Home बातम्या मुक्तसंवाद : प्राचार्य गोपाळराव मयेकर यांच्याशी…

मुक्तसंवाद : प्राचार्य गोपाळराव मयेकर यांच्याशी…

0

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

नमस्कार मयेकरसर, आपला आतापर्यंतचा जीवनप्रवास हृदयंगम झालेला आहे. गेल्या पाच तपांत कविता आणि प्रज्ञा-प्रतिभेच्या सामर्थ्याने ज्ञानदेवीची रसडोळस समीक्षा या दोन्ही काठांमधून जिवंतपणे वाहणारा एक सर्जनशील, अभिजात खळाळता प्रवाह रसिकांनी आपल्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाच्या रूपाने सतत अनुभवला आहे. तुमचे लेखन-वाचन-चिंतन-मनन आजही चालू आहे. नुकताच तुम्हाला ‘मज दान कसे हे पडले’ या आत्मचरित्राबद्दल महाराष्ट्र शासनाचा ‘महाराज सयाजीराव गायकवाड पुरस्कार’ प्राप्त झालेला आहे. या परिणत वयात तुमची दोन पुस्तके ‘विद्यार्थी गृह, पुणे’ या संस्थेने छापलेली आहेत. ‘जागर प्रकाशन’ ती प्रसिद्ध करीत आहे. त्यांतील एक आहे समाजाच्या समग्र अभ्युदयासाठी आपणाकडून वेगवेगळ्या व्यासपीठावरून वाणी आणि लेखणीद्वारा व्यक्त झालेल्या चिंतनाचे संकलन. ‘समष्टिचिंतन’ हे त्याचे नाव. दुसरे पुस्तक आहे तुमच्या अत्यंत जिव्हाळ्याचे. ज्ञानदेव आणि ज्ञानदेवीसंबंधीचे. ‘ज्ञानदेवसृष्टी’ हे त्याचे नाव. या निमित्ताने तुमच्या आयुष्याची जडणघडण आणि तेथून घडलेला तुमचा जीवनप्रवास यासंबंधी थोडे बोलूया का?

प्रा. मयेकर : हो ना, अवश्य बोलू.

प्रश्‍न : ‘मुक्काम-पोस्ट करीरोड, मुंबई- १३’ हे पर्व तसे कठीणच होते. पण सुदैवाने आपणास शिरोडकर हायस्कूल लाभले. आपल्या अंगच्या हुशारीने आपण त्या दिवसांचे नंदनवनात रूपांतर केले. एच. डी. गावकरसर म्हणजे आपल्याला लाभलेले वरदानच. त्या आनंददायी दिवसांबद्दलच्या काही आठवणी? त्यावेळचे काही बालमित्र? अन्य शिक्षकांच्या सहवासातील काही संस्मरणीय क्षण?

प्रा. मयेकर : ते पर्व कठीण म्हणता येणार नाही. ते दिवस आनंदमय वाटायचे. म्युनिसिपालिटीच्या प्राथमिक शाळेत मी जात होतो. ते दिवस मला आजही आठवतात. बालमित्रांच्या समवेत मला अभ्यासाची गोडी लागली होती. गोट्या, विटीदांडू या खेळांत आम्ही रमत होतो. आमच्या घराच्या माळ्यावरच्या छपरावरून मी मनसोक्त पतंग उडवीत असे. तुळशीराम भोकनळ पाटील हा मित्र पाचवीपर्यंत माझ्याबरोबर होता. अभ्यासात तो हुशार होता. त्याची परिस्थिती कठीण होती. आजही त्याने आपली मैत्री अभंग ठेवली आहे. दुसरा बालमित्र रवींद्र प्रभू. एका अंधार्‍या चिंचोळ्या बोळाने चाळीत आम्हाला प्रवेश करावा लागे. पहिल्या व दुसर्‍या माळ्यावर जाणार्‍या मोडकळीस आलेल्या लाकडी जिन्यापर्यंत या प्रवेशदिंडीच्या डावीकडील अंगास पाचसहा अंधारी खोल्या होत्या. त्यांत कोण राहत, त्यांचे कोणते व्यवहार चालत असत याचा पत्ता नसे. अशी ही वस्ती होती. माझे बालपण मात्र सुखात गेले. आईवडिलांनी माझ्यावर चांगले संस्कार केले. अभ्यासात हुशार असल्यामुळे शांताराम मास्तरांचा मी लाडका होतो. आईवडील कापडगिरणीत कामावर जायचे. त्याही वयात खोलीसमोरील गॅलरीतून पूर्व दिशेला उगवलेला पौर्णिमेचा चंद्र, गच्चीकडच्या खोलीसमोरील विस्तीर्ण मोकळ्या गच्चीतून माथ्यावर पसरलेल्या निरभ्र आभाळात चमचमणार्‍या नक्षत्रतारकांची आकाशगंगा, तर कधी चंद्राचे शांत-शीतल चांदणे या निसर्गदृश्यांचा सुखद अनुभव मी घेतला. तेथील सण-उत्सवांत आम्ही अगदी रमून जात असू.

शिरोडकर हायस्कूलचे तर माझ्यावर फार मोठे ऋण आहे. स्कॉलरशीपवरच माझे शिक्षण झाले. इंग्रजी शाळेत गेलो तरच स्कॉलरशीप मिळणार होती. एखाद्या रंगीबिरंगी फुलांच्या बागेमध्ये विविधरंगी फुलपाखरे आपल्या मंजुळ-मंदमधुर वाणीत सर्वत्र किलबिलत असावीत असे आनंदमय वातावरण माझ्या शाळेला लाभले होते. हरी धर्माजी गावकर ऊर्फ एच. डी. सरांचे शाळेत लाभलेले नेतृत्व म्हणजे आम्हाला लाभलेले वरदानच होते. शाळा संस्थापक डॉ. शिरोडकरांचा वारसा ते अभंग जिद्दीने आणि आत्मविश्‍वासाने चालवीत होते. या उपक्रमशील शाळेविषयी काय बोलावे? किती बोलावे? सहभोजन, समूहजीवन, श्रमसौंदर्य, संघभावना, सामूहिक आनंद व निरामय स्पर्धा अशा कितीतरी पुस्तकांतून न शिकता येणार्‍या गुणांचे प्रत्यक्ष शिक्षण येथे घेता आले. बुद्धिविकासाला हृदयविकासाची जोड मिळाली तर बुद्धी विघातक न होता विधायक बनते हे सत्य येथेच उलगडले. एरव्ही एच.डी.सर रसायनशास्त्राचे उत्तम शिक्षक. पण कोणासही कधी सुचणार नाहीत अशा विद्यार्थिविकासाच्या भन्नाट कल्पना त्यांना सुचत होत्या. याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांच्या हितासंबंधी असलेला त्यांना चिरंतन ध्यास. शिवाय देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. दिवसच तसे होते. नवभारताच्या उभारणीसाठी नवनव्या कल्पनांनी आणि स्वप्नांनी सभोवतालचे वातावरण भारलेले होते. त्यांच्यावर थोर पुरुषांनी केलेल्या कार्याचा प्रभाव होता. इतर शिक्षकही या परंपरेत वाढत होते. सर्वजण एच.डी. सरांचा आदर्श गिरवीत. पुढे महाराष्ट्राचे शिक्षणसंचालक झालेले वि. वि. चिपळूणकर आम्हाला शिक्षक होते. त्यांच्या योग्यतेबद्दल मी काही वेगळे सांगायला नको. शारीरिक शिक्षणासाठी बेरीसर होते. माझ्या उपजत गुणांना प्रोत्साहन देणारी ही शाळा मोठे केंद्र ठरली. माझ्या पुढील आयुष्यात मी विविध क्षेत्रांत यशस्वी नेतृत्व केले त्याचे बीज याच भूमीत पेरले गेले. आमच्या देसाईसरांनी मला ८’’९’’ चा कॉडेक्‌चा बॉक्स कॅमेरा बक्षीस म्हणून दिला. त्यामुळे ‘फोटोग्राफी’चा छंद मला जडला. या वयातदेखील ती आवड टिकवून ठेवलेली आहे.

मित्रांबद्दल म्हणाल तर शांताराम पवार, रघुवीर तळाशीलकर आणि चिंतामणी तिरोडकर हे मला मित्र म्हणून लाभले. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल मला अभिमान वाटतो. याबाबतीत खूप काही सांगण्यासारखे आहे. सांगणे आवश्यकही होते. अनेक तपशील माझ्या आत्मचरित्रात आलेलेच आहेत.

प्रश्‍न : एल्फिन्स्टन कॉलेजमधील आपला विद्यार्थी म्हणून झालेला प्रवेश हा आपल्या आयुष्याला वळण देणारा महत्त्वाचा बिंदू. येथील मंतरलेल्या दिवसांबद्दल तुम्ही तुमच्या आत्मचरित्रामधून सविस्तर लिहिले आहे. पण तुमच्या मनोगताचे नित्य नवे उन्मेष ऐकावेसे वाटतात. नव्या पिढीला ते प्रेरणादायीही वाटतील. तुम्हाला त्या काळात लाभलेल्या गुरुजनांबद्दल, तत्कालीन शैक्षणिक वातावरणाविषयी, वाङ्‌मयीन अभिरुची वाढविणार्‍या घटना-प्रसंगाविषयी संक्षेपाने सांगाल का?

प्रा. मयेकर : पन्नास वर्षांपूर्वीचे एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये घालविलेले तारुण्यातील दिवस आजही आठवतात. स्वप्नांचे ते मंतरलेले दिवस होते. जुन्याजाणत्या ज्ञानसंपन्न परंपरा लाभलेली आशिया खंडातील ती ऐतिहासिक वास्तू. इंग्लंड देशाचे भूषण समजल्या गेलेल्या कवी वर्डस्वर्थचा नातू म्हणे इथला पहिला प्राचार्य होता. १९५४ च्या मे महिन्यात परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमधून विशेष प्रावीण्यासह एस.एस.सी. परीक्षा प्रथम श्रेणीत मी पास झालो होतो. मी आणि माझा बालमित्र तुळशीराम भोकनळ पाटील असे दोघेच गिरणगावच्या कामगारवस्तीतून या श्रीमंत कॉलेजमध्ये आलो होतो. या कॉलेजमध्ये मराठी विषय सोडून इतर सर्व विषय इंग्लिश माध्यमातून शिकवले जात असत. संस्कृत विषयही इंग्लिशमधून शिकविला जात असे. कॉन्व्हेंट उच्चाराच्या इंग्लिश भाषेतील लेक्चर्स प्रारंभी आमच्या डोक्यावरून जाऊ लागली. तशातच मी बीजगणित व भूमिती या विषयांवरील प्रेमामुळे मॅथ्स हा विषय घेतला होता. पुढे लॉजिक या विषयाने अभ्यासात रंजकता आणली आणि विचारांत शिस्तबद्धता येण्यास मदत केली. इंटरच्या वर्षात असताना कॅन्सरच्या आजाराने आईचे निधन झाले. अभ्यासावरचे माझे लक्ष उडाले होते. तरी मी झटून अभ्यास केला. कारण मी कॉलेज शिक्षण घेऊन खूप मोठे व्हावे अशी तिची तीव्र इच्छा होती. कॉलेजमधील ‘मराठी वाङ्‌मय मंडळा’च्या उपक्रमांमुळे मला जीवनाचा सूर सापडला. ते जसे आनंदनिर्मितीचे केंद्र होते, तसेच ते विविध गुणविकासाचे चैतन्यकेंद्रही होते. माझ्यातील कलागुणांना माझ्या शाळेने बीजारोपणापासून विकासापर्यंत खतपाणी घातलेलेच होते. इंटरच्या वर्गात असताना आंतरमहाविद्यालयीन काव्यस्पर्धेत मी सहभागी झालो. मला माझ्या निसर्गवर्णनपर कवितेला उत्तम कवितेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. अरविंद देशपांडेची सामाजिक आशयाची कविता होती. आमच्या कॉलेजला स्पर्धेचा सांघिक चषक मिळाला. ज्युनियर बी.ए.च्या वर्गात असताना पुण्याच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या न्यायमूर्ती रानडे वादविवाद स्पर्धेत मी सहभागी झालो. राहण्याची व्यवस्था माझे इंटर आर्टस्‌मधील मित्र सीताराम नाडकर्णी (प्रा. एस. एस. नाडकर्णी) यांनी लोकमान्य टिळकांच्या गायकवाडवाड्यात केली होती.

आम्हाला सुरुवातीला अहमद हे कॉलेजचे प्राचार्य होते. मागाहून प्राचार्य बॅनर्जी आले. विलक्षण योगायोग म्हणजे त्यांची-माझी पुनर्भेट मी गोव्याचा तत्कालीन शिक्षणमंत्री असताना झाली. गोव्याच्या भावी विद्यापीठाच्या आराखड्याची प्रत त्यांनी माझ्या केबिनमध्ये येऊन सुपूर्द केली. त्यांच्यासमवेत तेव्हाचे मुंबई विद्यापीठाचे रेक्टर प्रा. गोवर्धनदास पारिख होते.

मराठीचे प्राध्यापक डॉ. म. अ. करंदीकर आणि प्रा. शंकर वि. वैद्य यांच्या अध्यापनकौशल्याच्या आठवणी पुनः पुन्हा येतात. त्या दोघांनी मला ममत्वाने वागविले. वेळोवेळी मार्गदर्शन केले. मराठीचे प्रा. म. वा. धोंड, इंग्रजीचे प्रा. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हेही आठवतात. प्रा. कमल वूड इंग्रजी शिकवायच्या. संस्कृत प्रा. शेंडे शिकवायचे. नॅशनल कॉलेजचे प्रा. वसंत बापट यांनी मला ज्ञानेश्‍वरीचा नववा अध्याय शिकविला. प्रा. अ. का. प्रियोळकर यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या माडीवर मला ख्रिस्तपुराण शिकविले आणि गोमंतकीय साहित्याचा संक्षेपाने परिचय करून दिला. एल्फिन्स्टनमधील माझा शिक्षणाचा प्रवास १९६० मध्ये एम.ए.च्या परीक्षेनंतर संपला. या कॉलेजने मला आयुष्यात अमाप दिले. आयुष्यभराची वाङ्‌मयप्रेमाची साथ दिली. रत्नाकर मतकरी, सीताराम नाडकर्णी, रामदास भटकळ, पुष्पा सरकार (पुष्पा भावे), सुधा पाटणकर (सुधा जोशी), वि. शं. चौघुले, डॉ. चित्रे व माधव गोडबोले यांच्यासारख्या कर्तृत्ववान स्नेहीजनांचा लाभ झाला.

प्रश्‍न : तुम्ही कोणकोणते लेखक वाचले? तुम्हाला प्रभावित करणारी पुस्तके कोणती?

प्रा. मयेकर : वाचनाची आवड पहिल्यापासूनच होती. घरात संतवाङ्‌मयाचे पठण होत असे. माझे आईवडील परोपकारी वृत्तीचे होते. रेडीहून आलेला अवधूत पाटकर आमच्याकडेच राहायचा. तो ज्ञानेश्‍वरीचे नित्य पठण करायचा. त्यामुळे तेव्हापासून ज्ञानेश्‍वरीविषयी अजाणत्या वयात ममत्व निर्माण झाले. सानेगुरुजींचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक आवडले होते. शिवाय आमच्या कोवळ्या तरुण वयात सानेगुरुजींच्या आत्महत्येची दुःखद वार्ता ऐकली. मन सुन्न झाले होते. आम्ही राहत होतो त्या परिसरातच ती घटना घडल्यामुळे मनाला चटका बसला. काही दिवस के.ई.एम.च्या आसपास रेंगाळत होतो. ना. धों. ताम्हनकर, भा. रा. भागवत हे लेखक बालवयात वाचले. आवडले. वि. स. खांडेकरांच्या साहित्यापेक्षा त्यांच्या ध्येयनिष्ठ जीवनाविषयीचे आकर्षण अधिक होते. शिवाय त्यांचे शिरोडा आणि आमचे तिरोडा ही जवळची गावे. ते आमचेच वाटायचे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निबंध स्पर्धेत खांडेकरांची ‘क्रौंचवध’ ही कादंबरी बक्षीस म्हणून मिळाली. आवडली. पुढे प्रा. ना. सी. फडके यांची ‘दौलत’ही मिळाली. पण त्यापलीकडे फडके यांचे साहित्य विशेष भावले नाही. विंदा करंदीकर, प्रा. वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर यांच्या काव्यवाचनाच्या त्या चैतन्यमय दिवसांत आणि आजही हे कवी विशेष भावले. बालकवींच्या कवितेचे खूप आकर्षण. श्रीधर व्यंकटेश केतकर यांची ‘ब्राह्मणकन्या’ आणि ‘महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण’ ही पुस्तके अभ्यासासाठी लावलेली होती. ते आवडायचे. कवी, लेखक आणि समर्पणशील व्यक्तिमत्त्व या नात्याने वि. दा. सावरकर खूप भावले. ‘काळे पाणी’, ‘माझी जन्मठेप‘, ‘गोमांतक’ आणि ‘कमला’ ही काव्ये आवडीने वाचली. इंग्रजी वाचनाकडे विशेष कल नसला तरी ‘लिओनार्दो दा व्हिन्ची’ या कलाकार, वैज्ञानिक व तत्त्वज्ञाविषयीचे ‘लस्ट ऑफ लाइफ’ हे पुस्तक वाचले. पी. बी. शेले या कवीविषयीचे ‘एरियल’ हे पुस्तक आणि ‘बॅरॅट्‌स ऑफ व्हिंपल स्ट्रीट’ हे नाटक वाचले. याचाच पुढे पु. ल. देशपांडे यांनी ‘सुंदर मी होणार’ हा अनुवाद केला. मराठीतील जुने-नवे साहित्य मी तेवढ्याच अगत्याने वाचत होतो. माझा अभिरुची मी नेहमीच मोकळी ठेवली. संस्कृत साहित्य हा आवडीचा विषय होता. त्यामुळे साहित्यविषयक अभ्यासाला भक्कम बैठक मिळाली.

प्रश्‍न : तुमच्या आयुष्यातील स्थानांतराचे विविध टप्पे कुतूहलजनक आहेत. मुंबई ते गोवा हा प्रवास असाच रोमहर्षक आहे. त्याविषयी….

प्रा. मयेकर : जन्म व शिक्षण मुंबईत. परळच्या मी शिकत असलेल्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून अध्यापन करीत असताना एम.ए.ची परीक्षा मराठी आणि संस्कृत विषय घेऊन उच्च द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालो. सव्विसाव्या वर्षी गोव्याची मुलगी सांगून आली. आमच्या पूर्वजांची भूमी गोमंतक. त्यामुळे गोव्याविषयी आत्मीयता होतीच. १४ मार्च १९६२ रोजी दादर माटुंग्याला विवाहसमारंभ झाला.

सरकारी महाविद्यालयाच्या मराठीच्या प्राध्यापकाच्या जागेसाठी मी अर्ज केला होता. माझ्या नावाचा एक सरकारी लिफाफा कधीतरी पोस्टमनने आमच्या घरी आणून माझ्या आईच्या हाती दिला होता. तिने तो आठवणीने मला देण्यासाठी म्हणून घरातील ज्ञानेश्‍वरीच्या पोथीखाली जपून ठेवला होता. नंतर ती ही गोष्ट साफ विसरून गेली होती. मध्यंतरी मार्चमध्ये माझा विवाह ठरला. अनपेक्षितपणे तो लिफाफा मला सापडला. प्राध्यापकीच्या पदासाठी माझी निवड झाल्याचे ते सरकारी पत्र होते. अमरावती येथील कॉलेजमध्ये विशिष्ट तारखेला रुजू होण्याची तारीख उलटून गेली होती. फार मोठी चांगली संधी चालून आली होती, पण ती हुकली. सरकारदरबारी प्रयत्न करूनही काहीएक उपयोग झाला नाही. पण माझ्या नशिबात नियतीने काहीतरी वेगळेच लिहून ठेवले आहे ते मला कुठे ठाऊक होते. सरकारी कॉलेजच्या नव्या आवाहनानुसार तसेच गोव्यातील नव्या महाविद्यालयासाठी मी अर्ज केले. दोहोंकडून मुलाखतींचे निमंत्रण मिळाले. पणजीच्या धेंपो कला आणि विज्ञान महाविद्यालयासाठी गिरगावच्या शिरोळकर हायस्कूलमध्ये मुलाखत झाली आणि २० जून १९६२ रोजी मराठी-संस्कृत विषयाचा प्राध्यापक म्हणून माझी निवड झाली. दैवगतीने मी गोव्यात आलो. पूर्वजांच्या भूमीशी पूर्वसंकेतानुसार निगडित झालो.

प्रश्‍न : अकल्पितपणे तुमचा राजकारणात प्रवेश झाला. त्या काळात गोव्याचे शिक्षणमंत्रीपद तुम्ही भूषविले. अन्य महत्त्वाची खातीही तुमच्याकडे होती. नवमुक्त गोमंतकाला आकार देताना प्रशासक म्हणून कसा हातभार लावता आला?

प्रा. मयेकर : माझा मगो पक्षाशी वा त्याच्या पुढार्‍यांशी कोणत्याही प्रकारचा संबंध आला नव्हता. नाही म्हणायला म्हापशातील मगोचे समर्थ कार्यकर्ते बाबा नाईक, मनोहर सावकार आणि गुरुनाथ धुळापकर इ. मंडळीशी साहित्यिक व सामाजिक कार्यामुळे अनुबंध जुळले होते. कॉलेजमध्ये अध्यापन करणे आणि आवडीच्या विषयांवर ठिकठिकाणी व्याख्याने देणे हा जिव्हाळ्याचा विषय होता. वर्तमानपत्रात ‘शारदीय चंद्रकळेमाजी’ या सदरात लेखन चालू होते. राजकारणात रस नसतानाही लोकभावनांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मित्रांच्या आग्रहास्तव मी राजकारणाकडे आकस्मिकपणे ओढला गेलो. गोव्याच्या सांस्कृतिक उत्थानासाठी वक्तृत्वाच्या माध्यमातून माझी जी धडपड सुरू होती तिचे ते फलित होते. जनमत कौलानंतरच्या निवडणुकीत म्हापसा मतदारसंघातून मी निवडून आलो. शिक्षणमंत्री म्हणून माझी निवड झाली. शिवाय आरोग्य, बांधकाम, पर्यटन आणि माहिती ही खाती माझ्या वाट्याला आली.

मुक्तीनंतरचे विकासोन्मुख पर्व मगोच्या पहिल्या मंत्रिमंडळाने १९६३ पासून सुरू केलेलेच होते. या पर्वाला गती देण्याचे दायित्व माझ्या शिरावर येऊन पडले होते. शिक्षणखात्यामुळे शिक्षणप्रसार, उच्च शिक्षणसुविधा, व्यावसायिक शिक्षण, बांधकाम खात्यामुळे रस्तेबांधणी, पुलांची नव्याने उभारणी, अन्य बांधकामे, आरोग्य खात्यामुळे आरोग्यसेवाविस्तार, पर्यटन खात्यामुळे निसर्गरमणीय गोव्यातील पर्यटनस्थळांची सुधारणा आणि पर्यटकांसाठी सोयीसुविधा असा समाजजीवनाचा सम्यक विकासकार्याचा पाया या काळात बळकट झाला. इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, डेन्टल कॉलेज, नर्सिंग कॉलेज या सुविधा या प्रारंभीच्या काळात निर्माण झाल्या. गावांना आणि शहरांना जोडणारे डांबरी रस्ते, गावोगावचे रस्त्यांचे जाळे याच काळात निर्माण झाले. ओपा व अस्नोडा पाणीप्रकल्प या काळात विकसित झाले. मांडवी नदीवर पूल उभारण्याचे कार्य याच काळात सुरू झाले. कला अकादमीची स्थापना याच काळात झाली. अनेक सहकार्‍यांचा आणि तज्ज्ञांचा हातभार त्यासाठी लागला. गोव्याच्या कलाविश्‍वाला प्रारंभिक आधारभूमी मिळवून देता आली. प्रश्‍न ः कवितेवर जीव कधीपासून जडला?

प्रा. मयेकर : प्रसंगपरत्वे मी याविषयी बोललोच आहे. शालेय वयापासून कवितेची गोडी लागली. एल्फिन्स्टन कॉलेजच्या स्वप्नविभोर, आत्मनिर्भर दिवसांत काव्यविषयक अभिरुची अधिकाधिक समृद्ध होत गेली. भोवतालचे वातावरण त्याला पोषक होते. सकस लिहिणारी मंडळी आसपास होती. समांतरपणे सपाटून वाचन होत होते. मनाला उभारी देणारी माणसे होती. वाङ्‌मयीन नियतकालिकांनी आपला महत्त्वपूर्ण वाटा उचललेला होता. माझ्या आत्मचरित्रातील ‘कवितेचे प्रेम आणि प्रेमाची कविता’ या प्रकरणात अन्य काही तपशील आलेले आहेत.

प्रश्‍न : देवगडच्या कातळावर उभे राहिलेले नवे महाविद्यालय हीदेखील तुम्ही साकार केलेली एक कविता. जीवनातील अनुभवसिद्ध टप्प्यावर सहजगत्या ती जमून गेलेली. आजही हा मर्मबंध आपण जोपासलेला आहे आणि तेथील माणसांनीही. त्या दिवसांविषयी?

प्रा. मयेकर : देवगडचे कॉलेज ही माझ्या जीवनप्रवासातील एक प्रयोगशाळा असे मी मानलेले आहे. १९७२ च्या निवडणुकांनंतर राजकारणात झालेल्या उलथापालथीमुळे मी माझ्या छापखान्यात लक्ष घालायला सुरुवात केली. थोडे लक्ष अभ्यासात आणि थोडेसे छापखान्यात असा दिनक्रम चाललेला होता. अचानक एके दिवशी पदव्युत्तर केंद्रातून निरोप आला की, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू टी. के. टोपे यांनी पणजीच्या मांडवी हॉटेलमधील त्यांच्या खोलीत भेटायला बोलावले आहे. मला काहीच अंदाज येईना. मी निरोपानुसार त्यांना भेटायला गेलो. त्यांच्यासमवेत पदव्युत्तर केंद्राचे त्यावेळचे संचालक प्राचार्य द. भ. वाघ होते. वाघांनी सुरुवात केली, ‘‘गोपाळराव, तुम्ही आता मोकळे आहात. शिक्षण हा तुमचा आवडता विषय आहे. तेव्हा तुमच्यासाठी एक नामी संधी चालून आलेली आहे. देवगड येथे येत्या जूनपासून एक नवे कला आणि वाणिज्य महाविद्यालय सुरू होत आहे. त्यासाठी देवगडचे संस्थाचालक प्राचार्यांच्या शोधात आहेत. माझी व कुलगुरूंची अशी इच्छा आहे की तुम्ही ही जबाबदारी स्वीकारावी.’’ मी ते निमंत्रण स्वीकारले. माझ्या आयुष्यातील ते आनंददायी पर्व ठरले. ‘शिक्षण विकास मंडळ, देवगड’ या संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी प्रारंभापासून खूपच उत्साह दाखविला. आस्था प्रकट केली. वातावरण नवखे होते. भौतिकदृष्ट्या साधन-सुविधांची वानवा होती. पण उत्साही प्राध्यापकांच्या कॉलेजच्या प्रवेशाने हर्षभरित झालेल्या विद्यार्थ्यांच्या चैतन्याच्या संगतीत आमचा नवा शैक्षणिक प्रयोग सुरू झाला. देवगड कॉलेज केवळ वाढत राहिले नाही, तर ते वाढत असताना देवगडचा ग्रामीण परिसर कसा वाढेल याकडे महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मी जातीने लक्ष पुरवू लागलो. महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांची आणि विचारवंतांची व्याख्याने आयोजित करण्यात आली. तेथील प्रगतीची वाटचाल अभ्यास आणि अभ्यासेतर अशा दोन्ही क्षेत्रांत होत राहिली. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव सातत्याने निर्माण करण्यात आली. तेथील जीवनपोषक सर्वांगीण प्रगती आणि समाजसंबद्ध उपक्रमांमुळे निर्माण झालेली सांस्कृतिक वाटचाल हा माझ्या दृष्टीने आल्हाददायी अनुभव होता. पण आर्थिक पाठबळ पुरेशा प्रमाणात नसताना ती चाललेली होती. पण मी देवगड महाविद्यालयाच्या उभारणीत मनापासून रमलो.

प्रश्‍न : आसगाव, म्हापसा येथील महाविद्यालयाच्या उभारणीत आपला मौलिक वाटा आहे. तेथील दीर्घकालीन अनुभवांविषयी….

प्रा. मयेकर : देवगडच्या आव्हानात्मक वातावरणातही तेथील शैक्षणिक वाटचालीत मी रमून गेलेलो होतो हे मी यापूर्वी नमूद केलेलेच आहे. केवळ मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये, कौटुंबिक जबाबदारी पेलणेही आवश्यक आहे या जाणिवेने मी म्हापशाच्या बांदेकर कॉमर्स कॉलेजचे प्राचार्यपद स्वीकारले. येथील नव्या इमारतीचे बांधकाम आणि नव्या साधनसामग्रीचा विकास मला करता आला याचे अत्यंत समाधान वाटते. महाविद्यालयाच्या स्थलांतराच्या कामात प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना सामावून घेता आले. वाणिज्य शाखेचे विद्यार्थी प्रामुख्याने असतानाही मराठी साहित्याचे प्रेम त्यांच्यात निर्माण व्हावे यासाठी मराठी विषय शिकविण्याची सुविधा निर्माण केली. शिस्त, अभ्यास, क्रीडा, नवे तंत्रज्ञान आणि परीक्षांचे वेळच्या वेळी निकाल जाहीर करणे अशा विविध बाबींत बांदेकर कॉलेज नेहमीच अग्रेसर राहिले. या कॉलेजचा प्राध्यापकवर्ग अत्यंत अनुभवी, अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि तळमळीने अध्यापन करणारा असल्यामुळे गोवा विद्यापीठाच्या वार्षिक परीक्षांच्या निकालात टी.वाय. परीक्षेत पहिले तीन क्रमांक पटकावण्याचा विक्रम आमच्या कॉलेजने पहिल्याच वर्षी दाखविला. माझ्या तेरा वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत प्राचार्य, प्राध्यापक आणि व्यवस्थापन यांच्यात सदैव सलोख्याचे संबंध राहिले. राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना या सतत कार्यशील राहिल्या. कॉमर्स कॉलेज असूनही कला आणि संगीतविषयक उपक्रमांना प्राधान्य मिळाले.

प्रश्‍न : ज्ञानेश्‍वरीचे सुजाण, प्रगल्भ अभ्यासक, अमोघ वाणी लाभलेले वाचस्पती अशी तुमची जनमानसात उज्ज्वल प्रतिमा आहे. ती वगळून तुमच्या जीवनचरित्राचा विचार करणे अशक्य. राष्ट्राच्या संसदेत ज्ञानदेवीतील पसायदान उद्धृत करून राष्ट्रीय अभ्युदयाशी तुम्ही त्याची सांगड घातली. ज्ञानदेव आणि ज्ञानदेवी यासंबंधीच्या अनुबंधाविषयी थोडेसे…

प्रा. मयेकर : माझ्या सार्‍या जीवनाचा दृढ पायाच मुळी ज्ञानदेवीमुळे घातला गेलेला आहे. माझे आईवडील व्रतस्थ होते. माझी आई परम विठ्ठलभक्त होती. ज्ञानेश्‍वरीचे पठण घरात व्हायचे. बालपणापासून त्याचे संस्कार माझ्यावर झाले. पुढे महाविद्यालयात लाभलेल्या मराठीच्या प्राध्यापकांमुळे डोळस परिशीलन करण्याची संथा लाभली. आशयाच्या अंगाने तिच्या तत्त्वज्ञानाचा गाभा शोधणे आणि अभिव्यक्तीच्या अंगाने तिच्या सौंदर्यस्थळांचा आस्वाद घेणे हे सतत घडत गेले. माझ्या दृष्टीने ज्ञानदेवीचे अध्ययन, अध्यापन आणि व्याख्यानांद्वारे लोकशिक्षण ही अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती होती. सैरभैर अवस्थेत ज्ञानदेवीने मला तारलेले आहे. तिच्या ओव्यांच्या दिव्य स्पर्शाने माझी साहित्यसृष्टी आणि जीवनदर्शन आमूलाग्र बदलून गेले. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अवधूतदादांचे ज्ञानेश्‍वरीचे पठण, बाबांचे ‘नवनीत’द्वारे रुजविलेले ज्ञानेश्‍वरीप्रेम, ह. ध. गावकरसर यांनी प्रवचनातून ज्ञानेश्‍वर-तुकारामांच्या आधारे दिलेले नीतितत्त्वांचे आणि जीवनमूल्यांचे शिक्षण, प्रा. शंकर वि. वैद्य यांनी सूक्ष्मतरल संवेदनशीलतेने केलेले ज्ञानदेवीच्या सोळाव्या अध्यायाचे अध्यापन आणि एम.ए.ला गं. वि. नेर्लेकरांनी केलेले ज्ञानदेवीचे अध्यापन यांमुळे मूलबीजाचा वृक्ष व्हायला विलंब लागला नाही. ज्ञानदेवीने माझ्या अभ्यासासाठी अधिष्ठान दिलेच; शिवाय जीवनधारणेसाठी संरक्षक कवचकुंडले दिली. ‘तुझ्या पायरीचा चिरा एक झालो!’ या माझ्या आत्मचरित्रामध्ये हाच कृतज्ञताभाव मी प्रकट केलेला आहे.

प्रश्‍न : भाषिक, वाङ्‌मयीन, सांस्कृतिक चळवळीत, सामाजिक अभिसरणाच्या व प्रबोधनाच्या प्रक्रियेत आपण निरंतर अग्रभागी राहिलात. त्यातील आल्हाददायी क्षण?

प्रा. मयेकर : या क्षेत्रात वावरताना प्रथमतः हवी ती निर्भयता. ही निर्भयता मला आजवरच्या संस्कारांनी दिली. प्राचार्यपदावर असताना मराठीच्या भाषिक संघर्षाच्या वेळी नेतृत्व करणे याच्यात मोठा धोका होता. पण त्या धोक्याचे भय मला कधी वाटले नाही. समाजाने दिलेले निरपेक्ष वृत्तीने समाजाला परत करणे यापेक्षा आल्हाददायी क्षण दुसरा नाही. असे कैक क्षण आयुष्यात अनुभवता आले.

प्रश्‍न : आजवर लाभलेल्या मित्रसहवासाविषयी…

प्रा. मयेकर : मित्र मिळण्याच्या आणि मिळविण्याच्याही बाबतीत मी आयुष्यात भाग्यवान ठरलो आहे. रक्तसिद्ध नात्यापेक्षा या भावजन्य मैत्रीने जगण्याला कृतार्थता येते. बालवयापासून आयुष्याच्या या टप्प्यापर्यंत लाभलेल्या मित्रांची गणती कशी करता येईल? तरीदेखील माझ्या आत्मचरित्रामध्ये ‘निर्मळ सद्भावाचे स्फटिक दिवे’ व ‘जेथे जातो तेथे मैत्रीच्या चांदण्यात’ या प्रकरणांत मित्र-मैत्रिणींविषयी संस्मरणे टिपण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या ‘सौहार्दाच्या चांदण्या’त मी न्हाऊन निघालो आहे. मी कृतार्थ आहे… कृतज्ञ आहे.

प्रश्‍न : आतापर्यंत तुमच्या भावसमृद्ध, सुखी सहजीवनाविषयी काहीच विचारले नाही. सौ. उषावहिनी आणि तुमचे कुटुंबीय यांविषयी तुमचा कृतज्ञताभाव आहेच. त्याविषयी थोडेसे सांगाल?

प्रा. मयेकर : त्या सर्वांनी मला आत्मिक शक्ती दिलेली आहे. माझी पत्नी ही तर माझा आधार बनून राहिलेली आहे. माझ्याकडून जे काही घडले त्यामागे तिचीच प्रेरणा आहे. यापूर्वी मी ते लिहिलेलेच आहे. माझ्या कर्तबगारीचे श्रेय तिलाच आहे.

प्रश्‍न : साहित्य आणि संस्कृती यांच्या अनुषंगाने नव्या पिढीला उद्देशून आजच्या घडीला तुम्हाला काय सांगावेसे वाटते?

प्रा. मयेकर : मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत आलेलो आहे की संकटाला घाबरून जाऊ नका. सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आणि महन्मधुर असेल ते ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. दुसर्‍याला सुखी करता आले नाही, तरी दुःखी करू नका.

साहित्याचा मूल आधार तुमच्या जीवनातील अनुभव हा असतो. असे विविध प्रकारचे अनुभव जेवढे घेता येतील तेवढे मोकळ्या मनाने घ्या. जुन्या-नव्याचा भेद न करता व्यक्तीच्या आणि समाजाच्या कल्याणाचे जे काही असेल ते स्वीकारा. तुमच्यामध्ये जे काही चांगले असेल ते समाजाकरिता आहे याची जाणीव ठेवा.