मुंबई कसोटी, कोची वनडे होती फिक्स!

0
163

>> बुकी संजीव चावलावर नवीन आरोपपत्र दाखल

क्रिकेटमध्ये सट्टेबाजी करणारा बुकी संजीव चावला याच्यावर दिल्ली पोलिसांनी नवीन आरोपपत्र दाखल केले आहे. तपासणी दरम्यान नोंदविलेल्या साक्षीदारांच्या विधानांच्या आधारे, जप्त केलेल्या ध्वनिचित्रफित व चित्रफितींद्वारे प्राप्त आरोपींमधील संभाषण, सीएफएसएल अहवाल आणि इतर माहितीपट व तोंडी पुराव्यांच्या आधारे २००० साली मुंबईत झालेला द. आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना तसेच कोची येथे झालेला पहिला एकदिवसीय सामना ‘फिक्स’ करण्यात आला होता असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

आरोपपत्रात असे नमुदही करण्यात आले आहे. मालिकेतील दुसर्‍या, तिसर्‍या व चौथ्या वनडे सामन्यांतील अंतर्गत माहिती क्रोनिए याने बुकीला पुरवली. परंतु, हे सामने फिक्स नव्हते असेही आरोपपत्रात नमुद आहे. आरोपीविरोधात कलम ४२० आणि १२० बी नुसार दंडनीय गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही आरोपपत्रात म्हटले आहे. भारत व इंग्लंड यांच्यात १९९२ साली झालेल्या प्रत्यर्पण करारांतर्गत चावला याला भारतात आणण्यात आले होते.

क्रिकेटमध्ये सट्टेबाजी करणारा बूकी संजीव चावलाचे प्रत्यार्पण केल्यानंतर दिल्ली पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. संजीव चावलावर मॅच फिक्सिंग रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता. हे फिक्सिंग प्रकरण दिल्ली पोलिसांनी २००० मध्ये उघडकीस आणले होते. संजीव चावला हा दाऊद गँगसाठी १९९० च्या दशकात सट्टेबाज बनला. चावला हा एक मोठा व्यवसायिक होता. १९९६ मध्ये तो बिझनेस व्हिसावर लंडनला गेला होता. तर, प्रकरण उघडकीस आल्यानंतर २००० मध्ये त्याचे भारतीय पारपत्र रद्द करण्यात आले होते. २००५ मध्ये त्याला ब्रिटनचे पारपत्र मिळाले होते आणि तो ब्रिटीश नागरिक झाला होता.

कोची वनडे
कोची वनडेला दोन दिवस असताना व पूर्वरात्री संजीव चावला व हॅन्सी क्रोनिए यांनी हामिद कासिम याला अनेक फोन केले. संजीव व क्रोनिए यांच्यातही बातचीत झाली. या संभाषणात संजीव याने क्रोनिएला उद्याच तुझ्या खात्यात पैसे जमा करतो, असे सांगितल्याचे पोलिसांना आढळून आले होते.

मुंबईतील कसोटी
दक्षिण आफ्रिकेचा संघ एका डावात २५० पेक्षा जास्त धावा करणार नसल्याचे निश्‍चित करण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेने हा सामना तीन दिवसांत जिंकला असला तरी दोन्ही डावांत द. आफ्रिकेने २५० पेक्षा अधिक धावा केल्या नाहीत. भारताचा पहिला डाव २२५ धावांत संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात १७६ धावा केल्या. भारताचा दुसरा डाव अवघ्या ११३ धावांत संपला व द. आफ्रिकेने विजयासाठीच्या १६४ धावा करत सामना जिंकला.