मुख्यमंत्री 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यासाठी रवाना

0
14

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर रवाना झालेले असून, या दौऱ्यात ते रविवार दि. 25 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत होणाऱ्या भाजपशासित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरीय बैठकीला हजर राहणार आहेत.
अशोका हॉटेलमध्ये रविवारी सकाळी 9 ते दुपारी 3 या दरम्यान होणार असलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानात तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या छावण्यांवर हल्ले करून या छावण्या उद्ध्वस्त करण्याचे जे काम भारतीय सैन्याने केले, त्याविषयीची माहिती देण्याबरोबरच भारताच्या व्यापक सुरक्षा डावपेचांविषयीची माहितीही देणार आहेत. त्याचबरोबर हे युद्ध कोणत्या परिस्थितीत थांबवण्यात आले, त्याची माहिती देखील यावेळीदेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे या बैठकीला हजर राहणार असून, त्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री नसल्याने गोव्याच्या वतीने ते एकटेच या बैठकीत सहभागी होणार आहेत.
याशिवाय प्रमोद सावंत हे नवी दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीबरोबरच तेथे होणार असलेल्या नीती आयोगाच्या बैठकीलाही हजर राहणार आहेत.