मुंगूलमध्ये टोळीयुद्ध; पाच जण ताब्यात

0
14

पूर्ववैमनस्यातून कारमधील दोघांवर दंडुके, तलवार, कोयत्याने हल्ला; गोळीबारही केला; गंभीर जखमींवर गोमेकॉत उपचार सुरू

मंगळवारी पहाटे मुंगूल-माडेल येथे टोळीयुद्ध (गँगवॉर) भडकले. कोलवा येथून येणाऱ्या एका कारला मुंगूल येथे अडवत पाच हल्लेखोरांनी कारमधील दोघांवर दंडुके, तलवार, कोयत्याने हल्ला केला. तसेच त्यांच्यावर गोळीबारही केला. त्यात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या दोन टोळ्यांतील पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी पाच संशयितांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली. याशिवाय काल सायंकाळी संशयावरून काही जणांना फातोर्डा पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र नेमके कोणाला ताब्यात घेतले, याविषयी पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

सविस्तर माहितीनुसार, मुंगूल रेल्वे पुलापासून काही अंतरावर खारेबांध जाणाऱ्या तीन रस्त्याच्या संगमावर सगुण हॉटेलजवळ मंगळवारी पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास कारमधून प्रवास करणाऱ्या एका टोळीतील दोन तरुणांचा दुसऱ्या टोळीतील हल्लेखोरांनी अन्य चार कारमधून पाठलाग करत मुंगूल येथे त्यांना अडवत गोळीबार केला. त्यामुळे कारच्या काचा फुटल्या. त्यानंतर कारमधील रफिक तशान (24) आणि युवकेश तशान (20) या दोघांवर दंडुके, कोयते, तलवारीने हल्ला केला. त्यात ते दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात इस्पितळात अधिक उपचारांसाठी दाखल केले आहे. याशिवाय तोडफोडीमुळे कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच घटनास्थळी जिवंत काडतुसे आणि हल्ल्यासाठी वापरलेल्या अन्य काही वस्तूही आढळून आल्या.

या प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात तात्काळ लुकआउट नोटीस जारी केली आहे. यानंतर सायंकाळी उशिरा काही जणांना संशयावरून ताब्यात घेतले. जखमी झालेले रफिक व युवकेश हे दोघेही वोल्टर टोळीशी संबंधित असून, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलीस अधीक्षक काय म्हणाले?
दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी तोंडावर मास्क घातले होते. त्यांनी रफिक व युवकेश यांच्यावर सोडा बॉटल व कोयत्याने हल्ला केला. त्यातील एका बुरखाधारी तरुणाने दोन वेळा गोळीबारही केला. या गोळ्या कारच्या काचांना लागून काचा फुटल्या. यानंतर हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी गोळ्यांची काडतुसे व अन्य काही वस्तू घटनास्थळावरून हस्तगत केल्या आहेत.

हेच का ते सुशासन? : आलेमाव
मुंगूल येथे पहाटे गोळ्या झाडून प्राणघातक हल्ल्याची घटना घडली त्यातून गोव्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचे दिसून येत असून, त्याला राज्यकर्ते जबाबदार आहेत. गोव्यात खून, मारामाऱ्या, दरोडे आणि अन्य गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. असे असतानाही मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हे मात्र राज्यात सर्वकाही आलबेल असल्याचा दावा करतात. हेच का ते सुशासन? असा सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारला केला.

‘गुंडाराज’ वाढल्यास पर्यटक
पाठ फिरवतील : सरदेसाई

गोव्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. ‘गोवा में गुंडाराज’ वाढल्यास पर्यटक पाठ फिरवतील. गोवा सरकारने या हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात गुन्हे होतात, त्याला पोलीस व सरकार जबाबदार आहे. पोलिसांची भीती त्यांना राहिलेली नाही, ती असती तर ही घटना घडली नसती, असेही सरदेसाई म्हणाले.

कोणाविरुद्ध लुकआऊट नोटीस?
या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी अक्षय तलवार, राहुल तलवार (बोर्डा), विल्सन कार्वाल्हो, शाहरूख (दवर्ली) व रसूल या पाच जणांविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. फातोर्डा पोलिसांनी काल सायंकाळी काही जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र नेमके कोणाला ताब्यात घेतले याविषयी कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांनी दिली नव्हती. याशिवाय आणखी 15 अज्ञात संशयितांविरुद्ध खूनी हल्ला केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.