गेल्या १३ जुलै रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट रचणार्यांविषयी माहिती मिळाल्याचा दावा महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने केला आहे. या स्फोटात २१ जण ठार झाले होते. हा स्फोट कोणी घडविला हे सांगण्यास मात्र पोलीस महासंचालक अजित पारसनिस यांनी तूर्त नकार दिला. तपासकामाचे काही धागेदोरे अद्याप जुळायचे आहेत असे ते म्हणाले.
या महिन्याच्या सुरवातीस महाराष्ट्र एटीएसने गुजरात पोलिसांसमवेत केलेल्या एका संयुक्त कारवाईत युसूफ नावाच्या व्यक्तीस सूरत शहराच्या लिंबायत भागातून अटक केली होती. स्फोटानंतर युसूफच्या फोनवरील संभाषणावर पोलिसांची नजर होती व स्फोटासंदर्भात तो महाराष्ट्र आणि केरळमधील विशिष्ट व्यक्तींशी संभाषण करीत असल्याचे आढळून आल्याने त्याच्या हालचालींवर पाळत ठेवण्यात आली होती.