Home Featured मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता

मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता

0

ठाकरे बंधूंना मोठा धक्का; भाजप-शिवसेना शिंदे गटाला 116 जागा

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. याशिवाय महाराष्ट्रातील अन्य 28 महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि ठाकरे बंधू अशी थेट लढाई झाली. ठाकरेंना धोबीपछाड करत मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 114 चा जादूई आकडा गाठण्यात यश मिळवले असून, मुंबई महापालिकेत महायुतीचे 116 नगरसेवक निवडून आले आहेत.

मुंबई महानगरपालिकेत (बीएमसी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपच्या महायुतीने बहुमताचा टप्पा पार केला आहे. गेल्या 25 वर्षांपासून असलेली ठाकरे गटाची सत्ता उलथवून लावण्यात महायुतीला यश आले असून, मुंबईत आता भाजपचा महापौर बसण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई महापालिकेत भाजपला 88, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 65, शिवसेना शिंदे गटाला 28, काँग्रेसला 24, मनसेला 6, एमआयएमला 8, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 आणि इतरांना 10 जागा मिळाल्या.

एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकीत महायुतीने, विशेषतः भारतीय जनता पक्षाने मोठे यश संपादन केले. महाराष्ट्रातील तब्बल 19 महानगरपालिकांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी स्पष्ट आघाडी किंवा बहुमत मिळवले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत सत्ता राखली आहे. नागपूर महापालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने 151 पैकी सर्वाधिक जागा जिंकत निर्विवाद यश मिळवले. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीने आपले गड राखले. संभाजीनगरमध्ये भाजप येथे पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून, एमआयएमने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत सर्वांना चकित केले. परभणी महापालिकेत मात्र भाजप महायुतीचा वारू उध्दव ठाकरेंच्या शिलेदारांनी रोखला. परभणी महापालिकेवर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा फडकणार आहे.