेसही राज्यातील कायदेशीर खाणी सुरू व्हाव्यात म्हणून प्रयत्न करीत आहेत. गोव्याच्या हिताचा विचार करून यापूर्वीही कॉंग्रेसने कामकेले आहे. आताही कायद्याच्या चौकटीतून जे काही करणे शक्य आहे ते कॉंग्रेस करणार, असे रेड्डी म्हणाले.
राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी तोंडाला जरा लगामघालणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. गोव्यातील खाणी बंद करण्याचे श्रेय ते घेवून मोकळे झाले आहेत, असे ते म्हणाले. बेकायदेशीर खनिज उत्खनन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली उच्चाधिकार समिती सध्या गोव्यात आहे. खाण प्रश्नावर न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल, तशी पक्षाची मानसिक तयारी आहे. गोव्यातील सुमारे ४ लाख लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत, याची पक्षाला कल्पना असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.