Home बातम्या मुंबईतील हिंसाचार प्रकरणी तपासासाठी विशेष पथक

मुंबईतील हिंसाचार प्रकरणी तपासासाठी विशेष पथक

0

‘या संपूर्ण हिंसाचाराच्या घटनेच्या तपासकामासाठी आम्ही विशेष पथकाची स्थापना केली असून या हिंसाचाराचे नेमके कारण व त्यामागे कोण आहे याचा छडा लावण्याचे काम हे पथक करणार आहे’, अशी माहिती मुंबईचे संयुक्त पोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी काल दिली.

आझाम व म्यानमारमध्ये मुस्लिमावर होणार्‍या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आझाद मैदानावर आयोजिलेल्या सभेदरम्यान हे हिंसाचार प्रकरण उद्भवले होते. या सभेवेळी आयोजकांकडून चिथावणीखोर भाषणे झाली होती काय याची पोलीस शहानिशा करीत आहेत. दरम्यान, एका वृत्त वाहिनीने या हिंसाचारादरम्यान दंगलखोरांनी पोलिसांकडील दोन रायफली व एक पिस्तूल हिंसकावून घेतल्याचे वृत्त दिले आहे. तसेच यावेळी महिला पोलीस शिपायांचा दंगेखोरांकडून विनयभंग झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या हिंसाचारात २ व्यक्ती ठार झाल्या असून १०० जण जखमी झाले. या जखमींमध्ये ४५ पोलीस, ३ पत्रकार यांचा समावेश आहे. तसेच बेस्टच्या ४९ बसेस, १२ पोलीस व्हॅन्स, ५० खाजगी वाहने, (टीव्ही चॅनलच्या ३ ओबी व्हॅनासह) यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे. गुन्हे विभागाकडून सखोल चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत. मात्र हे प्रकरण योग्यरित्या हाताळण्याबाबत पोलिसांना दोष देण्यास त्यांनी नकार दिला. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: मुंबईत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.