मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या
सूत्रधाराची एनआयएच्या चौकशीत कबुली
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याबाबत तहव्वूर राणाने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मोठी कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. तहव्वूर राणा हा 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी मी पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट होतो, अशी कबुली तहव्वूर राणाने दिली आहे.
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला तहव्वूर राणाला 10 एप्रिल 2025 रोजी भारतात आणण्यात आले होते. तहव्वूरला ऑक्टोबर 2009 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे अमेरिकन एजन्सी एफबीआयने अटक केली होती. अमेरिकेकडून तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर भारतीय तपास यंत्रणाच्या पथकांनी अमेरिकेत जाऊन तहव्वूर राणाला भारतात आणले होते. सध्या तहव्वूर राणाला कोठडीत असून, त्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील तिहार तुरुंगात एनआयएच्या ताब्यात असलेल्या तहव्वूर राणाने तपास यंत्रणांना चौकशीदरम्यान अनेक खुलासे केले असल्याचे सांगितले जात आहे. तहव्वूर राणाने असेही सांगितले की, तो आणि त्याचा सहकारी डेव्हिड कोलमन हेडलीने पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाबरोबर अनेक प्रशिक्षण सत्रे घेतली होती. तसेच लष्कर-ए-तोयबा प्रामुख्याने गुप्तहेर नेटवर्क म्हणून काम करते. मुंबईत इमिग्रेशन सेंटर उघडण्याची कल्पना देखील त्याचीच होती आणि 26/11 च्या हल्ल्यादरम्यान तो दहशतवाद्यांच्या योजनेचा एक भाग होता, असेही त्याने कबूल केल्याचे सांगितले जात आहे. त्याने स्वतः जाऊन छत्रपती शिवाजी टर्मिनससारख्या ठिकाणांची रेकी केल्याचेही कबूल केले.
तहव्वूर राणा कोण?
64 वर्षीय तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे. राणा पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम करत होता. त्यानंतर तो 1997 मध्ये कॅनडाला गेला आणि तेथे इमिग्रेशन सेवा देणारा व्यावसायिक म्हणून काम करू लागला. तहव्वूर राणा हा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी संबंधित आहे. तो या हल्ल्यांमधील एक प्रमुख व्यक्ती होता. त्याच्यावर हेडली आणि पाकिस्तानमधील इतरांना मुंबई दहशतवादी हल्ल्यात लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे.
डेव्हिड कोलमन हेडली कोण?
डेव्हिड कोलमन हेडलीचा जन्म वॉशिंग्टन डीसीमध्ये झाला. दाऊद सय्यद गिलानी हे त्याचे जन्मनाव होते. त्याचा जन्म एक प्रसिद्ध पाकिस्तानी राजनयिक आणि प्रसारक सय्यद सलीम गिलानी आणि त्याची अमेरिकन पत्नी ॲलिस सेरिल हेडली यांच्या पोटी झाला. डेव्हिड हा 2002 ते 2005 दरम्यान पाकमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या किमान पाच प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर, हेडली हा लष्कर-ए-तोयबाच्या कमांडर्सच्या सूचनेनुसार भारतात पाळत करण्यासाठी आला होता. 2008 मध्ये मुंबई हल्ल्यांपूर्वी तो पाच वेळा भारतात आला होता, अशी माहिती अमेरिकेच्या न्याय विभागाने दिली होती.
तहव्वूर राणाला मुंबई पोलीस ताब्यात घेणार
तपासात सहभागी असलेली मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आता तहव्वूर राणाला अटक करून रिमांडवर घेण्याची तयारी करत आहे. राणा सध्या एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत आहे, जी दिल्ली न्यायालयाने 9 जुलैपर्यंत वाढवली आहे.

